‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’वरील ‘मेटा एआय’ अ‍ॅपला हिंदुत्‍वनिष्‍ठ गौतम तिवारी यांची कायदेशीर नोटीस !

हिंदूंच्‍या देवतांचे विडंबनात्‍मक विनोद प्रसारित केल्‍याचे प्रकरण

मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – ‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप’वरील ‘मेटा एआय’ या अ‍ॅपवरून (‘मेटा एआय’ म्‍हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास करणारे तंत्रज्ञान) हिंदूंच्‍या देवतांचे विडंबन करणारे विनोद प्रसारित करण्‍यात आले. हे ‘अ‍ॅप’ प्रसारित करणार्‍या गुरुग्राम हरियाणा येथील ‘मेटा प्‍लॅटफॉर्म आय प्रायव्‍हेट लिमिटेड’ आस्‍थापनाला मुंबईतील हिंदुत्‍वनिष्‍ठ नागरिक गौतम तिवारी यांनी ‘या अ‍ॅपवरून असे विनोद काढून टाकावेत, तसेच हिंदु धर्मियांची क्षमा मागावी’, अशा आशयाची कायदेशीर नोटीस अधिवक्‍त्‍यांद्वारे बजावली आहे. ‘तसे न केल्‍यास कायदेशीर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणीही त्‍यांनी दिली आहे.

कायदेशीर नोटिसीमध्‍ये तिवारी यांचे अधिवक्‍ता प्रकाश साळसिंगीकर यांनी म्‍हटले आहे, ‘‘माझे अशील गौतम तिवारी हे कायद्याचे विद्यार्थी असून यांना ‘मेटा एआय अ‍ॅप’च्‍या अपटेडविषयी ३ जुलै २०२४ या दिवशी त्‍यांच्‍या मित्राकडून माहिती मिळाली. जगातील १९३ देशांपैकी १८० देशांमधील लोक हे ‘अ‍ॅप’ वापरत असल्‍याने त्‍यावरून प्रसारित केल्‍या जाणार्‍या माहितीचा पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याचा लोकांचे वैयक्‍तिक जीवन आणि व्‍यवसाय यांवर परिणाम होत असतो. ‘मेटा एआय अ‍ॅप’द्वारे आपण विचारलेल्‍या माहितीला उत्तर दिले जाते.

‘मेटा एआय अ‍ॅप’वरून अन्‍य धर्मियांचे नव्‍हे, तर केवळ हिंदु धर्माविषयी विनोद प्रसारित

गौतम तिवारी यांनी या अ‍ॅपवरून ‘हिंदूंच्‍या देवतांविषयीचे विनोद’ अशी माहिती विचारल्‍यावर हिंदूंच्‍या देवतांविषयी विविध प्रकारचे विनोद दाखवण्‍यात आले. गौतम यांनी ‘श्रीरामाविषयी विनोद’ असे विचारल्‍यावर अ‍ॅपवर ‘श्रीरामाने युद्ध चालू असतांना शिडी का आणली ? तर त्‍यांना आपला खेळ वरच्‍या पातळीवर नेऊन रावणाचा पराभव करायचा होता’, असे उत्तर दाखवण्‍यात आले; परंतु ‘इतर धर्मांविषयी विनोद’ असे विचारल्‍यावर उत्तर आले की, इतर धार्मिक व्‍यक्‍तींविषयी आपण विनोद सिद्ध करू शकत नाही. दुसर्‍या कोणत्‍याही विषयावर विनोद सिद्ध करण्‍यास तुम्‍हाला साहाय्‍य करू शकतो. मी तसे केले, तर तुम्‍हाला आवडेल का ?


हिंदूंच्‍या देवतांचे हेतूपुरस्‍सर विडंबन !

विनोदाच्‍या माध्‍यमातून हिंदूंच्‍या देवतांचा अवमान होत असल्‍याचे पाहून गौतम तिवारी यांना वाईट वाटले. गौतम तिवारी यांचे म्‍हणणे आहे, ‘‘अशा प्रकारचे विनोद निर्माण करून हिंदूंच्‍या भावना हेतूपूर्वक दुखावल्‍या जात आहेत; कारण ‘हिंदू सहनशील असून या दुष्‍ट हेतूला विरोध करणार नाहीत’, हे असे करणार्‍यांना ठाऊक आहे. हिंदूंच्‍या देवतांविषयी तुम्‍ही विनोद दाखवू शकता; परंतु इतर धर्मांच्‍या संदर्भात दाखवू शकत नाही. हा भेदभाव केल्‍याने हिंदु धर्माची निंदा करून हिंदूंच्‍या भावना दुखावण्‍याचा तुमचा हेतू स्‍पष्‍ट होतो. जगाच्‍या लोकसंख्‍येच्‍या तुलनेत हिंदूंची संख्‍या १५ टक्‍के असली, तरी ती १ अब्‍ज आहे. त्‍यामुळे तुम्‍ही हे प्रसारित करतांना एवढ्या हिंदूंच्‍या भावना दुखावतील, याचा विचार केलेला नाही.

संपादकीय भूमिका

  • धर्महानी रोखण्‍यासाठी कायदेशीर लढा देणारे गौतम तिवारी यांचे अभिनंदन ! असे हिंदुत्‍वनिष्‍ठ हीच हिंदु धर्माची शक्‍ती !
  • हिंदूंच्‍या देवतांचे विडंबन करणार्‍या अशा विविध माध्‍यमांची नोंद घेऊन आता सरकारनेच अशांवर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !