ठाण्यातील विकासाला जनतेने मतदान केले ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे – येथील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के विजयी झाले. खासदार राजन विचारे यांचा त्यांनी पराभव केला. यासाठी मी ठाणे येथील जनतेचे आभार मानतो, तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे महायुतीचा भगवा विजयाच्या रूपाने डौलाने फडकत आहे. ठाण्यातील विकासाला जनतेने मतदान केले आहे. व्होट बँकेमुळे काही लाभ झालेला असला, तरी ते राजकारण दीर्घकाळ टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


नोटामध्ये वाढ होण्याची शक्यता  !

वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत नोटाला (उमेदवार नाकारण्यासाठीचे मतदान) ६५ लक्ष २० सहस्र मते मिळाली होती. या वर्षी नोटाला मिळालेल्या मतदानाच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे विभाजन, अर्वाच्च भाषेतील आरोप-प्रत्यारोप, विकासकामांऐवजी एकमेकांवरील राजकीय टीका आदींमुळे नागरिकांनी नोटाच्या मतदानात वाढ होण्याची शक्यता आहे.


अजित पवार यांचा पाय खोलात !

अजित पवार

स्वत:च प्रभाव निर्माण करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील बहुसंख्य आमदारांना स्वत:कडे वळवून शरद पवार यांना बाजूला केले. त्यामुळे या निवडणुकीत जनतेची मान्यता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाला मिळणार ? याविषयी उत्सुकता होती. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा १ उमेदवार विजयी झाला, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ७ उमेदवार विजयी झाले. ही आकडेवारी पहाता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये घेऊनही त्यांना फारसा प्रभाव पाडता आलेला नाही, हेच दिसून येते.

मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कि शिवसेना पक्षाचा प्रभाव राहील ? याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता होती; मात्र उद्धव ठाकरे गट त्यांच्या जागा राखण्यात यशस्वी झाले. उमेदवारांच्या प्रसारासाठी त्यांना अधिक वेळ मिळाला, असे म्हटले जाते.


राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एका जागेवर विजय !

सुनील तटकरे

मुंबई – अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून बारामती, शिरूर, धाराशिव आणि रायगड या ४ मतदारसंघाच्या जागा लढवल्या होत्या. त्यातील केवळ रायगड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले. शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यानंतर कुणाला सर्वाधिक मताधिक्य मिळते ? याविषयी जनतेमध्ये कुतूहल होते. यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला ७ जागा जिंकता आल्या. अजित पवार यांच्या दृष्टीने हा धक्का मानला जात आहे.


मतमोजणीला प्रारंभ होण्यापूर्वी हिंगोली येथे यंत्रणेत बिघाड !

हिंगोली – येथे मतमोजणीला प्रारंभ होण्यापूर्वी बूथ क्रमांक ८ आणि खोली क्रमांक १ मधील मतमोजणीच्या यंत्रणेत बिघाड झाला. निवडणूक साहाय्यक अधिकार्‍यांनी यंत्र कह्यात घेतले. यंत्र झालेले मतदान दाखवत आहे; मात्र कुठल्या उमेदवाराला किती मतदान झाले, हे दाखवत नाही. सर्व मतमोजणी झाल्यानंतर या यंत्रणेतील ‘बॅलेट पेपर’चे मतदान मोजले जाणार आहेत.


महाराष्ट्रात भाजपच्या २ केंद्रीय मंत्र्यांचा पराभव !

रावसाहेब दानवे

मुंबई – जालनामध्ये भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि दिंडोरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. भारती पवार या केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव झाला.

डॉ. भारती पवार

जालनामध्ये मागील ५ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला, तर डॉ. भारती पवार यांचा पराभव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी केला.


विशेष

१. दिंडोरी मतदारसंघात भगरे आडनावाच्या अपक्ष उमेदवाराला १२ सहस्र मते पडली.

२. सांगलीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील निवडून आल्यावर राममंदिर परिसरात हिरवा रंग उधळला गेला.

३. मुंबई उत्तर-पश्चिम आणि बीड मतदारसंघात फेरमतमोजणी घेण्यात आली.