रामनाथी (गोवा) – सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. हे कार्य पूर्वी पुष्कळ दूरवरून पहात होतो. आश्रम शिस्तबद्ध असून पुष्कळ शिकायला मिळाले. आश्रमात जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करीन. येथे येऊन वेळ सत्कारणी लागला. गोव्यातील मंदिरे बघता बघता सनातन आश्रम बघितला, तेव्हा खर्या अर्थाने गोवादर्शन झाले. आश्रमात आम्ही जे शिकलो, ते आम्ही येत्या काळात आचारणात आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही येथे येऊन उपकृत झालो, असे उद्गार वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि अर्ध्वयू ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी काढले.
२४ ते ३० जून या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर गोवा येथे आले होते. २४ जून या दिवशी त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यानिमित्त सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ,आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी ‘व्यसनमुक्ती महासंघा’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. दीपक जाधव यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी सनातनचे साधक श्री. अविनाश जाधव यांनी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना आश्रमात चालणार्या कार्याविषयी माहिती दिली.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार असून ते समाज प्रबोधनाचे मोठे काम करतात. वर्ष १९९६ मध्ये त्यांनी ‘व्यसनमुक्त महासंघा’ची स्थापना केली. ही संस्था व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना त्यातून बाहेर काढण्यासाठी काम करते.