सनातन आणि सप्तर्षी !

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’ म्हणजे काय ?

अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्ट्यांवर लिहिलेले असते.

‘जीवनाडीपट्टी’ म्हणजे महर्षि त्या त्या वेळी नाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. वर्तमानकाळात जे आवश्यक ज्ञान आहे, ती अक्षरे ताडपत्रीच्या पट्ट्यांवर उमटत जातात. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून या पट्टीत काय लिहिले आहे, ते सनातनच्या साधकांना समजत आहे. वैश्विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्वामित्र वसिष्ठांना प्रश्न विचारत असतात. २-३ मासांनी सप्तर्षींतील महर्षी पालटतातही.

सनातन आणि सप्तर्षी जीवनाडीपट्टी !

सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातूनच महर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कलियुगातील श्रीविष्णूचा अवतार आहेत !’, असे सांगून त्यांचे अवतारत्व प्रकट केले आहे. आताही वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचे विविध पैलू महर्षींच्या माध्यमातूनच उलगडत आहेत. सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसारच श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गेली १३ वर्षे भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे महर्षि हे वसिष्ठ ऋषीच आहेत.(संदर्भ : sanatan.org)

सप्तर्षी जीवनाडीपट्ट्यांचे सनातनच्या आश्रमात आगमन !

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून २६ मे २०१६ या दिवशी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्ट्यां’चे आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून स्वयं महर्षीच आश्रमात येणार आहेत आणि त्या वेळी काय करायचे ? हे  आधीच महर्षींनी सांगितले होते. स्वागताच्या वेळी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री वेदविज्ञान आश्रमाचे अहिताग्नि सोमयाजी चैतन्य काळेगुरुजी आणि सहकारी ऋत्त्विज यांनी सामगान केले, तसेच पूजन केले.

– श्री. विनायक शानबाग, गोवा (२६.५.२०१६)

सप्तर्षींनी वर्णिलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारकार्याची लीला !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी’ म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे प्रत्यक्ष महर्षींनी उलगडून सांगितलेले एक प्रकारचे अवतारचरित्रच आहे. सप्तर्षि जीवनाडीपट्टीत वसिष्ठ महर्षि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख करतांना नेहमी त्यांना ‘परमगुरुजी’ असे म्हणतात. ‘परमगुरुजी हे स्वतः श्रीमन्नारायणाचा अवतार आहेत’, असे ते विश्वामित्रांना सांगतात.

महर्षि म्हणतात, ‘परमगुरुजींच्या आदेशानेच आमचे कार्य चालू आहे’; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणतात, ‘सप्तर्षि सांगतील तसेच आपल्याला करायचे आहे.’ हीच ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची ‘अवतारमाया’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे कार्य म्हणजे श्रीविष्णूच्या ‘कल्कि’ अवताराच्या कार्याचाच एक अंश !

‘युगानुयुगे काळाला धरून भगवंत अवतारी कार्य करण्यासाठी पृथ्वीवर येतच असतो. सध्या कलियुग चालू असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे श्रीविष्णूच्या ‘कल्कि’ अवताराच्या कार्याचाच एक अंश घेऊन भूमीवर अवतरले आहेत’, असे सप्तर्षी सांगतात.


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे माहात्म्य सांगणार्‍या वसिष्ठ ऋषींच्या चरणी कृतज्ञता !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत’, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व उलगडून सर्वत्र त्यांची कीर्ती करण्याचे दायित्व आता महर्षींनी त्यांच्याकडे घेतले आहे. त्यासाठी सनातनच्या साधकांनी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांचे सर्वस्व आहेत. त्यांची कृपा संपादन करण्यासाठी साधकांनी काय करायला हवे ?, याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करून सप्तर्षींनी साधकांवर अनमोल कृपाच केली आहे. वसिष्ठ ऋषींसह सर्वच सप्तर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंत कोटी कृतज्ञ आहे !

– सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०१७)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे पृथ्वीवर धर्मसंस्थापना करणार असणे !

‘प्रत्येक युगात ‘धर्मसंस्थापना’ करणे’ हे श्रीविष्णूचे कार्य आहे. कलियुगातील श्रीविष्णूचा अवतार, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले होय. योग्य वेळ आणि योग्य प्रसंग येताच श्रीविष्णूचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पृथ्वीवर ‘धर्मसंस्थापना’ करतील’, यात संशय नाही.’ – सप्तर्षी (२६.५.२०२४)

प्रत्येक १ सहस्र वर्षांनी भगवान श्रीविष्णु पृथ्वीवर अवतार धारण करत असणे

प्रत्येक १ सहस्र वर्षांनी भगवान श्रीविष्णु पृथ्वीवर अवतार धारण करतो. तेव्हा पृथ्वीवर असलेल्या लोकांना त्याच्याविषयी कळेलच, असे नाही. गेल्या १ सहस्र वर्षांनंतर भगवंताने ‘गुरुदेव डॉ. आठवले’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या रूपात जन्म घेतला आहे. गुरुदेवांचा जन्म ‘अयोनी संभव’ आणि प्रकाशरूपात झाला आहे. सध्या वैकुंठातील विष्णु संपूर्ण पृथ्वीकडे गुरुदेवांच्या दोन डोळ्यांच्या माध्यमातून बघत आहे.’ – (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४६ (१.६.२०२०))

सप्तर्षींनी अशरिरी वाणीने येऊन परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या खोलीत भेटणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या खोलीचे दार बंद असतांनाही ‘ते उघडून कुणीतरी खोलीत येत आहे’, असे बर्‍याचदा वाटते. याविषयी सांगतांना सप्तर्षि म्हणाले, ‘‘ते म्हणजे आम्हीच असतो. आम्ही अशरिरी वाणीने (सूक्ष्मातून) खोलीत प्रवेश करतो आणि परमगुरुजींना भेटून जातो. गेले २५ वर्षे आम्ही त्यांना असे भेटत आहोत.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म केवळ धर्मसंस्थापनेसाठी झाला असणे

‘श्रीमन्नारायणाचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म केवळ धर्मसंस्थापनेसाठी झाला आहे. धर्मसंस्थापनेला विरोध करणार्‍या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती गुरुदेवांना अनेक प्रकारे त्रास देत आहेत. आतापर्यंत मोठ्या वाईट शक्तींनी गुरुदेवांना त्रास देण्यासाठी योजलेल्या सर्व युक्त्या निष्फळ झाल्या आहेत आणि पुढेही त्यांचे नियोजन निष्फळ होईल. एक दिवस वाईट शक्ती हरतील आणि परात्पर गुरु डॉ. आठवले धर्मसंस्थापना, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करतील.’

– (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९३ (२३.११.२०२१))