Golden Temple Yoga : सुवर्ण मंदिराच्‍या आवारात योगासने करणार्‍या हिंदु महिलेच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार

महिलेने मागितली क्षमा

सुवर्ण मंदिराच्‍या परिसरात योगासने करणार्‍या अर्चना मकवाना

अमृतसर (पंजाब) – सुवर्ण मंदिराच्‍या परिसरात योगासने करणार्‍या आणि त्‍याची छायाचित्रे सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणार्‍या अर्चना मकवाना या महिलेविरुद्ध शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली आहे. यात मकवाना यांनी धार्मिक भावना दुखावल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. या प्रकरणी मकवाना यांनी क्षमा मागितली असून ‘कुणाच्‍याही धार्मिक भावना दुखावण्‍याचा माझा हेतू नव्‍हता’, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. २१ जून या दिवशी म्‍हणजे आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त त्‍यांनी सुवर्ण मंदिरात जाऊन प्रदक्षिणा मार्गावर योगासने केली होती. या प्रकरणी समितीने ३ कर्मचार्‍यांना निलंबित केले होते.

समितीचे प्रमुख हरजिंदर सिंह धामी यांनी सांगितले की, मकवाना यांच्‍यावर कारवाई करण्‍यासाठी पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार पाठवण्‍यात आली आहे. काही लोक या पवित्र स्‍थानाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जाणूनबुजून दुर्लक्षित करून आक्षेपार्ह कृत्‍य करतात. या कृतीमुळे शिखांच्‍या भावना आणि सन्‍मान दुखावला गेला आहे. त्‍यामुळे पोलिसांकडे तक्रार करण्‍यात आली आहे.

मकवाना यांनी क्षमा मागतांना म्‍हटले की, गुरुद्वारा साहिब परिसरात योगाभ्‍यास करणे काही लोकांसाठी आक्षेपार्ह असू शकतो हे मला ठाऊक नव्‍हते. कुणाला दुखवण्‍याचा माझा हेतू नव्‍हता. मी मनापासून क्षमा मागते आणि भविष्‍यात अधिक काळजी घेण्‍याचे वचन देते. कृपया माझी क्षमा स्‍वीकारा.

संपादकीय भूमिका

‘या विरोधामागे खलिस्‍तानी मानसिकता आहे का ?’, याचाही विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे !