‘शिक्षणाचा संबंध माणसाच्या व्यावहारिक अर्थात् बाह्य जीवनाशी असतो, तर विद्येचा संबंध त्याच्या आंतरिक, म्हणजेच बौद्धिक, मानसिक संस्कारांशी आणि नैतिक जीवनाशी दिसतो. एक बहुतांशी मेंदूशी, तर दुसरे बहुतांशी अंतःकरणाशी जोडलेले असेच दिसते.
१. सुशिक्षित आणि सुविद्य यांतील भेद
गेल्या २ शतकांत शिक्षणाचा प्रसार झपाट्याने झाल्यामुळे सुशिक्षित होणे, हेच मनुष्य जीवनाचे ध्येय झाले. त्यामुळे मनुष्य चाणाक्ष झाला, त्याची तर्कबुद्धी अधिक तेजस्वी झाली, कोणत्याही विषयाची दुसरी बाजू तो चटकन मांडू लागला; पण यामुळे एक असे झाले की, माणसा माणसांत संवाद-संभाषणापेक्षा वादविवाद पुष्कळ वाढले. एकाने एखाद्या साध्या विषयावर जरी काही सहज मतप्रदर्शन केले की, दुसरा लगेच ते खोडून स्वतःची बाजू वरचढपणे व्यक्त करतो. केवळ बौद्धिक संघर्ष, म्हणजे सुशिक्षितपणाचे लक्षण नाही. नम्रता, संयम, समंजसपणा आणि विवेकवर्तन यांची जोड मिळाली की, सुशिक्षित मनुष्य ‘सुविद्य’ होतो. ‘सुविद्यमधील ‘विद्’, म्हणजे जाणणे. काय जाणणे, तर आपल्यासारखेच दुसर्याला जाणणे आणि मानणे.’ ‘आपल्या देश-संस्कृतीच्या शिकवणीचे पालन करणे, आपल्या देशाची अस्मिता सांभाळून आपले आचार-विचार, उच्चार यांचे अवलंबन करणे, असे जीवन जगणारी व्यक्ती ‘सुविद्य’ म्हटली पाहिजे.’ अशी व्यक्ती कदाचित् अधिक शिक्षण घेतलेली नसेलही, पदवीधर होणे तिला शक्य झाले नसेलही, पदवीधर होणे हा तिचा सुशिक्षितपणाचा मापदंड नसेलही, तरी ती सुसंस्कृत, सुविद्य असू शकेल.
२. पदवीधर (सुशिक्षित) व्हायचे कि सुविद्य व्हायचे ? हे स्वतःच ठरवणे महत्त्वाचे !
भाराभार पुस्तके वाचून जे मिळत नाही, ते सुसंस्कारित सुविद्य; पण अल्प शिकलेल्या लोकांजवळ सौजन्याच्या रूपात पुष्कळ असते. आम्हाला वाटते की, आम्ही ‘डिग्री होल्डर’ (पदवीधर), म्हणजे आम्ही सर्वज्ञ आणि सर्वसंपन्न होऊ; पण तसे नाही, नसतेच नसते. आधी आपले मन सुसंस्कारित केले पाहिजे. विविध विषयांची पुस्तके वाचायची, ती आपल्या व्यक्तीमत्त्वांत अधिकाधिक सौजन्य-सभ्यतेचे ज्ञान ओतण्यासाठी ! नुसतेच शिक्षण घेणे, म्हणजे अर्थार्जनाचे साधन मिळवणे होय. आता प्रचलित व्याख्येप्रमाणे नुसते ‘डिग्री होल्डर’ (पदवीधर) व्हायचे कि सुविद्य व्हायचे ? हे आपणच ठरवायचे आहे. विद्यार्जन, म्हणजे केवळ एखाद्या शास्त्रात प्रावीण्य मिळवणे नाही किंवा शिक्षण, म्हणजे ‘युनिव्हर्सिटी’ची (विश्वविद्यालयाची) पदवी मिळवणे नाही. केवळ प्राथमिक शिक्षण घेतलेली एखादी व्यक्तीसुद्धा सुविद्य असलेली दिसते, तर एखादी उच्चविद्याप्राप्त व्यक्ती एकदम साधी, निरभिमानी आणि संयमशील दिसते. सगळा संस्कारांचा प्रभाव असतो. आपण कोणत्या संस्कारात स्वतःचे अनमोल जीवन घडवायचे, हे आपण ठरवायचे असते.
३. सुविद्य होण्याविषयी स्वामी विवेकानंद यांचे मत
स्वामी विवेकानंद म्हणत, ‘आधी माणूस घडवणारे शिक्षण घ्या, नंतर अन्य शास्त्रे शिकता येतील. माणूस हा अंतःकरण आणि बुद्धी यांच्या विकासातून घडवला जाऊ शकतो. विद्यार्जन करायचे, तर आधी जीवनविद्या शिका. मनुष्याच्या जीवनाला आवश्यक तो स्नेहभाव धारण करा. संयम आणि विनय अंगी बाळगल्यानेच शिक्षण आणि विद्या यांचा सन्मान होईल. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणूस म्हणूनच जगले पाहिजे. मनुष्यरूपी यंत्र होऊ नका. मनुष्यत्वाचा अर्थ जाणूनच सुविद्य व्हा. नुसते कोरडे शिक्षण घेऊ नका. शिक्षणाला सुसंस्कांचा पाया ठेवून सुविद्य व्हा.’ – श्रीमती उषाताई परांजपे, नागपूर (साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै-सप्टेंबर २०२३)