उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. राम कैलास व्यास हा एक आहे !
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. राम कैलास व्यास महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.६.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. राम कैलास व्यास याला आलेल्या अनुभूती, त्याच्यात झालेले पालट आणि त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. धर्माचरण करणे
अ. कु. राम प्रतिदिन मारुतीच्या मंदिरात दिवा लावायला जातो.
आ. तो प्रतिदिन स्वतः शाळेत टिळा लावून जातो आणि इतर मुलांनाही लावायला सांगतो.
शाळेतील मुले आणि शिक्षक यांना टिळा लावण्याचे महत्त्व सांगून त्यांना धर्माचरण करायला सांगणारा कु. राम कैलास व्यास (वय १६ वर्षे )
‘रामला लहानपणापासून टिळा लावण्याची सवय होती. तो शाळेत असतांना एक प्रसंग घडला. तो प्रतिदिन शाळेत टिळा लावून जात होता. त्यामुळे त्याचे मित्रही टिळा लावू लागले. हे पाहून शिक्षकांनी सर्वांना सांगितले, ‘‘उद्यापासून कुणीही टिळा लावायचा नाही.’’ तेव्हा काही मुलांनी घाबरून टिळा लावणे बंद केले; परंतु राम शाळेत कुंकू आणि मेणाची डबी घेऊन गेला. त्याने सर्वांना टिळा लावण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि शिक्षकांनाही धर्माचरण करण्याविषयी सांगितले. त्यानंतर जे शिक्षक आधी विरोध करत होते, तेही शाळेत टिळा लावून यायला लागले.’ – सौ. सुनीता कैलास व्यास
२. नेतृत्वगुण : तो मारुतिमंदिरात इतर मुलांकडून सामूहिक स्वच्छता करून घेतो. तो त्यांच्याकडून सामूहिक प्रार्थना, कृतज्ञता, सामूहिक आरती आणि नामजपही करून घेतो.
३. कर्तेपणा नसणे : शाळेत एखादी स्पर्धा जिंकल्यावर ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला जिंकण्याची संधी मिळाली’, असे तो सांगतो. तो कर्तेपणा स्वतःकडे न घेता परात्पर गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो.
४. खंत वाटणे : त्याला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. तो सांगतो, ‘आई, परात्पर गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ! आपल्याकडून मात्र त्यांचे आज्ञापालन होत नाही.’ अशी खंत तो व्यक्त करतो.
५. इतरांना चुकांची जाणीव करून देणे
अ. राम लहान भाऊ मोठ्याने बोलल्यावर त्याला त्याच्या या चुकीची जाणीव करून देतो.
आ. त्याचे बाबा निरर्थक बोलल्यावर तो त्यांना नामजप करायला सांगतो.
इ. ‘आई गुरुदेवांची सेवा करत असल्याने तिला विरोध करायला नको’, असे तो आजीला प्रेमाने सांगतो.
६. कुटुंबियांना घरकामात किंवा सेवेत साहाय्य करणे
अ. तो देवपूजा आणि आरती करतो.
आ. तो स्वतःचे कपडेही अधूनमधून धुतो.
इ. त्याची आजी वयस्कर असल्याने आजीच्या जेवणाची विचारपूस करतो.
ई. तो घरातील प्रत्येक कृती शिकून घेऊन घरकामात साहाय्य करतो.
उ. मी बाहेर प्रसारात सेवेला गेल्यावर स्वतः घरातील स्वच्छतेच्या सेवा आणि स्वयंपाकही करतो.
७. प्रासंगिक सेवा करणे : जिल्हा किंवा केंद्र येथील समष्टी सेवेत सहभागी होण्याची त्याला आवड आहे. गुरुपौर्णिमा आणि धर्मसभा यांसारख्या प्रासंगिक सेवेत त्याचा सहभाग असतो.
८. कु. राम करत असलले व्यष्टी साधनेचे प्रयत्न : रामकडून प्रतिदिन होणारे साधनेचे प्रयत्न, उदा. नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भाववृद्धीसाठी केले जाणारे प्रयत्न, चुकांचे निरीक्षण, लिखाण आणि क्षमायाचना इत्यादी.
९. कु. राम करत असलले भाववृद्धीचे प्रयत्न : त्याचे भाववृद्धीसाठी प्रयत्न होतात. तो दैनंदिन कृती करत असतांना भाववृद्धीसाठी पुढील प्रयत्न करतो.
९ अ. अभ्यास करतांना : ‘श्री गणराया माझ्याजवळ बसला आहे आणि तो मला पहात आहे.’
९ आ. साष्टांग दंडवत घालतांना : ‘गुरुमाऊली माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद देत आहेत.’
९ इ. अंघोळ करतांना : ‘सप्तनद्यांच्या जलाने मी अंघोळ करत आहे. त्यामुळे माझ्यावर आलेले आवरण दूर होत आहे आणि माझ्या देहाची शुद्धी होत आहे’,
९ ई. तो लहान भावामध्ये श्रीकृष्णाचे रूप बघतो.
९ उ. तो साधकांमध्ये गुरुदेवांचे रूप बघतो.
१०. संतांप्रतीचा भाव : एकदा सद्गुरु जाधवकाकांनी त्याला अभ्यास करतांना प्रार्थना आणि नामजपादी उपाय करायला सांगितले. सद्गुरु जाधवकाकांनी सांगितल्याप्रमाणे त्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू केले. संतांच्या संकल्पाने त्याच्यात पालट दिसून आला. सद्गुरु जाधवकाका यांच्या प्रतीही त्याला कृतज्ञता वाटते. ‘‘आई, सद्गुरुकाकांमध्ये मला परम पूज्य गुरुदेव दिसतात. मला त्यांना पाहून पुष्कळ आनंद वाटतो’’, असे तो सांगतो.
११. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला भाव
अ. घरात असलेले गुरुमाऊलींचे छायाचित्र पाहून तो मला सांगतो, ‘‘आई, गुरुमाऊलींच्या छायाचित्रामध्ये जिवंतपणा जाणवतो.’’
आ. मी बैठकीत प्रार्थना घेत असतांना ‘परम पूज्य माझ्याजवळ आहेत’, असे तो मला सांगतो. त्याला परात्पर गुरुमाऊलींचे अस्तित्व जाणवते.
१२. कु. रामला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१२ अ. जळगाव सेवाकेंद्रात गेल्यावर त्याला सेवाकेंद्राच्या चारही बाजूंना पिवळा प्रकाश जाणवतो.
१२ आ. सुगंधाची अनुभूती येणे : राम सांगतो, ‘‘आई, घरात सुगंध येत आहे.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले की त्याला सुगंधाची अनुभूती येत आहे.
१२ इ. गुरुदेवांचे रूप दिसणे : ‘गुरु मेरी पूजा गुरु गोविंद । गुरु मेरा पारब्रह्म गुरु भगवंत ।।’, या भजनात त्याचा भाव जागृत होतो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू येतात. तेव्हा तो मला सांगतो, ‘‘मला गुरुदेवांचे रूप दिसत आहे.’’
१२ ई. सद्गुरु जाधवकाकांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्याने त्रास न्यून होणे : पूर्वी त्याची स्मरणशक्ती न्यून असणे, त्याला साधना करायला त्रास होणे, झोपेत बोलणे, चेहर्यावर आवरण येणे यांसारखे त्रास व्हायचे. आता त्याचे हे त्रास न्यून झाले आहेत. त्याने सद्गुरु जाधवकाकांनी सांगितल्याप्रमाणे घरात परम पूज्य भक्तराज महाराज यांची (बाबांची) भजने लावणे, ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या पुस्तिकेत स्वतःचे छायचित्र ठेवणे, कापूर आणि अत्तर यांसारखे आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. त्यामुळे आता त्याला ते त्रास होत नाहीत. सद्गुरु जाधवकाकांच्या संकल्पाने ते साध्य झाले आहे.’
१३. स्वभावदोष : तत्परतेने कृती न करणे आणि स्वभावदोषांचे लिखाण करायला चालढकलपणा करणे
१४. कु. राममध्ये झालेले पालट : रामचा नम्रपणा, प्रेमभाव आणि इतरांना समजून घेण्याचा भाग वाढला आहे. अगोदर बोलण्याचा भाग अधिक होता. तो आता न्यून झाला आहे. तो सतत आनंदी असतो.’
– सौ. सुनीता कैलास व्यास (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), चोपडा, जिल्हा जळगाव. (३.३.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |