१. सर्व क्षेत्रांतील ज्ञान असणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘एखाद्या व्यक्तीला या जन्मात अमुक एका विषयावर विशेष अभ्यास न करताही त्यातील बारकावे ठाऊक असतात. अशा प्रकारे अनेक विषयांसंदर्भात शिक्षण न घेताही एखाद्या व्यक्तीला त्यांविषयीचे ज्ञान असणे, हे विरळाच ! अशा व्यक्तीला भविष्यातील घडामोडींची सूक्ष्मदृष्टी प्राप्त असेल, तर ‘ती व्यक्ती एकमेवाद्वितीयच आहे’, असे म्हणता येईल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भात हे तंतोतंत जुळून येते. व्यावहारिकदृष्ट्या त्यांनी मानसोपचार आणि संमोहनउपचार यांच्यात वैद्यकीय शिक्षण घेतले अन् त्यामध्ये जागतिक स्तरावर कीर्तीमान स्थापित करणारे संशोधन केले. असे असले, तरी त्यांना पत्रकारिता, ग्रंथ, वैज्ञानिक संशोधन, संगीत, कला, बांधकाम, सूक्ष्म-जगत् आदी क्षेत्रांसह संघटनकौशल्य आणि व्यवस्थापन आदी व्यावहारिक क्षेत्रांतील ज्ञानही प्राप्त आहे. यातून त्यांच्यातील अवतारत्व सिद्ध होते, हेच खरे !
२. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीतील ग्रहयोग त्यांच्यातील अलौकिक गुणवैशिष्ट्ये दर्शवणे
या जोडीला ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कुंडलीतील ग्रहयोग त्यांच्यातील अलौकिक गुणवैशिष्ट्ये दर्शवतात. तसेच गतजन्मी व्यक्ती महान साधूपुरुष अथवा संत असण्याचा योगही त्यांच्या कुंडलीतून स्पष्टपणे दिसून येतो. ‘कुंडलीत चंद्र, गुरु, शनि आणि केतू या ग्रहांचा आध्यात्मिक स्थानांमध्ये एकमेकांशी योग (संबंध) असेल, तर व्यक्ती गतजन्मी महान साधूपुरुष अथवा संत असण्याची शक्यता असते’, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
३. कुंडलीतील ग्रहांच्या आध्यात्मिक स्थानांमुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गतजन्मी श्रेष्ठ साधूपुरुष होते’, हे लक्षात येणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शनि यांची बाराव्या (मोक्ष) स्थानात युती आहे. आठव्या (तप) स्थानात चंद्र असून त्याच्यावर गुरु ग्रहाची दृष्टी (प्रभाव) आहे, तसेच नवव्या (धर्म) स्थानात केतू असून त्याच्यावर शनि ग्रहाची दृष्टी (प्रभाव) आहे. एकूणच चंद्र, गुरु, शनि आणि केतू या ग्रहांचा आध्यात्मिक स्थानांमध्ये एकमेकांशी योग (संबंध) आहे. यावरून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गतजन्मी श्रेष्ठ साधूपुरुष होते’, हे लक्षात येते.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीत ‘परिवर्तन योग’ असणे आणि त्यांनी समाजात आध्यात्मिक स्तरावरील परिवर्तन घडवून आणणे
कुंडलीतील गुरु आणि शनि यांच्या युतीला ‘परिवर्तन योग’ म्हणतात. या योगावर महापुरुष आणि युगपुरुष जन्म घेतात. हा योग असणार्या व्यक्तीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शनि यांची युती बाराव्या (मोक्ष) स्थानात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे समाजात आध्यात्मिक स्तरावरील परिवर्तन घडवून आणत आहेत. ते समाजाला मोक्षाच्या दिशेने घेऊन जात आहेत. त्यांनी ‘हिंदु राष्ट्र’ (सात्त्विक लोकांचे धर्माधिष्ठित राष्ट्र) स्थापनेचा संकल्प केला आहे. सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर अवतरित झाले आहेत’, असे सांगितले आहे.’
– श्री. विक्रम डोंगरे, फोंडा, गोवा. (२३.४.२०२३)