‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ यांचे विधान
नवी देहली – अमेरिकेच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळ स्थानकातून परत पृथ्वीवर येण्यात अडथळा निर्माण झाल्याने जगात चर्चा चालू आहे. त्या गेल्या १७ दिवसांपासून तेथे अडकल्या आहेत. सुनीता यांना परत आणण्याचा प्रयत्न अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’चे प्रमुख डॉ. एस्. सोमनाथ यांनी सांगितले की, हा केवळ सुनीता विल्यम्स किंवा इतर कोणत्याही अंतराळविराचा विषय नाही. अंतराळ स्थानकामध्ये अडकणे हे चर्चेचे सूत्र नाही. तेथे सध्या ९ अंतराळवीर आहेत. ते सगळेच अडकलेले नाहीत. सर्व अंतराळविरांना एक दिवस परत यावे लागेल. हे संपूर्ण प्रकरण ‘बोईंग स्टारलाईनर’ नावाच्या नवीन क्रू मॉड्यूलच्या (अंतराळात जाण्याची आणि नंतर सुरक्षितपणे परत येण्याची क्षमता) चाचणीशी संबंधित आहे.
डॉ. सोमनाथ पुढे म्हणाले की, आम्हीही एक क्रू मॉड्यूल बनवत आहोत आणि त्यामुळे त्यांच्याशी कोणत्या प्रकारचे संभाषण झाले असेल हे मी समजू शकतो. आम्हाला अनुभव आहे; पण सुनीता यांना आमच्यापेक्षा अधिक अनुभव आहे.
काय आहे प्रकरण ?
सुनीता विल्यम्स ५ जून २०२४ या दिवशी ‘बोईंग स्टारलाइनर’ नावाच्या अंतराळयानाने अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. हे अमेरिकी विमान आस्थापन ‘बोईंग’ आणि ‘नासा’ यांचे संयुक्त ‘क्रू फ्लाईट टेस्ट मिशन’ आहे. यामध्ये सुनीता या यानाच्या वैमानिक आहेत. त्यांच्यासोबत आलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर आहेत. ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’मध्ये ८ दिवसांच्या मुक्कामानंतर हे दोघेही १३ जून या दिवशी पृथ्वीवर परतणार होते; परंतु अंतराळ यानामधील तांत्रिक समस्या आणि हेलियम वायूची गळती यांमुळे हे अद्याप झाले नाही. याविषयी नेमके कारण सांगण्यात आलेले नाही. हे यान परत आल्यास आग लागण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे.