‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी (२७.६.२०२४) करावे लागलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

‘२७ जून २०२४ हा रामनाथी, फोंडा, गोवा येथील रामनाथ देवस्थानच्या सभागृहात होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा चौथा दिवस होता. हा महोत्सव हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये हिंदुत्वनिष्ठांचे विचारमंथन करण्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ने आयोजित केला होता. या दिवशी मला कराव्या लागलेल्या नामजपादी आध्यात्मिक उपायांच्या संदर्भातील माहिती येथे देत आहे. हे आध्यात्मिक उपाय म्हणजे वाईट शक्ती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये विघ्ने आणण्यासाठी करत असलेली आक्रमणे मोडून काढण्यासाठी ईश्वरकृपेने केलेली आध्यात्मिक आणि सूक्ष्म स्तरावरील उपाययोजना होती.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे विषय मांडण्यासाठी उभे राहिल्यावर त्यांच्या डोक्यावर वाईट शक्ती आक्रमण करू लागणे; पण श्री. चेतन यांच्या उच्च आध्यात्मिक पातळीमुळे विषय मांडतांना त्यांना कोणताही अडथळा न येणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी हे आक्रमण थांबवता येणे

या दिवशी महोत्सवात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैचारिक आंदोलन’, हा यातील पहिल्या सत्राचा विषय होता. यामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे ‘वैचारिक आंदोलनाची दिशा’, याविषयी मार्गदर्शन करणार होते. ते मार्गदर्शनासाठी उभे राहिल्यावर वाईट शक्तींनी त्यांच्या डोक्यावर त्रासदायक (काळ्या) शक्तीचा प्रवाह सोडण्यास आरंभ केल्याचे मला जाणवले. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर नाकापर्यंत त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते; म्हणून मी त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करायला आरंभ केला. मी माझा डावा तळहात भूमीच्या दिशेने आणि त्यावर माझा उजवा तळहात आकाशाच्या दिशेने ठेवून ‘ॐ’ हा नामजप करू लागलो. त्यामुळे ५ मिनिटांनी श्री. चेतन यांच्या डोक्यावरील दाब पुष्कळ प्रमाणात न्यून झाला, तसेच मी विश्वातील चैतन्यशक्ती आणि प्राणशक्ती यांना प्रार्थना केली, ‘तुमचा प्रवाह श्री. चेतन यांच्या मस्तकावर येऊ दे आणि त्यांचे रक्षण होऊ दे.’ ही प्रार्थना केल्यावर त्यांच्यावर होत असलेले वाईट शक्तींचे आक्रमण थांबले. श्री. चेतन मांडत असलेला विषय ज्वलंत आणि बौद्धिक स्तरावरचा होता. त्यामुळे त्यांना हा विरोध होत होता. त्यांना जरी हा विरोध झाला, तरी आरंभापासूनच त्यांच्या बोलण्यावर किंवा विचार मांडण्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. याचे कारण म्हणजे त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, म्हणजे चांगली आहे. यामुळे त्यांच्याभोवती गुरुकृपेचे कवच आहे.

२. आपल्या मार्गदर्शनात ‘हिंदुत्वाविषयी परिपूर्ण आणि सखोल अभ्यास करून उपाययोजना मांडणे’, ही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची हातोटी असल्याने त्यांच्यावर वाईट शक्तींनी पुनःपुन्हा आक्रमणे करणे

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैचारिक आंदोलन’, या उद्बोधन सत्रात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही ‘हिंदूविरोधी रचलेल्या खोट्या कथानकांना प्रत्युत्तर देणे’, यावर प्रबोधन करणार होते. त्यामुळे तेही व्यासपिठावर होते. त्यांच्याकडे बघून ‘त्यांना त्रास होत आहे’, असे मला जाणवले. ‘त्यांना आपले विचार मांडतांना त्रास होऊ नये’, यासाठी मी त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करणे आरंभ केले. मला त्यांच्या संपूर्ण चेहर्‍यावर पुष्कळ जाड थर असलेले त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण असल्याचे जाणवले. ‘मी माझा देह हा त्यांचाच देह आहे’, असा भाव ठेवून माझ्या देहावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. प्रथम मी ‘माझा डावा तळवा माझ्या देहाकडे आणि त्यावर माझा उजवा तळवा बाहेरच्या दिशेने, अशी मुद्रा केली. ती मुद्रा मी माझे सहस्रारचक्र, आज्ञाचक्र आणि डोक्याची मागची बाजू यांच्यासमोर १ – २ सें.मी. अंतरावर धरली अन् त्या प्रत्येक स्थानी ती १ – २ मिनिटे ठेवून ‘निर्गुण’ हा नामजप केला. एकूण ५ मिनिटे असे उपाय केल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण पुष्कळ निवळले; पण आता आवरण श्री. रमेश यांच्या शरिराच्या मध्यभागी पट्ट्याच्या स्वरूपात मला जाणवले. त्यामुळे मी सहस्रार ते स्वाधिष्ठान या सर्वच चक्रांवर त्या मुद्रेने उपाय केले. यासाठी मला १० मिनिटे लागली. आता मला श्री. रमेश यांच्या केवळ डोळ्यांवर आवरण जाणवले. मी डोळ्यांवरही उपाय केले. त्यानंतर ५ मिनिटांनी ते आपला विषय मांडायला उभे राहिले. तेव्हा पुन्हा त्यांचे डोळे आणि कपाळ यांवर मला आवरण जाणवले; म्हणून मी त्यांच्यासाठी पुन्हा उपाय केले. हे उपाय पूर्ण झाल्यावर ५ मिनिटांनी पुन्हा श्री. रमेश यांच्या डोळ्यांवर मला आवरण जाणवले. त्यामुळे मी पुन्हा त्यांच्यासाठी उपाय केले. अशा तर्‍हेने वाईट शक्ती श्री. रमेश यांच्यावर पुनःपुन्हा आक्रमण करत होत्या. यावरून लक्षात येते की, श्री. रमेश मांडत असलेला विषय किती महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी होता. श्री. रमेश शिंदे हे नेहमी ‘चालू घडीला हिंदूंवर संपूर्ण जगामध्ये कशा प्रकारे खोटी कथानके रचून वैचािरक आक्रमणे होत आहेत’, याचा अभ्यास करून विषय मांडतात. ‘परिपूर्ण आणि सखोल अभ्यास करणे आणि उपाययोजना मांडणे’, ही त्यांची हातोटी आहे.

३. महोत्सवाच्या दुपारच्या सत्रात उपस्थित सर्व धर्मप्रचारक संतांना ग्लानी येत असणे आणि त्यांच्यावर आवरण आणून वाईट शक्तींनी समष्टी आक्रमण केलेले असणे

महोत्सवाच्या दुपारच्या सत्रात मला कळवण्यात आले, ‘उपस्थित सर्व धर्मप्रचारक संतांना ग्लानी येत आहे.’ वाईट शक्तींनी केलेले हे समष्टी आक्रमण होते. याचा अर्थ वाईट शक्तींनी आपल्या आक्रमणाचा जोर वाढवला होता. मी आध्यात्मिक उपायांना आरंभ केला. संपूर्ण शरिरावर आवरण आणून वाईट शक्ती असे आक्रमण करतात; म्हणून मी ‘मनोरा मुद्रेने’ (दोन्ही हातांच्या मधल्या बोटांची टोके जुळवून आणि दोन्ही हातांची मनगटे थोडी अलग ठेवून ती मुद्रा शरिरावर त्रास असलेल्या ठिकाणी धरणे किंवा शरिरावरून फिरवणे) कुंडलिनीचक्रांवर उपाय केले. ही मुद्रा आणि नामजप करणे, यांमुळे ईश्वराकडून चैतन्याचा स्रोत जुळवलेल्या मधल्या बोटांच्या ठिकाणी आकर्षित होतो अन् तो ज्या दिशेने मुद्रा धरू, तेथे पसरून तेथील त्रासदायक शक्ती नष्ट करतो. मनोरा मुद्रा करून उपाय करतांना मी ‘निर्गुण’ हा नामजप केला. हे उपाय १० मिनिटे केल्यावर सर्व संतांवरचे आवरण दूर झाल्याचे जाणवले.

४. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ताप आल्याने त्यांच्यासाठी उपाय केल्यावर त्यांना बरे वाटू लागणे आणि त्यामुळे त्यांना महोत्सवाच्या पुढच्या सत्रात सहभागी होता येणे

समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना दुपारी १२ वाजता ताप आला; म्हणून त्यांनी दुपारी विश्रांती घेतली. दुपारी ४.३० वाजता मी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा ते मलूल दिसले. मी त्यांना अग्निहोत्राची विभूती लावायला दिली आणि त्यांच्यासाठी ध्यान लावून २० मिनिटे उपाय केले. त्यानंतर त्यांना ‘आपल्या दोन्ही पायांतून काहीतरी त्रासदायक निघून गेले आहे’, असे जाणवून बरे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी दुपारी ५ वाजता आरंभ होणार्‍या सत्राला जायचे ठरवले.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.६.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.