भीमा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट असल्याचे पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले मान्य !

आता पुन्हा नव्याने बांधकाम करणार

भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे कोसळलेले खांब

पुणे – पुणे-अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणार्‍या भीमा नदीवरील निर्माणाधीन पुलाचे खांब कोसळ्याची घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. या पुलाचे २ मोठे खांब पाया कच्चा असल्याने कोसळले. या पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले आहे. आता पुन्हा नव्याने पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार, असे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले आहे. (आधीचे निकृष्ट बांधकाम कुणाकडून झाले आहे, त्यांची चौकशी करून कारवाई करणे आवश्यक आहे, तसेच झालेला व्यय त्यांच्याकडून वसूल करणेही आवश्यक आहे. – संपादक)

दौंड शहरातून वहाणार्‍या भीमा नदीवर दौंड शहर ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गार या ठिकाणी २० कोटी रुपये व्यय करून हा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.

उन्हाळ्यामध्ये धरणातील पाणी आटल्याने नदीपात्रात अल्प प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे पुलाच्या काही खांबांचे काँक्रिट पूर्णपणे निघून जाऊन त्यातील लोखंडी सळ्या दिसत आहेत, तसेच निर्माणाधीन खांब एका बाजूला झुकल्याचे निदर्शनास येत आहे. नदीपात्रातील अन्य २ खांबांच्या वरच्या बाजूला तडे गेले असून खालच्या बाजूचे काँक्रीट निघून गेले आहे, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिल्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी अल्प असतांना ही स्थिती आहे, तर पावसामध्ये पाण्याचा साठा वाढल्यावर काय होईल ? अशी भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.