इंदूर (मध्यप्रदेश) – येथील खजराना मंदिरात ३० मुसलमानांनी विधीपूर्वक हिंदु धर्मात प्रवेश केला. या वेळी येथे यज्ञही करण्यात आला. त्यात हिंदु धर्मात प्रवेश केलेल्या सर्वांनी भाग घेतला होता. याआधी या ३० जणांनी गंगाजल आणि गोमूत्र यांसह देशातील १० विविध नद्यांच्या पाण्याने स्नान केले. या लोकांनी त्यांचे धर्मांतर कायदेशीर करण्यासाठी इंदूरच्या जिल्हाधिकार्यांकडे अर्जही केला आहे. त्यांचा हिंदु धर्मातील प्रवेश विश्व हिंदु परिषदेच्या नेत्यांच्या संरक्षणात झाला.
विहिंपचे माळवा राज्यप्रमुख संतोष शर्मा यांनी सांगितले की, हे सर्व लोक स्वेच्छेने हिंदु धर्मात आले आहेत. हिंदु धर्मात परत येण्यासाठी या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला होता. यानंतर त्यांच्यासाठी विधींची व्यवस्था करण्यात आली. ते सर्व जन्माने मुसलमान होते आणि आता हिंदु झाले आहेत. आमच्या संपर्कात अजूनही बरेच लोक आहेत, ज्यांना हिंदु धर्मात यायचे आहे. त्यांनाही लवकरच आणले जाईल.