यवतमाळ येथील चि. ओजस्वी प्रशांत सोळंके (वय ४ वर्षे) हिने गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

चि. ओजस्वी प्रशांत सोळंके

यवतमाळ – येथील बालसाधिका चि. ओजस्वी प्रशांत सोळंके (वय ४ वर्षे) हिने ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी १२ जून २०२४ या दिवशी येथे झालेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात तिचा सत्कार केला. या वेळी चि. ओजस्वीचे वडील श्री. प्रशांत सोळंके, आई सौ. केतकी सोळंके, भाऊ कु. शौर्य (वय ९ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) उपस्थित होते.

विदर्भातील सनातनचे साधक त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे उत्तरदायी साधकांना पाठवत होते. त्याविषयीचा आढावा चि. ओजस्वी वडिलांसमवेत पाठवत होती. याविषयी पू. पात्रीकरकाका यांनी तिचे कौतुक करून ‘या वयात तिचे साधनेचे प्रयत्न सर्व साधकांना शिकण्यासारखे आहेत’, असे सांगून वरील आनंदवार्ता दिली.

चि.ओजस्वी सोळंके हिचा सत्कार करताना पू.अशोक पात्रीकर

साधनेतील प्रगल्भता दर्शवणारी तिची वाक्ये आणि कृती !

१. तिच्या एका नातेवाईकाने तिला म्हटले, ‘‘तू देवीसारखी सुंदर दिसते.’’ तेव्हा ती त्यांना म्हणाली, ‘‘तुम्हीही नामजप करा, तर तुम्हीही सुंदर दिसाल !’’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ९ जून २०२४ या दिवशी झालेल्या कार्यक्रमासाठी यवतमाळ येथील सर्व साधक एकत्र जमले होते. कार्यक्रम संपल्यानंतर तिने सर्वांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला.

३. एकदा शाळेतून आल्यावर ती म्हणाली, ‘‘आज शाळेत परमपूज्य माझ्याजवळ बसले होते.’’

४. ती प्रतिदिन जेवण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना नैवेद्य दाखवते आणि नंतरच जेवते.

५. ती पू. पात्रीकरकाकांना म्हणाली, ‘‘मला तुमची पुष्कळ आठवण येते.’’