साधना आणि धर्मकार्य यांचे महत्त्व सांगून कार्यालयातील धर्मप्रेमी कर्मचार्‍यांना धर्मकार्यात सहभागी करून घेणारे तिरोडा (जिल्हा गोंदिया) येथील श्री. रवींद्र भोंडेकर !

श्री. रवींद्र भोंडेकर

‘श्री. रवींद्र भोंडेकर हे अभियंता असून सध्या तिरोडा (जिल्हा गोंदिया) येथील ‘अदाणी पॉवरप्लांट’ या आस्थापनात उच्च पदावर नोकरी करत आहेत. यापूर्वी ते गुजरात राज्यात याच आस्थापनात नोकरी करायचे. ते पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संप्रदायानुसार साधना करतात. ते गुजरातमध्ये असतांना सनातन संस्थेच्या संपर्कात आले. त्यांनी कुलदेवता आणि दत्त या देवतांच्या नामजपाला आरंभ केला. हे जप केल्यामुळे त्यांना काही अनुभूती आल्या. त्यामुळे त्यांची सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा वाढली. त्यांचे तिरोडा येथे स्थानांतर झाल्यानंतरही त्यांनी साधना चालू ठेवली आहे.

पू. अशोक पात्रीकर

त्यांच्या कार्यालयात काही धर्मप्रेमी कर्मचारी आहेत. त्यांच्यापैकी ३ धर्मप्रेमींना त्यांनी साधना आणि धर्मकार्य यांचे महत्त्व सांगितले. मागील वर्षी ते या ३ धर्मप्रेमींना नागपूर येथील धर्मप्रेमींच्या कार्यशाळेला घेऊन आले होते. त्यानंतर त्या धर्मप्रेमींनी त्यांच्या गावातील आणि पंचक्रोशीतील धर्मप्रेमींना धर्मकार्यात सहभागी करून घेतले अन् त्यांच्यापैकी एका धर्मप्रेमीच्या गावात लहान हिंदु-राष्ट्रजागृती सभेचे आयोजन केले. वर्ष २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या एका शिबिराला त्यांनी ४ धर्मप्रेमींना पाठवण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे ते सर्व धर्मप्रेमी ‘निवेदने देणे, फलकप्रसिद्धी करणे, हस्तपत्रकांचे वितरण करणे, भित्तीपत्रके लावणे’, अशा सेवा आनंदाने करत आहेत.

श्री. भोंडेकर स्वतः व्यष्टी साधना नियमित करतात आणि आढावाही देतात. ते सतत धर्मप्रेमींच्या संपर्कात असतात आणि त्यांना वेळोवेळी धर्मकार्याविषयी अवगत करत असतात, तसेच त्यांच्या साधनेचा आढावाही घेतात.’

– (पू.) अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७४ वर्षे), अमरावती (४.६.२०२४)