१. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, हे जगात अवतरलेले परमेश्वराचे अवतार आहेत’, याची जाणीव होणे
१ अ. सत्पुरुषांची लक्षणे आणि पूर्णावतार : सत्पुरुषांची लक्षणे आणि पूर्णावतार यांच्याविषयी संस्कृत भाषेचे विद्वान आणि राष्ट्रवादी कवी श्रीधर भास्कर वर्णेकर यांचा पुढील श्लोक माझ्या वाचनात आला.
येषां मङ्गलदर्शनेन कलुषं गच्छेत् सदाऽदर्शनं
मौनेनैव हि केवलेन जगतस्तत्त्वावबोधो भवेत् ।
सत्पुण्यस्मरणेन विस्मरणमायात्येव दुश्चिन्तनं
ते साक्षात् परमेश्वरस्य भुवने पूर्णावतारा ध्रुवम् ।।
– ‘प्रज्ञाभारतीयम्’ (श्रीधर भास्कर वर्णेकर)
अर्थ : ज्यांच्या नित्य मंगल दर्शनाने कलुषितता निघून जाते, ज्यांच्या केवळ मौनानेच जगाला तत्त्वज्ञानाचा उपदेश मिळतो, तसेच ज्यांच्या पुण्यमय सत्कर्माचे किंवा पवित्र स्वरूपाचे केवळ स्मरण झाले, तरी अंतःकरणातले दुष्ट चिंतन विस्मृत होते, असे या जगातील सत्पुरुष, म्हणजे परमेश्वराचे पूर्णावतार आहेत, हे निश्चित !
१ आ. मी हा श्लोक वाचल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, हे जगात अवतरलेले परमेश्वराचे अवतार आहेत’, याची जाणीव मला माझ्या पुढील अनुभवांवरून झाली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘विद्यमान अवतारी पुरुष’ असल्याविषयी आलेले अनुभव
२ अ. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या केवळ दर्शनाने मनातील द्वेष, क्रोध, लोभ इत्यादी विकार लोप पावणे : मला वर्ष १९८९ पासून पुढे १० वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्थुलातून सत्संग लाभला. मला व्यवहार आणि अध्यात्म यांविषयी पुष्कळ अडचणी अन् प्रश्न होते. ते प्रश्न मी कागदावर लिहून परात्पर गुरु डॉक्टरांना विचारत असे. ते माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझे समाधान होईपर्यंत देत असत. काही वेळा मी प्रश्न न विचारताही त्यांच्या केवळ दर्शनाने माझे शंकानिरसन होत असे. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या केवळ दर्शनाने माझ्या मनातील द्वेष, क्रोध, लोभ इत्यादी विकारांनी कलुषित झालेले विचार लोप पावू लागले.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टर यांचे सत्संग, अभ्यासवर्ग, सभा, अनौपचारिक भेट, सनातनचे ग्रंथ इत्यादी माध्यमांतून ईश्वरी तत्त्वाचे ज्ञान होणे : परात्पर गुरु डॉक्टर यांचे सत्संग, अभ्यासवर्ग, सभा, अनौपचारिक भेट, सनातनचे ग्रंथ इत्यादी माध्यमांतून मला अध्यात्म, साधना, धर्माचरण, राष्ट्र आणि धर्मरक्षण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन मिळत गेले.
‘आता परात्पर गुरु डॉक्टर यांच्यातील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढले आहे’, याची पोचपावती महर्षींनी जीवनाडीपट्टीच्या वाचनातून दिली आहे. यावरून परात्पर गुरु डॉक्टर उपदेशपर काही बोलले किंवा नाही बोलले, तरी त्यांच्या सहवासात रहाणार्या सामान्य जनांनासुद्धा त्यांच्या अवतारत्वाचे ज्ञान होते.
२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांचे पुण्यमय सत्कर्म किंवा पवित्र स्वरूप यांच्या केवळ स्मरणाने समस्या सुटणे : मागील २५ वर्षांपासून मला परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थुलातून सत्संग मिळत नाही. त्यांनी म्हटले आहे की, त्यांना स्थुलातून मर्यादा असल्याने ते सूक्ष्मरूपाने साधकांच्या समवेत असतील. त्यामुळे त्यांच्या केवळ स्मरणाने माझ्या समस्या सुटतात. त्यांचे पुण्यमय सत्कर्म किंवा पवित्र स्वरूप यांच्या केवळ स्मरणाने माझ्या अंतःकरणातील दुष्ट चिंतनाचे विस्मरण होते.
३. ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात परमात्माच अवतरला आहे’, असे जाणवणे
‘सध्याच्या कलियुगातील धर्माला ग्लानी आलेल्या भीषण काळात अधर्म आणि भ्रष्टाचार यांचे प्राबल्य वाढले आहे. परिणामी साधना करणे कठीण आणि अशक्य झाले आहे, तरीही परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासारख्या सहस्रो साधकांना अध्यात्म जगायला शिकवून, गुरुकृपायोगानुसार साधना करून घेत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी माझी संतपदापर्यंत आध्यात्मिक प्रगती करवून घेतली आहे. त्यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी राष्ट्ररक्षण, धर्मप्रसार आणि धर्मरक्षण या अंतर्गत सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच ते माझ्यासारख्या सहस्रो साधकांचे सर्वार्थाने रक्षणही करत आहेत; म्हणून ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात परमात्माच अवतरला आहे’, असे मला जाणवते.
४. ‘जग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पुढील शतकोत्तर वर्षांचा काळ लोटल्यानंतरही अवतारच मानत राहील’, याची निश्चिती असणे
सनातन भारतामध्ये अनेक महापुरुष महान कार्य करून इतिहासात जमा होतांना दिसतात; मात्र श्रीकृष्ण, श्रीराम, ऋषिमुनी, उच्च कोटीचे संत-महात्मे यांच्या लोकोत्तर कार्याचे मूल्यमापन करणारे विद्वान, या सर्वांचा अवतारी पुरुष म्हणून निर्देश करतात. काही आधुनिक लोकांनीही त्यांचे हे मत प्रमाणभूत मानले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना जग (विशेषतः अध्यात्मवादी हिंदू जग) पुढील शतकोत्तर वर्षांचा काळ लोटल्यानंतरही अवतारच मानत राहील’, याची मला निश्चिती आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या अवतारत्वाविषयी ज्ञान दिल्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.२.२०२३)