१. साधकांनी कुणाकडूनही अपेक्षा न करता स्वतःच्या साधनेकडे लक्ष द्यावे !
‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्याशी झालेले संभाषण पुढे देत आहे.
आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया : सेवा करतांना माझा काही प्रसंगांत संघर्ष होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमचा संघर्ष स्वतःमुळे होतो कि दुसर्यामुळे ? स्वतःमुळे संघर्ष होत असल्यास आपण सुधारणा करायची.
आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया : माझ्यामुळेच संघर्ष होतो. माझ्या सहसाधकांकडून अपेक्षा असतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : देव कुणाकडून अपेक्षा करत नाही आणि आपण मात्र इतरांकडून अपेक्षा करतो. आपण आपली साधना करायची. ‘दुसर्यांनी काय करावे ?’, याचा विचार आपण करायचा नाही. आपण याविषयी उत्तरदायी साधकाला सांगायचे.
२. सेवा करतांना घडलेले संघर्षाचे प्रसंग आठवत असतांना साधकाला डोके जड होऊन निरुत्साही वाटणे आणि सत्संगाचा आनंद घेता न येणे
आरंभी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले वरील सूत्र स्वीकारले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आता या सत्संगात सहसाधकांच्या कोणत्या स्वभावदोषांमुळे माझ्या मनाचा संघर्ष होतो, हेसुद्धा मी सांगायला हवे.’ मी सेवा करतांना घडलेले संघर्षाचे प्रसंग आठवू लागलो. सत्संगातील १० मिनिटे माझ्या मनात हेच विचार चालू होते. दहा मिनिटांनी मला एकदम निरुत्साही वाटू लागले. एवढा वेळ सत्संगात मला आनंद अनुभवता येत होता, तो १० मिनिटांतच नाहीसा झाला. माझे डोके जड होत गेले. मला निरुत्साही वाटू लागले. त्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगाचा आनंद घेता येत नव्हता.
३. सत्संगात कुणाचेही स्वभावदोष न सांगता अंतर्मुख रहायचे ठरवल्यावर उत्साही आणि आनंदी वाटू लागणे अन् परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगाचा लाभ घेता येणे
मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘गुरुदेव, तुम्हीच सांगा, मी काय करू ?’ तेव्हा मला सूक्ष्मातून आवाज ऐकू आला, ‘तू अन्य कुणाचेही स्वभावदोष सांगू नकोस.’ यानंतर मी सत्संगात कुणाचेही स्वभावदोष न सांगता अंतर्मुख रहायचे ठरवले. यामुळे मला हलके, उत्साही आणि आनंदी वाटू लागले. मला परात्पर गुरु डॉक्टरांकडे पाहून आनंद वाटू लागला आणि मला त्यांच्या सत्संगाचा लाभ घेता आला.’
– आधुनिक वैद्य उज्ज्वल प्रताप कापडिया, फोंडा, गोवा.
|