२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
१. धर्मकार्यात गुरुकृपेचे महत्त्व
सध्या हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना अनेक अडचणी आहेत. असे असले, तरी आपण ‘हिंदु’ हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपले मन रोमांचित होऊन जाते. हिंदू कणखर आहेत आणि कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. हिंदु व्यक्ती कोणतेही काम करण्यासाठी प्रथम गुरूंना वंदन किंवा देवाला प्रार्थना करून घराबाहेर पडते. साक्षात् गुरु आपल्या समवेत असतांना जगातील अशी कोणती शक्ती आहे, जी आपल्याला थांबवू शकेल ?
२. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची प्रशिक्षण देण्याची पद्धत
केंद्र सरकारने बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) ही आतंकवादी संघटना आहे. ते सर्वप्रथम मुसलमान मुलाला निवडतात आणि त्याला प्रशिक्षण देतात. प्रारंभीच गोळी मारण्याचे प्रशिक्षण देत नाहीत. प्रथम चालत्या दुचाकीवरून जातांना कुत्र्यांना कापून काढण्याचे प्रशिक्षण देतात. त्यानंतर एखाद्यावर पाठीमागून वार करण्याचे प्रशिक्षण देतात. असे एक प्रशिक्षण केंद्र कर्नाटकच्या उत्तुर तालुक्यात चालवले जाते. तेथे त्यांचा ‘फ्री सोसायटी हॉल’ आहे. तेथे त्याचे विश्लेषण केले जाते. त्याचा विश्वस्त अश्रफ अग्नानी असून तो अधिवक्ता आहे. यावरून त्यांची संपर्कयंत्रणा कशी आहे, हे लक्षात येते.
३. हिंदुत्वनिष्ठाच्या हत्येतील आरोपीची कारागृहात हत्या
प्रशांत पुजारी हा बजरंग दलाचा क्रियाशील कार्यकर्ता होता. त्याची वर्ष २०१३ मध्ये हत्या झाली. दक्षिण कर्नाटकमध्ये मुडबिद्री येथे त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी ‘पी.एफ्.आय.’च्या काही कार्यकर्त्यांना अटक झाली. त्यातील एक संशयित उस्ताफा याला १०.११.२०१६ या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मैसुरू कारागृहात ठेवण्यात आल्याची बातमी आली. या कारागृहात बजरंग दलाचा कार्यकर्ता किरण शेट्टी हाही होता, जो प्रशांत पुजारीचा मित्र होता. शेट्टी याने प्रशांत पुजारीचा सूड घेण्यासाठी उस्ताफाला धारदार चमच्याने वार करून ठार मारले, अशा बातम्या माध्यमांमधून प्रसारित झाल्या.
४. हिंदुत्वनिष्ठाचे वकीलपत्र घेणार्या अधिवक्त्याला ‘पी.एफ्.आय.’च्या धमक्या
उस्ताफाच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट झाले. बजरंग दलाचा खटला लढण्यासाठी न्यायालयात एक अधिवक्ता उभा होता. त्याने १५ साक्षीदारांची उलट तपासणी केली. त्यानंतर त्या अधिवक्त्याला धमकी देण्यात आली. धमकी भ्रमणभाषवरून दिली नव्हती, तर प्रत्यक्ष मैसुरू जिल्हा न्यायालयाच्या आवारात देण्यात आली. या खटल्याच्या वेळी प्रत्येक दिवशी ‘पी.एफ्.आय.’चे २० ते ३० कार्यकर्ते न्यायालयात उपस्थित रहात होते. ते त्या अधिवक्त्याचे छायाचित्र घेत होते, तसेच त्याची ध्वनीचित्रफीतही बनवली जात होती. त्यामुळे त्या अधिवक्त्याला भीती वाटली. त्यानंतर त्या अधिवक्त्याने न्यायाधिशांना सांगितले, ‘‘साहेब, मी आता हा खटला पुढे चालवू शकत नाही. मला धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मी या खटल्यातून निवृत्त होत आहे.’’ त्याची २०१६ च्या आदेश क्र. २७२ मध्ये नोंद आहे. त्यानंतर ३-४ मास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अधिवक्ता मिळाले नाहीत.
५. खटल्याच्या पहिल्याच दिवशी न्यायाधिशांचे मत परिवर्तन करण्यात यश
वर्ष २०२१ च्या डिसेंबरमध्ये मंगळुरू येथून माझ्याकडे काही लोक आले. ते म्हणाले, ‘‘साहेब, आपण हा खटला हाताळू शकता का ? हा ‘पी.एफ्.आय.’च्या विरोधातील खटला आहे.’’ मी हा खटला आनंदाने आणि निःशुल्क लढण्यास सिद्ध झालो. मी माझ्या मडिकेरी गावावरून मैैसुरूच्या न्यायालयात जाऊन वकीलपत्र प्रविष्ट केले. पुढच्या दिनांकाला खटल्याची सुनावणी चालू होणार होती. तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने मडिकेरीचे बजरंग दलाचे ४-५ कार्यकर्ते माझ्यासमवेत न्यायालयात आले. तेथे नेहमीप्रमाणे ‘पी.एफ्.आय.’चे २०-३० कार्यकर्ते होते. मी प्रारंभीच या खटल्याला एका वेगळ्या वळणावर घेऊन गेलो. तोपर्यंत न्यायाधिशांनाही पूर्वग्रहानुसार वाटत होते, ‘कारागृहाच्या आत हत्या झाली आहे आणि किरण शेट्टीवर आरोप आहे, म्हणजे ही हत्या त्यानेच केली असणार.’ तसे मला त्यांच्या शारीरिक हालचालींवरून दिसत होते. मी एका साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. त्यानंतर न्यायाधीश तटस्थ झाले. त्यांना वाटू लागले, ‘नाही, या प्रकरणात थोडे लक्ष घालूनच कारवाई करावी लागेल.’
अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. यांचा परिचय
अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. हे कर्नाटकमधील मडिकेरी येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता आहेत. ते सत्र न्यायालय आणि बेंगळुरू उच्च न्यायालय येथे न्यायालयीन खटले लढतात. गोहत्या, गोतस्करी, निर्दाेष हिंदूंवर होणारे अत्याचार या सर्वांच्या विरोधात ते लढा देत आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या संशयित हिंदूंना ते कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे. ते हिंदुत्वाच्या बाजूने लढत असल्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणही झाले आहे. असे असूनही ते हिंदुत्वाच्या बाजूने ठामपणे उभे आहेत.
६. शत्रूला धाडसाने सामोरे जाणे आवश्यक !
वर उल्लेख केल्याप्रमाणे ‘फ्री सोसायटी हॉल’चा विश्वस्त अधिवक्ता अश्रफ अग्नानी हा या खटल्यात ‘पी.एफ्.आय’ला साहाय्य करत होता. तो माझ्या समोरच बसला होता. जेवणाची वेळ संपल्यावर मी बाहेर गेलो. तेव्हा ‘पी.एफ्.आय’चे कार्यकर्ते न्यायालयाच्या समोरच माझी छायाचित्रे काढत होते. मी त्यांना बोलावले आणि सांगितले, ‘‘तुम्ही गुपचूपपणे माझे छायाचित्र का काढत आहात ? माझे वकीलपत्र येथे धारिकेत आहे. त्यात माझा भ्रमणभाष क्रमांक आणि पत्ताही दिला आहे. माझा भ्रमणभाष क्रमांक हाच माझा ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकही आहे. ते सर्व तुम्ही नोंद करून घ्या. ‘व्हॉट्सॲप’वर माझे चांगले छायाचित्र आहे, ते घ्या.’’ आपण त्यांना असे धाडस दाखवणे आवश्यक आहे. याविषयी न्यायाधिशांना समजले, तेव्हा त्यांनी सुरक्षेचा एक स्थायी आदेश दिला.
गुरुकृपेने प्राणघातक आक्रमणापासून रक्षण
आपण सकाळी उठून गुरुवंदना करून नामस्मरण करणारे आहोत. सज्जन लोक नेहमी पोलिसांना घाबरत असतात. त्याप्रमाणे मलाही पूर्वी पोलिसांची भीती वाटत असे. आता भगवंताचे नामस्मरण चालू केल्यापासून कोणत्याही विषयाची भीती वाटत नाही. माझ्यावर गोळीबार झाला होता. ती गोळी माझ्या हृदयाच्या अर्धा फूट अंतरावरून सुसाट निघून गेली. परात्पर गुरुदेव डॉ. आठवले आणि भगवान कृष्ण यांच्या कृपेने माझ्या अर्धा फूट अंतरावरून ती गोळी दुसरीकडेच गेली. हे साधनेचे बळ आहे. गुरुकृपेने मी आज जिवंत आहे. कोणतेही काम करतांना मनातल्या मनात नाम घेत रहावे. न्यायालयात बसले असतांना आपला खटला चालू होईपर्यंत वेळ मिळतो, तसेच सुनावणीच्या वेळी अधिवक्ते उलट तपासणी घेत असतात. तेव्हाही आपण नामस्मरण करू शकतो. आपण चारचाकीतून जातांनाही नामस्मरण करू शकतो. नामजपामुळे आपल्याला दैवीबळ मिळते. या दैवीबळाच्या जोरावरच आपण नकारात्मक विचारांच्या लोकांविरुद्ध लढू शकतो आणि दैवी बळावरच हिंदु राष्ट्र आणू शकतो.
७. हिंदुत्वनिष्ठांच्या सुटकेसाठी अहोरात्र धडपड
मी या खटल्याच्या प्रत्येक सुनावणीच्या दिनांकाला मैैसुरू न्यायालयात जात होतो. गौरी लंकेश हत्या प्रकरणात ५ वर्षांपासून निरपराध हिंदु कार्यकर्ते कारागृहात बंद आहेत. त्यांचा खटला लढण्यासाठी आम्ही ५ घंटे चारचाकी चालवून बेंगळुरूला जातो. प्रत्येक तारखेला ९ घंटे चारचाकी चालवून धारवाडला जातो. गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या ‘विशेष अन्वेषण पथका’ला (‘एस्.आय.टी.’ला) वाटत होते, ‘त्यांनी १० सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. असा कोणता अधिवक्ता आहे, जो वेळ काढून एवढ्या पानांचे वाचन करील ? अधिवक्त्यांकडे एवढा वेळ कुठे असतो ? आणि खटला लढण्यासाठी किती पैसे व्यय होतील ?’ खरोखरच सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या निरपराध लोकांना एवढा पैसा व्यय करून खटला लढणे शक्य होत नाही. हे आरोपपत्राचे कागद २ रुपयांचे फुटाणे बांधण्याच्याही पात्रतेचे नसतात. एवढी अन्वेषण यंत्रणेच्या चौकशीची गुणवत्ता असते.
न्यायालयासमोर सुनावणी चालू झाली. तेव्हा एका साक्षीदाराला आम्ही चांगलेच फटकारले. न्यायालयात उघडपणे खटला चालला, तर पत्रकार आणि अन्य बाहेरचे लोक तेथे उपस्थित असतात. त्यांच्यासमोर ‘एस्.आय.टी’चा साक्षीदार किती सुमार बुद्धीचा आहे, हे उघड होईल, असे अन्वेषण पथकाला वाटले. त्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे बंद खोलीतील सुनावणीसाठी अर्ज केला. त्याला मीही मान्यता दिली.
८. धर्मसभेचा प्रसार करणार्या रिक्शांची पोलीस ठाण्यातून मुक्तता
गंङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु
– नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक ३३
अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु आणि कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.
अशा प्रकारे आपण सप्तनद्यांना प्रार्थना करून स्नान करतो. केव्हा तरी या श्लोकातील एकही नाव जमिला, रूबीना, मुमताज असे आले आहे का ? नाही, तर भारत हिंदु राष्ट्र का नाही ? आपण हिंदु राष्ट्र म्हटले, तर ‘ते राज्यघटनेच्या विरुद्ध आहे’, असे म्हणत अटक केली जाते. कर्नाटकमधील कुशालनगरमध्ये हिंदु जनजागृती समितीने एक हिंदु राष्ट्र सभा आयोजित केली होती. त्याचा रिक्शांमध्ये ध्वनीक्षेपक लावून प्रसार करण्यात येत होता. त्या विरोधात ‘पी.एफ्.आय.’च्या लोकांनी तक्रार केली. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी सर्व पाचही रिक्शा कह्यात घेतल्या. सभा सायंकाळी ६ वाजता होती. त्यासाठी निघत असतांनाच मला ‘रिक्शा जप्त केल्या असून रिक्शाचालकांना अटक करण्याचा विचार चालू आहे’, असे कळवण्यात आले.
मी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेलो. तेथे ‘पी.एफ्.आय.’चे कुणीही कार्यकर्ते उपस्थित नव्हते. मी पोलीस अधीक्षकांना तक्रार दाखवण्यास सांगितले. मी म्हणालो, ‘‘हिंदु राष्ट्र असंवैधानिक आहे, तर ते बघावे लागेल. मीही थोडा कायद्याचा अभ्यास केला आहे. पाहूया कोणत्या अनुभागात ते येते !’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘एक काम करा, आम्ही उद्या त्या रिक्शांना सोडून देतो.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्हाला त्यांना सोडून देण्याची आवश्यकताच नाही. मीच त्यांना न्यायालयातून सोडवून घेतो.’’ मी रिक्शाचालकांना प्रत्येक दिवशीची मिळकत विचारली. त्यांनी ५०० रुपये सांगितले. म्हटले, ‘‘ठिक आहे, १०-१५ दिवस होतील. मी तुम्हाला प्रतिदिनचे ५०० रुपये देतो; परंतु तुम्ही त्यांचे पाय धरू नका आणि गयावया करू नका.’’
न्यायालयात मी समितीच्या कार्यकर्त्यांना २ पांढरे कागद आणण्यास सांगितले. तेव्हा पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘‘कशाला हवे ?’’ मी म्हणालो, ‘‘मी एक तक्रार लिहिणार आहे. या शहरात जेवढ्या मशिदी आहेत. त्यामध्ये अवैधपणे अजानसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा लावल्या आहेत. त्यांनाही या रिक्शासह जप्त करावे; कारण त्यांनाही अनुमती नाही आणि यांनाही अनुमती नाही. त्या विरोधात आता मीच तक्रार लिहितो.’’ त्यानंतर २ मिनिटांत सर्व रिक्शा रस्त्यावर सोडून देण्यात आल्या. अशा प्रकारे आपणही कणखर बनायला पाहिजे.
९. साधना केल्यास तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही !
पोलीस अधीक्षक म्हणाले, ‘‘तुम्ही एवढे का रागवता ?’’ मी म्हणालो, ‘‘मी जन्मतःच रागीट आहे; पण आता नामस्मरण करत असल्यामुळे माझा राग थोडा न्यून झाला आहे. मी नामस्मरण करत नसतो, तर आणखी प्रकरण चिघळले असते. तुम्हीही साधना शिकायला या.’’
आपण योग्य प्रकारे नामस्मरण, स्वभावदोष निर्मूलन आदी साधना केली, तर या युद्धात असा कुणीही माणूस नाही, जो आपल्यासमोर टिकू शकेल; कारण आपल्यासमवेत तो (भगवान श्रीकृष्ण) आहे, ज्याच्या हातात सुदर्शनचक्र आहे.’
जय श्रीकृष्ण ।
– अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., मडिकेरी, कर्नाटक.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |