पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरांमध्ये कलम १६३ लागू !

५ हून अधिक लोक एकत्र येण्यावर बंदी !

पुणे – भुशी धरणावर पूर्ण कुटुंब पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे ‘आपदा व्यवस्थापन कायदा २००५’च्या नुसार मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, इंदापूर आणि हवेली भागांमध्ये कलम १६३ लागू करण्यात आले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ३१ जुलैपर्यंत भुशी धरण आणि पवना तलाव परिसरामध्ये पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या आदेशानुसार ५ हून अधिक लोक एकत्र जमण्यावर बंदी, खोल पाण्यात उतरून ‘रील’ बनवणे, छायाचित्र काढणे यांवर बंदी केली आहे.

जानेवारी महिन्यात लोणावळ्यातील पवना तलावाजवळ ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ‘वन्यजीव रक्षक मावळ’ यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च ते जून या कालावधीत मावळच्या जल पर्यटनस्थळांवर २७ जणांना जीव गमवावा लागला आहे. हाच धोका ओळखून जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटनस्थळांवर सूचना फलक लावण्याचे निर्देशही दिले आहेत.

संपादकीय भूमिका :

शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्यामुळे पर्यटनस्थळ परिसरांमध्ये कलम १६३ लागू करावे लागणे दुर्दैवी !