मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर मधील ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार !

गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

डावीकडून श्री. राहुल खैर, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, श्री सतीश कोचरेकर आणि श्री प्रदीप तेंडोलकर

मुंबई – गोवा येथे २४ ते ३० जून या कालावधीत वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील ३५ विविध संघटनांचे ७५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी दिली. या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची माहिती देण्यासाठी १९ जून या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी सर्वाेच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानीदेवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर आणि ‘मराठा वॉरिअर्स् गड-किल्ले संवर्धक’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. राहुल खैर हेही उपस्थित होते.

इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थिती या अधिवेशनाला लाभणार आहे, अशी  माहिती या वेळी श्री. सतीश कोचरेकर यांनी दिली.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, प्रख्यात शल्य चिकित्सक आणि लेखक डॉ. अमित थढानी, ‘व्ही.पी. बेडेकर अँड सन्स प्रा.लि.’च्या मालक श्रीमती अनघा बेडेकर, रायगड येथील शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पवार आदी मान्यवरांसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ७५ प्रतिनिधीही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.

अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण !

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या ‘HinduJagruti.org’ या संकेतस्थळावर, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यू-ट्यूब’ चॅनेल आणि ‘facebook.com/hjshindi1’ या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.

मान्यवरांची मते !

१. सर्वोच्च आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय म्हणाले, ‘‘कट्टरवादी मुसलमान भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशा स्थितीत आज जनसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची आवश्यकता आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आताच पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.’’

२. विरार येथील श्री जीवदानीदेवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य श्री. प्रदीप तेंडोलकर म्हणाले, ‘‘आज केवळ हिंदूंची मंदिरेच सरकारच्या कह्यात आहेत. हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात आली पाहिजेत. त्यासाठी आमचा लढा चालू आहे. देश स्वतंत्र झाल्यावर भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला पाहिजे होते, ते साध्य होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नरत आहोत.’’

३. ‘मराठा वॉरीअर्स् गड-किल्ले संवर्धक’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. राहुल खैर म्हणाले, ‘‘आज महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गड-दुर्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन कृती करण्याची मागणी आम्ही या हिंदु राष्ट्र अधिवेशनात करणार आहोत.’’

जळगाव जिल्ह्यातून २२ प्रतिनिधी होणार सहभागी !

जळगाव – गोवा येथील ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला जळगाव जिल्ह्यातून २२ प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जळगाव विभाग प्रमुख श्री. आकाश फडे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी हेही उपस्थित होते.

संपूर्ण देशभरातून अनेक अधिवक्ते यात सहभागी होतील. कान्हादेश भागातूनही या वर्षी जवळपास ८ अधिवक्ते या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात तालुका पातळीपासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व स्तरावरून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत अधिवक्ता एकत्र येणार आहेत, असे हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी यांनी सांगितले.

अधिवेशनाला जिल्ह्यातील महाराष्ट्र – गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिराचे सचिव प्रा. नीळकंठ चौधरी, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. अनिल वानखेडे, चोपडा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता धर्मेंद्र सोनार, जसलीन आस्थापनाचे मालक व्यावसायिक श्री. उमेश सोनार उपस्थित रहाणार आहेत.