मिरज येथील ढेरे गल्ली येथे कोयता टोळीचा धुमाकूळ, ३ जणांना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

मिरज, ९ जून (वार्ता.) – शहरातील ढेरे आणि कोष्टी गल्ली येथे ८ जूनच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पाऊस चालू असतांना ४ जणांच्या कोयता टोळीने हाती तलवार आणि कोयता घेऊन धुमाकूळ घातला. या चौघांच्या टोळीकडून ढेरे आणि कोष्टी गल्ली येथील १० चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. यातील १ आरोपी पसार आहे.

कोयता टोळीच्या कृतीस अटकाव करणार्‍यांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. या टोळीतील गुन्हेगारांच्या हातात दगड, तलवार आणि कोयता होता. शहरातून फिरत अन् तलवार नाचवत कोयता टोळीतील गुन्हेगारांनी घरांवर दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली. शहरात शस्त्रांची भीती दाखवत दहशत माजवणारे ४ जण ब्राह्मणपुरी येथील ‘तिरुमला सृष्टी’ इमारतीत थांबले होते. पोलिसांना तेथे जाऊन ४ जणांना पकडून चोप दिला; मात्र यातील १ जण पसार झाला. या महिन्यात सलग दुसर्‍यांदा कोयता टोळीने धुमाकूळ घालण्याचा प्रकार झाला. यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

संपादकीय भूमिका

असुरक्षित मिरज ! गल्लोगल्ली कोयता टोळ्या का निर्माण होत आहेत, हे पहाणे आवश्यक !