आत्मसत्तेला पूर्णपणे प्राप्त केलेले तत्त्वज्ञ बायस !

तत्त्वज्ञ बायस

१. युनानचे (ग्रीसचे) नगर शत्रूंनी जिंकल्यावर निराश आणि हताश झालेले लोक दुःखी अंतःकरणाने स्वतःचे सामान घेऊन जात असणे

‘अदमासे २ सहस्र वर्षांपूर्वी युनानच्या (ग्रीसच्या) एका नगरावर शत्रूंनी आक्रमण करून विजय मिळवला. या आनंदात त्यांनी घोषणा केली, ‘ज्याला आपले जेवढे सामान पाहिजे, तेवढे उचलून घेऊन जाऊ शकता.’ सर्व नगरवासी आपापले सामान डोक्यावर घेऊन जाऊ लागले, तरीही बरेचसे सामान, माल, मिळकत मागे उरत होती. निराश, हताश, हरलेले, थकलेले, उदास, मंद, म्लान आणि चंचलचित्त लोक दुःखी अंतःकरणाने जात होते.

२. आत्मसुखात रमलेले तत्त्वज्ञ बायस रिकाम्या हाताने जात असणे

त्यांच्यात एक जण तृप्त हृदयाचा आणि प्रसन्न चित्ताचा मनुष्य आपल्या राजवी थाटात चालला होता. त्याच्याजवळ झोळी-झेंडा इत्यादी काहीही सामान नव्हते. रिकामे हात, प्रफुल्लीत मन, डोळ्यांमध्ये एक वेगळीच निश्चिंतता आणि आत्ममस्तीच्या माधुर्याने चमकणारे मुखमंडल होते. तो मनुष्य होता तत्त्वज्ञ (फिलॉसॉफर) बायस ! संसारी वस्तूंनी आपल्याला सुखी-दुःखी मानणारे अज्ञानी लोक बायसच्या सुखाला काय ओळखणार ? त्यांच्या आत्मनिष्ठेला आणि आत्ममस्तीला काय जाणणार ?

३. कुणीतरी बायस यांच्यावर दया दाखवणे

कुणीतरी बायसवर दया दाखवत म्हटले, ‘‘अरेरे ! तुमच्याजवळ काहीच सामान नाही ? अगदी रिकामे हात ? किती ही गरीबी ! भिकार्‍याजवळही आपली वळकटी-बिछाना असतो, काही लपवलेले धन असते. तुमच्या जवळ काहीच नाही ? एवढे दारिद्र्य ! एवढा कंगालपणा !’’

४. आत्मसत्तेला पूर्णपणे प्राप्त केलेले बायस दैवी संपदेमुळे पूर्ण तृप्त होणे

यावर आत्मारामी बायस म्हणाले, ‘‘मी कंगाल नाही. कंगाल ते लोक आहेत, जे नश्वर संपदेला आपली संपदा मानतात आणि आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात. मी माझी संपूर्ण आत्मसंपदा माझ्या सोबत घेऊन जात आहे. माझी ही संपदा कुणीही हिसकावू शकत नाही. ही संपदा उचलण्याचे काही ओझे वाटत नाही. समतेचा सुगंध, चारित्र्याचे सामर्थ्य आणि अनंत ब्रह्मांडांमध्ये व्याप्त सत्-चित्-आनंद स्वरूप प्राणीमात्राचे अधिष्ठान आत्मदेव आहेत. त्यांच्याच सत्तेमुळे सर्वांच्या हृदयाची स्पंदने चालतात आणि सर्वांचे चित्त चेतन रहाते. त्या आत्मसत्तेला मी पूर्णपणे प्राप्त केले आहे. त्या पूर्ण संपदेमुळे मी पूर्ण तृप्त झालो आहे. मी बिचारा नाही, मी कंगाल नाही किंवा मी गरीबही नाही. गरीब, बिचारे आणि कंगाल तर ते लोक आहेत, जे मानवी शरीर मिळवूनही आपल्या आत्मसंपदेपासून वंचित रहातात.’’

५. आत्मसुखात रमणार्‍या संतांच्या उपस्थितीने वातावरण सुखी, आनंदी आणि शांतीमय होणे

शुकदेव, वामदेव, जडभरत यांच्यासारखे त्यागी महापुरुष बाहेरून भले असेच कंगाल दिसत असतील. झोपडीत राहून, लंगोटी-वस्त्र धारण केलेले दिसत असतील; परंतु आत्मराज्यात त्यांनी प्रवेश मिळवला आहे. ते स्वतः तर सुखी आहेतच; परंतु त्यांच्या केवळ उपस्थितीनेच वातावरण सुखी, आनंदी आणि शांतीमय होते. परमात्म्यापासून विमुख झाल्यामुळे दुःख होते, हे आपण जाणले पाहिजे.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)