वैद्यकीय प्रवेशाचा ‘नीट’ गोंधळ !

वैद्यकीय प्रवेशासाठी ५ मे २०२४ या दिवशी घेतलेल्या ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेचा ४ जून २०२४ या दिवशी जो निकाल लागला, तो विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा, त्यांच्या कष्टावर पाणी फेरणारा आणि पालकांसाठीही त्रासदायक ठरला आहे. या निकालाच्या विरुद्ध अनेक विद्यार्थी, पालक आणि काही शिकवणीवर्ग चालक सर्वाेच्च न्यायालयात गेले आहेत.

१. निकालातील काही धक्कादायक गोष्टी

या वेळी गुणवत्ता सूचीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले ६७ विद्यार्थी आहेत, म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. वर्ष २०१९ पासून असे कधी झाले नाही. केवळ २ अथवा ३ जण गुणवत्ता सूचीत प्रथम यायचे, या वेळी एवढ्या मोठ्या संख्येत आले आहेत. हे कोणत्याही प्रकारे अशक्य नव्हे, तर गडबड झाली आहे. हरियाणाच्या झ्झजर या एकाच परीक्षा केंद्रावर ६ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आहेत. हरियाणातील ज्या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत, त्यांच्या परीक्षा क्रमांकात २-३ आकड्यांचाच भेद आहे, म्हणजे ते एका मागोमाग असे बसल्याचे लक्षात येते. हे कसे शक्य आहे ?

श्री. यज्ञेश सावंत

गुणवत्ता सूचीत काही मुलांनी गुण ७१८ आणि ७१९ असे मिळवले आहेत. नीट परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’, म्हणजे चुकीच्या उत्तराला १ गुण अल्प होतो आणि प्रश्न सोडून दिला, तर ४ गुण अल्प होतात, असे आहे, तर असे वेगळेच गुण कसे देण्यात आले आहेत ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

या वर्षी ‘कट ऑफ’, म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी कमीत कमी गुण ६६० च्याही पुढे आहेत. गत वर्षी ६२० ते ६४० च्यामध्ये होते. केवळ एका वर्षात असे गुण कसे वाढले की, ‘कट ऑफ’ एवढा वर ठेवावा लागत आहे. विद्यार्थ्यांना एवढे ज्यादा गुण एका वर्षात एकदम कसे वाढले ? परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या १० ते २० टक्क्यांनी प्रत्येक वर्षी वाढते, तर उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही वाढते; मात्र अधिक गुण प्राप्त करणार्‍यांची संख्या एवढी वाढत नाही. परिणामी जे प्रवेश सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ६२० ते ६४० गुण मिळवून मिळायचे, ते या वर्षी मिळणार नाहीत, असा दुसरा अर्थ आहे.

२. परीक्षेचा आवाका या वर्षी नीट परीक्षेसाठी ४ सहस्र ७५० केंद्रांवर २३ लाख

३३ सहस्र विद्यार्थी बसले होते आणि त्यापैकी १३ लाख ५० सहस्र विद्यार्थी परीक्षा उर्त्तीण झाले. ५ मे या दिवशीच ही परीक्षा घेणार्‍या एन्.टी.ए.ने (‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने – राष्ट्रीय चाचणी यंत्रणेने) प्रसिद्धीपत्रक काढले की, राजस्थान येथील सवाई माधोपूर येथे पेपर मिळण्यास विद्यार्थ्यांना विलंब झाला आहे.

त्यानंतर जेव्हा निकाल हाती आले, तेव्हा ६७ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाल्याचा धक्कादायक निकाल आला. तेव्हा ‘एन्.टी.ए.’चे स्पष्टीकरण होते की, ४४ विद्यार्थ्यांना ‘ग्रेस मार्क’ (वाढीव गुण) दिले आहेत. नंतर याविषयी पुन्हा ‘एन्.टी.ए.’ला विचारण्यात आले, तेव्हा त्यांच्याकडून ‘१ सहस्र ५६३ विद्यार्थ्यांना ‘ग्रेस मार्क’ देण्यात आले आहेत, त्या व्यतिरिक्त नाही’, असे उत्तर आले. ‘ग्रेस मार्क’ देण्याच्या कारणांमध्ये परीक्षा चालू होण्यास विलंब झाला, एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये अयोग्य पर्याय दिले’, इत्यादी कारणे सांगण्यात आली. ‘ज्या ६७ विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आहेत, त्यापैकी ४४ जणांनी भौतिकशास्त्राचा पेपर फेरपडताळणीसाठी दिला होता. ६ जणांचा वेळ वाया गेल्याने अतिरिक्त गुण देण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांचे गुण फेरपडताळणीमुळे वाढले’, असा खुलासा ‘एन्.टी.ए.’ने केला आहे.

‘आता असे गुण देण्याची व्यवस्था आहे का ?’, तर यावर उत्तर असे की, ‘एन्.टी.ए.’च्या नियमावलीत असे कुठलेच प्रावधान (तरतूद) नाही. हे गुण ‘एन्.टी.ए.’ने दिले, ते सर्वाेच्च न्यायालयाच्या वर्ष २०१८ च्या एका राष्ट्रीय स्तरावर परीक्षेविषयी झालेल्या निकालाचा आधार धरून दिले आहेत. वास्तविक ही परीक्षा ‘ऑनलाईन’ स्वरूपाची होती आणि ‘नीट’ची परीक्षा ‘ऑफलाईन’, म्हणजेच प्रत्यक्ष असते. त्यामुळे तो निकाल येथे लागू होत नाही. ‘ग्रेस मार्क’ देण्याचीच मोठी चूक ‘एन्.टी.ए.’कडून झाली, असे म्हणता येईल. बरं ‘ग्रेस मार्क’ कसे दिले ? यालाही काही नियम नाही, म्हणजे ‘त्यांच्या म्हणण्यानुसार १० मिनिटे विलंब झाला, तर ४० गुण थेट वाढवले आहेत, तर अंधेरीतील केंद्रावर २० मिनिटे विलंब झाला, कोझीकोड वगैरे केंद्रांवर १ घंटा प्रश्नपत्रिका देण्यास विलंब झाल्याच्या बातम्या आहेत, तर मुलांना न लिहिता सर्वच गुण ग्रेस म्हणून देणार का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो.

आता काही दिवसांपूर्वीच ज्या १ सहस्र ५६३ विद्यार्थ्यांना ‘ग्रेस मार्क’ मिळाले, ते सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रहित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

३. पेपर फुटल्याचे मान्य का करत नाही ?

ज्या दिवशी परीक्षा होती, त्या दिवशी पाटणा (बिहार) येथे १३ व्यक्तींना पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पेपर ३० लाख रुपये देऊन विकण्यात येत होता. परीक्षेपूर्वी १० लाख आणि परीक्षा झाल्यावर उर्वरित रक्कम द्यायची, असे पेपर फोडणार्‍यांचे म्हणणे होते.

विशाल चौरासिया नावाच्या कुख्यात गुन्हेगाराचा एक व्हिडिओ प्रसारित होत आहे, ज्यात तो सांगत आहे, ‘नीट’चा पेपर १ दिवस आधी ‘लिक’ होणार आहे.’ विशाल चौरासिया याने आतापर्यंत काही शासकीय परीक्षांचे पेपर फोडले आहेत. त्यासाठी तो कारागृहातही आहे. तेथूनही तो असे सांगण्याचे धाडस करतो. सरकारने याची नोंद का घेतली नाही ? पेपर फोडणारे असे गुन्हेगार प्रत्येक राज्यामध्ये आहेत. ‘टेलिग्रॅम’ या सामाजिक माध्यमाच्या एका गटातील संभाषणाचा ‘स्क्रीनशॉट’ (भ्रमणभाषच्या स्क्रीनचे छायाचित्र) प्रसारित झाला, ज्यामध्ये मुलांना सांगण्यात येत आहे, ‘केवळ ४८ घंटेच शेष आहेत, तर ज्यांना पेपर घ्यायचा आहे, त्यांनी लवकर घ्यावा.’

एका परीक्षा केंद्राच्या महिला ‘एजंट’चा (दलालाचा) ‘ऑडिओ’ (ध्वनीमुद्रण) प्रसारित झाला आहे, त्यात ती सांगत आहे, ‘(विद्यार्थ्यांनो) तुम्हाला पेपरातील काहीच येत नसेल, तर केवळ पेपर लिहिण्याचे ३ घंटे नाटक करायचे आहे. सीसीटीव्हीमध्ये तुम्ही त्याप्रमाणे दिसाल. पेपर ‘सील’ होण्यापूर्वी आमची जाणकार व्यक्ती तुमचा पेपर भरून देईल.’

काही धनाढ्य मुलांच्या पालकांनी लाखो रुपये देऊन काही परीक्षा केंद्रच विकत घेतल्याचे समजते, जेणेकरून त्यांच्या मुलांना पेपर सोडवण्यासाठी जाणकाराचे साहाय्य घेता येईल. गोध्रा (गुजरात) येथील एका महाविद्यालयाच्या चालकांना त्यासाठी १४ दिवसांची कोठडी मिळाली आहे.

उद्याचे आधुनिक वैद्य बनणारे विद्यार्थी जर अशा प्रकारे पेपर सोडवत असतील, तर वैद्यकीय क्षेत्राचे भविष्य धोकादायक आहेच; मात्र जे प्रामाणिकपणे, कष्ट करून उत्तीर्ण होतील, त्यांच्यावरही अन्याय आहे. याचा दुसरा अर्थ धनाढ्य व्यक्ती पैसे देऊन त्यांच्या पाल्यांना गुणवत्ता सूचीमध्ये आणू शकतात. आधुनिक भारतात असे प्रकार कसे होऊ शकतात ? हे सर्व सर्वसामान्य, सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा झोप उडवणारे नाही का ?

पुष्कळ कष्ट घेऊन यश न मिळाल्यास अनेक मुले या परीक्षेतील निकालामुळे आत्महत्या करतात. मुलांना या परीक्षेचा प्रचंड ताण असतो. प्रवेशासाठी १ लाख जागा आहेत, तर त्यापैकी सरकारी जागा केवळ ४० सहस्र, तर ६० सहस्र खासगी जागा आहेत. ज्या देणगी देऊन भरण्यात येतात आणि ती देणगी सर्वसामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणारी नसते.

४. घोटाळा दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना ?

‘एवढे सगळे गोंधळ लक्षात येऊन पुन्हा परीक्षा का घेण्यात येत नाही ? हा वादग्रस्त निकाल विद्यार्थ्यांवर का थोपवला जात आहे ? ४ जून २०२४ या दिवशीच म्हणजे लोकसभा निकालाच्या दिवशीच वैद्यकीय प्रवेशपरीक्षेचा निकाल का देण्यात आला ? हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न होता का ?’, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. या वर्षी वैद्यकीय प्रवेशाला मोठी अडचण येणार आहे.

‘फिजिक्सवाला’ या प्रसिद्ध शिकवणीवर्गाचे अलख पांडे यांनी सांगितले, ‘‘हरियाणातील ७२० असे पूर्ण गुण मिळालेल्या ६ विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शिकवणीवर्गाचा एक विद्यार्थी आहे. त्याने एका प्रश्नाचे उत्तर दिलेच नाही, तरीही त्याला ७२० गुण, म्हणजे पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. त्याला सर्वसाधारणपणे ६५० पर्यंत गुण मिळाले पाहिजे होते. हेसुद्धा आश्चर्यकारक नाही का ?’’ पाटणामध्ये पेपर ‘लिक’ (फुटल्याचा) झाल्याचा प्रथमदर्शनी अहवाल आहे; मात्र ‘एन्.टी.ए.’ त्याला नकार देत आहे; कारण पुन्हा परीक्षा घेण्याची भीती !

५. प्रशासनाने तात्काळ योग्य निर्णय घेणे अपेक्षित !

‘नीट’ परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली, काहींनी याचिका प्रविष्ट केल्या. या विषयावर चर्चासत्रे आयोजित करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचे मोठे संकट आहे, पालकही चिंतेत आहेत. अशा वेळी प्रशासन पुढे येऊन काही भूमिका का घेत नाही ? एकेका विद्यार्थ्याला न्यायालयाची पायरी चढणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे दायित्व उचलणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचा परीक्षांवरचा विश्वास उडून जाईल. ‘केंद्रीय लोकसेवा आयोग’सारख्या परीक्षा कडक शिस्तीत घेतल्या जाऊ शकतात, तर या परीक्षेविषयी एवढी अनास्था का ? हा विषयही थेट व्यक्तीच्या आरोग्याशी निगडित क्षेत्राशी आहे म्हणून याचे गांभीर्य अधिक आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना आश्वस्त करणे आवश्यक आहे !

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१८.६.२०२४)