मुलांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा ! – गुरु माँ भुवनेश्वरी पुरी, संस्थापक, श्रीकुलम् आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालय, उदयपूर, राजस्थान

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव तृतीय दिन (२६ जून) : भारतीय शिक्षणपद्धती

गुरु माँ भुवनेश्वरी पुरी

विद्यार्थी अन्य बर्‍याच गोष्टी शिकतात; मात्र त्यांना धर्मशिक्षण मिळत नाही. लहान वयातच विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण द्यायला हवे. नमस्काराची योग्य पद्धत, जपमाळ कशी ओढावी ? प्रदक्षिणा कशी घालावी ? कुलदेवतेचा नामजप का करावा ? आपले राष्ट्रपुरुष कोणते ? देवीदेवता कोणत्या ? याची माहिती मुलांना बालवयातच द्यायला हवी. धर्मशिक्षणासाठी छोटे-छोटे अभ्यासक्रम (कॅप्सुल कोर्स) सिद्ध करायला हवेत. काँन्व्हेंट किंवा खासगी शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे; कारण त्यांना धर्मशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. धर्मशिक्षणासह छोट्या-छोट्या गुरुकुलांची निर्मिती करायला हवी.

आम्ही ३ मुलांपासून गुरुकुल चालू केले. आता आमच्या गुरुकुलात येण्यासाठी पालक रांग लावतात. सद्यस्थितीत ‘इंग्रजी बोलायला येण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार व्हावेत’, असे पालकांना वाटते. विद्यार्थ्यांना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हिंदु  मुलांना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी सर्व संतांनी योगदान द्यावे. प्रत्येकाने किमान ५ जणांना धर्मशिक्षण द्यायला हवे. मुलांना धर्मशिक्षण दिल्यास मिशनर्‍यांचे धर्मांतराचे कार्य आपोआप बंद होईल.

सनातन संस्थेकडूनच शास्त्रीय भाषेत मिळते धर्मशिक्षण !

अनेक संस्थांकडून धर्मशिक्षण दिले जाते; मात्र त्यांमध्ये धर्मविषयक पूर्ण माहिती नसते. बहुतांश ठिकाणी संप्रदायाची माहिती असते. केवळ सनातन संस्थेकडूनच परिपूर्णतेने आणि शास्त्रीय आधारावर धर्मशिक्षण दिले जाते, असे गौरवोद्गार गुरु माँ भुवनेश्वरी पुरी यांनी काढले.


ईश्वराचे स्मरण करत केलेल्या कार्याची भरभराट होते ! – स्वामी समानंदगिरी महाराज

स्वामी समानंदगिरी महाराज

भारत एक आध्यात्मिक देश आहे. येथील कार्य ईश्वरी शक्तीवर चालू आहे. येथे एक दिव्य संकल्प कार्यरत झाला आहे. भगवान श्रीकृष्णाने यज्ञाच्या माध्यमातून चांगले जीवन जगण्याची प्रणाली मनुष्याला दिली. भगवान श्रीकृष्णाने वेदांचे ज्ञान भगवद्गीतेतून सर्वांपर्यंत पोचवले आहे. यज्ञ, दान आणि तप यांच्या माध्यमातून मानव ईश्वराशी जोडला जाऊ शकतो. त्या माध्यमातून मानव आध्यात्मिक उन्नती साधू शकतो; मात्र मानव हे मूळ सोडून जीवन जगू लागला, तर तो जीवनात भरकटला जाऊ शकतो. आध्यात्मिक शक्तीच्या बळावर चालू असलेले कार्य अधिक गतीने वाढते. ईश्वराचे स्मरण करत केलेल्या कार्याची भरभराट होते, असे उद्गार महेश्वर, मध्यप्रदेश येथील संवित् गंगायन ट्रस्ट, हरिद्वारचे ट्रस्टी स्वामी समानंदगिरी महाराज यांनी येथे काढले.

ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही ऋषींनी सिद्ध केलेली प्रगत संस्कृती आहे. येथे कुठलेही दिव्य कार्य करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती लागते. शास्त्राला अनुसरून कार्य केल्यास आपण गुरूंची शक्ती प्राप्त करू शकतो. सात्विक कार्य केल्याने ईश्वराची शक्ती आपणामध्ये संक्रमित होते. मन तेजस्वी बनते. कार्य श्रद्धापूर्वक आणि रहस्य जाणून केल्यास ते कार्य फलश्रुत होते.


हिंदु राष्ट्राला लागलेले ग्रहण दूर करावे लागेल ! – डॉ. देवकरण शर्मा, संस्थापक, सप्तर्षि गुरुकुल, उज्जैन

डॉ. देवकरण शर्मा

भारत हा सृष्टीच्या स्थापनेपासून ‘हिंदु राष्ट्र’ होता,  तो आज आहे आणि जोपर्यंत चंद्र, सूर्य अन् हिमालय राहील, तोपर्यंत तो हिंदु राष्ट्रच राहील. हिंदु राष्ट्र सूर्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागल्यामुळे किंवा त्याच्यासमोर ढग आल्यामुळे त्याचा प्रकाश मिळणे बंद होते, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राला ग्रहण लागले आहे. ते ग्रहण दूर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सप्तर्षि गुरुकुलचे संस्थापक डॉ. देवकरण शर्मा यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या तिसर्‍या दिवशी केले.

डॉ. शर्मा म्हणाले, ‘‘शिक्षण बिघडले, तर दर्शन बिघडते, दर्शनाने विचार बिघडतात आणि विचाराने कर्म बिघडते. जेव्हा शिक्षण व्यवस्था चांगली होती, तेव्हा भारत जगद्गुरु होता. जेव्हा भारतात मेकॉले शिक्षणपद्धती चालू झाली, तेव्हापासून शिक्षणाचे पतन झाले आणि त्यामुळे देशाचेही पतन झाले. मोगलांच्या काळातही राजा छत्रसाल, छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्ये ‘हिंदु राष्ट्र’ होती. ‘वसुधैव कुटुंबकम्’, असे हिंदूंखेरिज कुणी म्हणू शकत नाही. तेवढे उदार मन आणि व्यापकत्व संपूर्ण जगात नाही. आध्यात्मिक शक्तीद्वारेच क्षमा, शांती आणि अहिंसा यांचे ज्ञान होते. या गोष्टी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रातून शिकल्या पाहिजेत. ते तत्त्व समजणे, हे शिक्षण आहे. भारतात गुरुकुल शिक्षणपद्धती चालू होईल. तेव्हा हिंदु राष्ट्राला चमक येईल.’’


‘कर्ता भगवंत आहे’, हे श्रीकृष्णाचे वचन लक्षान ठेवून धर्मकार्य करा ! – रस आचार्य डॉ. धर्मयश, संस्थापक, धर्म स्थापनम् फाऊंडेशन, इंडोनेशिया

रस आचार्य डॉ. धर्मयश

विद्याधिराज सभागृह – भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे, ‘तू केवळ निमित्तमात्र आहेस. करविता मी आहे.’ धर्मकार्य करतांना भगवान श्रीकृष्णाचे हे वचन हिंदूंनी लक्षात ठेवावे. भगवंतावर ठाम विश्वास ठेवूनच हिंदूंनी धर्मकार्य करावे. इंडोनेशियामध्ये एकदा धर्मप्रसारासाठी जंगलातून ग्रंथ घेऊन जात असतांना ३०० जणांनी दगड आणि शस्त्रे घेऊन माझ्यावर आक्रमण केले; परंतु त्या परिस्थितीत केवळ भगवंताने माझे रक्षण केले. धर्मकार्य करतांना भगवंताला विसरू नका. केवळ हिंदु धर्म हाच जगाचे कल्याण करणारा धर्म आहे. अशा धर्माचा आपण प्रसार करायला हवा. साधुसंतांनीही या धर्माचे पालन केले. अध्यात्म समजून घेऊन साधुसंतांचे अनुसरण करायला हवे.

इंडोनेशियामध्ये आम्ही भगवद्गीतेचा प्रसार करत आहोत. ८ ते १० सहस्र नागरिक एकत्र येऊन आम्ही भगवद्गीतेचे पठण करतो. धर्माचे पालन केले, तर अर्थ, काम आणि यश प्राप्त होते; मात्र त्याची कामना करून धर्मपालन करू नका. निरपेक्षपणे सनातन धर्माची सेवा करायला हवी. आपल्या पूर्वजांनी ज्या संस्कृतीचे पालन केले, त्या संस्कृतीचा आम्ही इंडोनियाशियामध्ये प्रसार करत आहोत. सकाळी स्नान करूनच भोजन बनवणे, ईश्वराची आराधना करूनच कार्याला प्रारंभ करणे आदी आपल्या संस्कृतीचा प्रसार आम्ही करत आहोत.

संत सन्मान !

मध्यप्रदेश येथील संवित् गंगायन ट्रस्टचे प्रबंध न्यासी महंत स्वामी समानंदगिरी महाराज यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आिण राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी, तर उदयपूर (राजस्थान) येथील श्रीकुलम आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालयाच्या संस्थापिका गुरु माँ भुवनेश्वरी पुरी यांचा सन्मान सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केला.