सांगली येथील संतोष कदम खून प्रकरणी पसार सिद्धार्थ चिपरीकर याला अटक !

सांगली, १४ जून (वार्ता.) – येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी ४ महिन्यांपासून पसार असणारा सराईत गुंड सिद्धार्थ उपाख्य बाबा चिपरीकर (वय ३२ वर्षे) याला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे सापळा रचून १२ जून या दिवशी अटक करण्यात आली. येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. कदम यांचा मृतदेह ७ जानेवारी या दिवशी कुरुंदवाड नांदणी रस्त्यावरील एका शेतालगत चारचाकीमध्ये आढळला होता. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. याविषयीचा गुन्हा कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नोंद केला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नीतेश वराळे (वय ३० वर्षे) आणि तुषार भिसे (वय २० वर्षे) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगलीवाडी येथील सराईत गुंड सिद्धार्थ चिपरीकर आणि शाहरूख शेख यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे सांगितले.