|
मुंबई – सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने घोषित केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ घेण्यासाठी राज्यातील बहुतांश नोंदणी केंद्रांबाहेर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यात अमरावती, यवतमाळ आणि सोलापूर येथील केंद्रांवर दलालांकडून ७०० ते ८०० रुपये घेऊन महिलांची आर्थिक लूट केली जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ जुलै या दिवशी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करून या योजनेच्या नोंदणीसाठी सरकारने ठेवलेली १५ जुलैची अट रहित करण्याची मागणी केली आहे.
१. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचे ‘व्हिडिओ’द्वारे समोर आले.
२. सोलापूर येथेही महिलांनी योजनेसाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी सुविधा केंद्रांवर मोठी गर्दी केली आहे.
३. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण विधासभेत म्हणाले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील नोंदणी केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. सध्या पंढरीची वारी चालू आहे. गावोगावच्या पालख्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले आहे. यात अर्ध्याहून अधिक महिला असतात. १७ जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे वारीत सहभागी झालेल्या महिलांना १५ जुलैपर्यंत आवेदन भरणे शक्य नाही. त्यामुळे आवेदन भरण्यासाठी सरकारने दिलेली मुदत व्यवहार्य नाही. ही योजना सर्वांसाठी खुली असावी. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार मिळाला पाहिजे.