‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी झाल्यावर आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जाणवलेली सूत्रे – भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा

१. हिंदु जनजागृती समितीचे साधक आणि सनातन संस्थेचे साधक यांची धर्मनिष्ठा अन् तळमळ पाहून त्यांना घडवणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाची इच्छा निर्माण होणे आणि ती ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’द्वारे पूर्ण होणे

‘१६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये मी प्रथमच आलो आहे. सनातन धर्माची सेवा म्हणून गोसेवा, धर्मसेवा आणि राष्ट्रसेवा करत असतांना मी सनातन संस्थेचे कार्य बरेच ऐकले होते. मागील ३ वर्षांपासून हिंदुत्वाची, म्हणजेच धर्म आणि राष्ट्र यांची सेवा करतांना माझी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आदरणीय श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि हिंदु धर्मजागृती समितीच्या धुळे जिल्हा समन्वयक कु. रागेश्रीताई देशपांडे इत्यादींशी नेहमीच भेट होत आहे. त्यांची साधना, धर्मरक्षणाची तळमळ आणि धर्मनिष्ठेची प्रखरता पाहून त्यांच्या साधनेचे तपस्थळ असलेले परात्पर गुरु श्री आठवलेगुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या पावन सान्निध्याची मला इच्छा होती. तो योग मला हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’द्वारे प्राप्त झाला.

‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प आणखी दृढ होणे !

भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा

मला सनातनच्या साधकांना स्वतःच्या परीसस्पर्शाने सुवर्ण कांतीसम तेजस्वी करणार्‍या सूर्यासम तेजस्वी परात्पर सद्गुरु देवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) दर्शनाचा लाभ झाला. सहज, निर्मळ, प्रीतीमय आणि करुणामय स्नेहधारेमध्ये न्हाऊन निघण्याचा आनंद मी अनुभवला. लहानपणापासून मी ज्या देव, देश आणि धर्म यांची सेवा करण्यात मग्न होतो, त्याची सार्थकता मला वाटू लागली. दर्शनानंतर जणू एका झर्‍याच्या प्रवाहाला अथांग समुद्राचे सामर्थ्य प्राप्त झाले. तो शांतीचा आणि स्थिरतेचा भाव मला मिळाला. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याचा संकल्प आणखी दृढ झाला. निश्चितपणे यासाठीच या दासाचे मन सनातन संस्थेच्या कार्याने अत्यंत भारावून गेले आहे.

सनातन संस्थेद्वारे चालणारे हे राष्ट्रकार्य अमर्याद आहे. त्याचे वर्णन एवढ्याशा लेखात करणे शक्य नाही. बस, शेवटी हा दास एवढेच म्हणू शकतो, ‘‘सत्य, सनातन, सुंदर !’’

– भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा

२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. या महोत्सवाच्या कालावधीत गोवास्थित सनातनचा आश्रम पहातांना तिथे स्थापन केलेल्या देवता, यज्ञकुंडाची दैवी आभा आणि प्रभा पाहून मला परमात्म्याच्या अस्तित्वाचा स्पर्श तेथील कणाकणांत जाणवला.

आ. मला जाणवले, ‘आश्रमातील भोजनकक्षाच्या व्यवस्थेत प्रसाद बनवण्याची सेवा करणारे साधक आणि तेथील पवित्रता यांमध्ये माता अन्नपूर्णादेवीचा आशीर्वाद सामावला आहे.’

इ. सूक्ष्म परीक्षण करणारे साधक सनातन हिंदु धर्मग्रंथात लिहिलेल्या ज्ञानाच्या सत्यतेवर प्रकाश टाकत आहेत.

ई. येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेल्या संशोधनातून मला हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या समृद्ध वारशाची माहिती झाली.

उ. ‘संगीताच्या माध्यमातून ईश्वरी सान्निध्य जलद प्राप्त होते’, हेही मला समजले. ते सर्व पहातांना जणू ‘संगीत आणि विद्या यांची देवी वीणावादिनी माता शारदाच कलेतून ईश्वराचे दर्शन घडवत आहे’, असे मला जाणवले.

३. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये हिंदु विरांनी ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’साठी केलेल्या दृढ संकल्पामुळे धर्माभिमान्यांमधील उत्साह आणि विश्वास दृढ होणे

‘हिंदु राष्ट्रा’च्या संकल्पपूर्ण महोत्सवाला आरंभ झाला. भारत राष्ट्रावर घिरट्या घालणार्‍या संकटांची चिंता मनाला दुःखी करत असतांना येथील हिंदु विरांनी शंखनादाच्या माध्यमातून ‘धर्मरक्षण’ आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चा दृढ संकल्पच केला. या अधिवेशनामध्ये अनेक विद्वान, अनुभवी संत, वक्ते, अधिवक्ते आणि कार्यकर्तर्े यांनी आपल्या धर्मकार्याचा उद्देश, कार्यप्रणाली, अनुभव, राष्ट्ररक्षण, मंदिर सुव्यवस्थापन, गोरक्षण, ‘लव्ह जिहाद’, धर्मविरोधी वक्तव्यांचे खंडण, कायदेशीर मार्गदर्शन इत्यादींविषयी गांभीर्याने चर्चा केली. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये जी विद्वत्ता आणि साधनेची शक्ती यांचे सादरीकरण झाले, त्या ऊर्जेने विश्वातून आलेल्या सनातन हिंदु धर्माभिमान्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा उत्साह आणि विश्वास अधिकच दृढ झाला.

४. साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा समन्वय पुढे हिंदु विश्वापर्यंतच्या महान दृढ संकल्पाची पूर्तता करू शकणे

सर्व धर्मप्रेमींचे आचार, विचार, कार्य आणि चिंतन यांची एकत्र माळ गुंफून ‘हिंदु राष्ट्र-निर्माणा’ची ‘मौक्तिक माळ’ श्री भारतमातेच्या गळ्यात घालण्याचे महान कार्य सनातन संस्थेद्वारे चालू आहे. अनेक साधक पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सेवा करून ‘आपला प्रत्येक क्षण देव, देश आणि धर्म यांसाठी समर्पित व्हावा’, या भावाने सहपरिवार समष्टी कार्य करत आहेत. साधक व्यष्टी साधना, म्हणजे प्रभूचे नामस्मरण आणि अहं-निर्मूलन करून, म्हणजे आत्माभिमान नष्ट करून शांत, संयम, अनुष्ठान अन् शिस्त यांची प्रतिमूर्ती झाले आहेत. ते राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्र्यांच्या या दिव्य अग्निकुंडात समिधा बनून राहिले आहेत. व्यष्टी आणि समष्टी साधनेचा समन्वयच हिंदु राष्ट्रातून पुढे हिंदु विश्वापर्यंतच्या महान दृढ संकल्पाची पूर्तता करू शकतो.

५. हनुमंताप्रमाणे ‘हृदयात श्रीरामाला वसवून धर्मकार्य केले पाहिजे’, याची जाणीव सर्व हिंदुत्वनिष्ठांना असणे आवश्यक आहे !

हनुमान हा श्रीरामाचा दूत आहे. ‘हनुमान चालीसा’मध्ये गोस्वामी तुलसीदासांनी म्हटले आहे,

विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर ।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया ।।

अर्थ : हनुमंता, तू प्रकांड पंडित, विद्यानिधान आहेस. तू गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल असून प्रभु श्रीरामाचे कार्य करण्यासाठी आतुर आहेस. आपल्याला श्रीरामाचे चरित्र ऐकतांना अतिशय आनंद मिळतो. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तुझ्या हृदयात सतत विराजमान आहेत.

‘हनुमंताप्रमाणे हृदयात परमात्म्याचा वास ठेवून धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य केले पाहिजे’, याची जाणीव भारतातील सर्व हिंदु धर्मवीर, सर्व धार्मिक संघटना, साधू-संत आणि परिषदा यांनी ठेवली पाहिजे.

– ‘हिंदु राष्ट्रा’चा एक छोटासा सेवक (भागवताचार्य (अधिवक्ता) श्री राजीवकृष्णजी महाराज झा, संस्थापक-अध्यक्ष, श्रीरामजानकी सेवा समिती आणि श्यामसुंदर गोवर्धन गोशाळा, धुळे, महाराष्ट्र.) (२१.६.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक