वरळी येथे चारचाकीच्‍या धडकेत महिलेचा मृत्‍यू !

  • शिवसेनेचे पदाधिकारी कह्यात

  • पदाधिकार्‍याचा मुलगा चालक असून त्‍याने मद्यप्राशन केल्‍याचा आरोप  

  • गाडीने महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेले

मुंबई – दुचाकीवरून जाणार्‍या एका दांपत्‍याला बी.एम्.डब्‍ल्‍यू. गाडीने धडक दिली. गाडीने महिलेला फरफटत नेले. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्‍यू झाला. ७ जुलै या दिवशी पहाटे ५.३० वाजता वरळी येथे हा अपघात घडला. या प्रकरणात वाहनाचे मालक राजेश शहा हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. त्‍यांचा मुलगा मिहीर शहा (वय २४ वर्षे) अपघाताच्‍या वेळी वाहन चालवत होता. यासाठी पोलिसांनी राजेश शहा यांना कह्यात घेतले आहे. मिहीर सध्‍या फरार आहे.

दांपत्‍य मासेविक्री करत असल्‍याने पहाटे मासे विकत घेण्‍यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असतांना हा प्रकार घडला. गाडीने धडक दिल्‍यावर दोघेही वाहनाच्‍या बोनेटवर धडकले. पतीने बोनेटवरून बाजूला उडी घेतली; मात्र महिलेला वेळीच बाजूला होता आले नाही. त्‍यामुळे महिला वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेली. तिला नायर रुग्‍णालयात उपचारांसाठी भरती करण्‍यात आले; पण तिचा मृत्‍यू झाला. तिच्‍या पतीवर उपचार चालू आहेत. पोलिसांनी वाहन कह्यात घेतले आहे.

मिहीर शहा

मिहीर शहा याने ६ जुलैच्‍या रात्री जुहू येथील एका बारमध्‍ये मद्य प्राशन केले. त्‍यानंतर तो गोरेगावला घरी गेला होता. तेथून त्‍याने त्‍याच्‍या चालकाला समवेत घेतले आणि ‘लांब फिरायला जायचे आहे’, असे त्‍याने चालकाला सांगितले. अपघाताची घटना घडली, तेव्‍हा मिहीर शहाने मद्यप्राशन केल्‍याचे पोलिसांनी सांगितले. बारमालकानेही याला पुष्‍टी दिली आहे. सध्‍या मिहीरचा भ्रमणभाष बंद येत आहे. पोलिसांनी मिहीरच्‍या प्रेयसीला कह्यात घेतले आहे. अपघातानंतर गाडीवर असलेले शिवसेना पक्षाचे चिन्‍ह खोडून काढण्‍याचाही प्रयत्न झाला.

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्‍हणाले, ‘‘अपघाताचा हा घृणास्‍पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक लावला असता, तर त्‍या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्‍याच्‍या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात ३०२ चा गुन्‍हा नोंदवला पाहिजे.’’

मुख्‍यमंत्री आणि गृहमंत्री यांचे कारवाईचे आदेश !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिली जाईल’, असे सांगितले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस खात्‍याला स्‍पष्‍ट निर्देश दिले आहेत की, कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी.