गोवा : श्रीपाद नाईक यांची पुन्हा राज्यमंत्रीपदी वर्णी

श्रीपाद नाईक यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

खासदार श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन करतांना आमदार दिगंबर कामत, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

पणजी, ९ जून (वार्ता.) – उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून १ लक्षहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजयी झालेले, तसेच सलग सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीपाद नाईक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. ९ जून या दिवशी सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्रीपाद नाईक यांचा मंत्रीमंडळाच्या पहिल्या सूचीत समावेश होणे आणि त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणे यांमुळे गोव्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शपथविधी सोहळ्याच्या पूर्वी नरेंद्र मोदी यांनी ९ जून या दिवशी मंत्रीमंडळात समावेश होणार्‍या त्यांच्या सहकार्‍यांशी संवाद साधला. या बैठकीला श्रीपाद नाईक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते आणि तेव्हाच त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे निश्चित झाले होते. शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २ दिवसांपूर्वीच देहलीला पोचले आहेत आणि त्यांनीच सर्वप्रथम श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन केले. त्यानंतर गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, अन्य काही आमदार आणि पदाधिकारी यांनी श्रीपाद नाईक यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.


श्रीपाद नाईक यांनी यापूर्वी केंद्रात भूषवली विविध खात्यांची राज्यमंत्रीपदे

श्रीपाद नाईक यांनी यापूर्वी केंद्रात पर्यटन, जहाज बांधणी, आयुष, संरक्षण आदी खात्यांची राज्यमंत्रीपदे भूषवली आहेत.


मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

श्रीपाद नाईक यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होत असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍या कार्यकाळात गोव्याला केंद्रात प्रतिनिधित्व मिळत आहे. श्रीपाद नाईक यांना मंत्रीपद मिळत असल्याने त्याला गोवा सरकार आणि गोव्यातील जनता यांना नक्कीच लाभ होणार आहे.’’


केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागणार, याची निश्चिती होती ! – श्रीपाद नाईक, नवनिर्वाचित खासदार

केंद्रीय मंत्रीमंडळात पुन्हा वर्णी लागणार, याची निश्चिती होती. आजवर पक्षाने दिलेले दायित्व पार पडत आलो आहे आणि यापुढेही पक्ष देईल ते दायित्व स्वीकारून पुढे जाणार आहे.