साधकांनो, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देण्यातील लाभ जाणून घेऊन तत्परतेने लिहून द्या !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे यांविषयी लिहून देण्यास सांगतात. साधकांनी अशी सूत्रे लिहून दिल्याने साधकांना होत असलेले लाभ येथे दिले आहेत.

आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

१. लिखाणाचे प्रकार आणि त्याचे लाभ

१ अ. अनुभूतींविषयी लिहून देणे : साधकांनी अनुभूती लिहून दिल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत व्हायला साहाय्य होते.

१ आ. सहसाधकांच्या संदर्भात लिहून देणे : साधकांनी अन्य सहसाधकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लिहून दिल्याने ‘त्यांच्याशी तुलना करणे, त्या साधकाविषयी मनात असलेला पूर्वग्रह’, हे संबंधित साधकांमधील स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होते. एवढेच नव्हे तर काही प्रमाणात अन्य साधकांसंबंधीच्या नकारात्मक भावना न्यून होण्यास मोठे साहाय्य होते.

१ इ. संतांच्या संदर्भात लिहून देणे : साधकांनी संतांविषयी लिहून दिल्याने साधकांमध्ये संतांच्या प्रती असलेल्या कृतज्ञताभावात वाढ होते.

१ ई. शिकायला मिळालेली सूत्रे : साधकांनी शिकायला मिळालेली सूत्रे लिहून दिल्याने त्यांच्यामधील शिकण्याच्या वृत्तीत वाढ होते. त्यांच्या मनातील ‘काय आणि कसे शिकायचे ?’, ही प्रक्रिया अधिक सहजतेने होते.

१ उ. व्यवहारात अनुभवलेल्या एखाद्या प्रसंगाविषयी लिहून देणे : एखादा नकारात्मक प्रसंग (उदा. सरकारी कार्यालयातील अनागोंदी कारभार) अनुभवायला आला असल्यास त्याचा काही परिणाम मनावर असतो. साधकांनी त्याविषयी लिहून दिल्याने त्यांच्यात तटस्थता येण्यास साहाय्य होते, तसेच पुढे असा प्रसंग घडल्यास त्याला सामोरे जाण्याची सिद्धता आपोआप होते.

२. अन्य लाभ

२ अ. स्वतःत स्वयंशिस्त बाणवली जाणे : साधक स्वतःच्या नावाने लिहून देत असल्याने ते व्यवस्थित लिहून देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साधकांमध्ये स्वतःत शिस्त बाणवण्याची जाणीव निर्माण होते.

२ आ. विचारांमध्ये सुस्पष्टता येणे : साधकांनी त्यांच्या मनातील विचार लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याकडून विचारांमध्ये सुसूत्रता, तसेच सुस्पष्टता आणण्याचा प्रयत्न आपोआप होतो.

२ इ. लिखाणाचे संकलन होत असल्याने मनाला दिशा मिळणे : साधकांनी दिलेले लिखाण नंतर अन्य साधक तपासत असल्याने त्यांच्याकडून लिखाणातील तपशील किंवा उणिवा यांच्या संदर्भात विचारणा होते. त्यातून साधकांना शिकायला मिळते.

२ ई. मनात योग्य भावनांचे पोषण होणे : आपल्या मनात एखादा योग्य विचार आल्यास त्यासह काहीतरी भावना येतेच. आपल्या मनात तो विचार जेवढा पुनःपुन्हा येईल, तेवढे त्या संदर्भातील भावनेचे पोषण होत असते. आपल्या मनात भावनेचे पोषण झाल्याने तो विचार आणखी दृढ होत असतो. विचार आणि भावना यांचे हे परस्पर नाते मनावर संस्कार निर्माण करते. साधकांनी लिहून दिल्याने त्यांच्या मनात निर्माण झालेल्या विचारांच्या सुस्पष्टतेमुळे योग्य ती सूत्रे आणि भावना दृढ होतात.

२ उ. साधकांनी लिहून दिल्यावर ते देवाला अर्पण होत असते. तेव्हा साधकांना हलकेपणा जाणवतो. यातून साधक पुढच्या टप्प्यात जातात.

२ ऊ. समाधान मिळणे : साधकांनी सूत्रे लिहून दिल्यामुळे त्यांना एक प्रकारची तृप्ती जाणवते.

२ ए. ‘कीर्तन करणे’ ही एक प्रकारची भक्ती आहे. त्याचप्रमाणे ‘अशा प्रकारचे लेखन करणे’, हीही त्याच प्रकारची भक्ती आहे.

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२४)