सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा !

। श्री गणेशाय नमः । श्री गुरुदेवाय नमः ।

‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना करते, ‘कीर्तनाची ही सेवा तुम्हीच आमच्याकडून भावपूर्ण, परिपूर्ण आणि अचूक करून घ्या. आम्हाला हे कीर्तन गुरुदेवांच्या चरणी पूर्णपणे समर्पितभावाने सादर करता येऊ दे.

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. मूळपद

(कीर्तनामध्ये मूळपद घेतले जाते. मूळपद, म्हणजे सिद्धांताचे पद. त्या पदाच्या आधारावर पूर्ण कीर्तन केले जाते.  – सौ. श्रेया साने)

निजधर्मी रत झाला । लाभे खचित्ची मोक्ष तयाला ।।
ज्यापासून ही भूते झाली । व्यापी जो जगताला ।। १ ।।

अनन्यभावे निजकर्माच्या । द्वारे पूजूनी त्याला ।। २ ।।

– बाबा गर्दे, (गीतामृत शतपदी)

१ अ. सूत्र श्लोक (मूळपदाला संस्कृतमधील श्लोकाद्वारे केलेले पुष्टीकरण – सौ. साने )

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ४६

अर्थ : ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो.

ह.भ.प. श्रीमती लीला घोले

१ आ. सूत्र श्लोकाचे विश्लेषण : याच सूत्र श्लोकाचा आशय घेऊन बाबा गर्दे आपल्या ‘गीतामृत शतपदी’मध्ये म्हणतात, ‘निजधर्मी रत झाला । लाभे खचित्ची मोक्ष तयाला ।।’ या ठिकाणी त्यांनी ‘निजधर्म’ हा शब्द वापरला आहे.

१. अमरकोशात ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ ‘कर्तव्यकर्म’ असाही सांगितला आहे. ‘निजधर्म’ आणि ‘स्वकर्म’ एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. त्यात भेद मानू नये.

२. जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्तीसाठी ‘निजधर्म’ भिन्न भिन्न आहे, उदा. कुणी आधुनिक वैद्य (‘डॉक्टर’) असेल, तर त्याचा निजधर्म ‘सेवा करणे’, (म्हणजे रुग्णांवर औषधोपचार करून त्याला बरे करणे) असा आहे. आधुनिक वैद्याने सेवाभाव सोडला (रुग्णांवर योग्य औषधोपचार केले नाहीत), तर तो आधुनिक वैद्य न रहाता व्यावसायिक होईल. त्याचप्रमाणे एखादा सैनिक असेल, तर त्याचा निजधर्म ‘शत्रूला मारणे’ आणि ‘देशाचे अन् देशाच्या नागरिकांचे रक्षण करणे’, असा आहे. सैनिकाने शत्रूवर दया दाखवली, तर तो सैनिक जिवंत रहाणार नाही आणि त्यामुळे नागरिकांचे जीवही धोक्यात येतील.

३. ‘जी भूमिका पार पाडण्यासाठी परमेश्वराने आपली निवड केली आहे, तिच्याशी प्रामाणिक रहाणे आणि वेळ पडल्यास प्राण पणाला लावूनही ती भूमिका पार पाडणे, म्हणजे ‘निजधर्मी रत होणे’, असा अर्थ आहे.

४. महाभारतात अभिमन्यूच्या वधानंतर अर्जुन रडत न बसता लगेच दुसर्‍या दिवशी युद्धाला सज्ज झाला. मुलाच्या मृत्यूचा शोक करत बसला नाही. त्याप्रमाणे आपल्यालाही आपल्या निजधर्माचे पालन करायचे आहे.

१ इ. धर्मपालन न केल्यामुळे धर्म आणि राष्ट्र यांची अपरिमित हानी होणे : आज जगाच्या पाठीवर कुठेही निजधर्माचे पालन केले जात नाही. त्यामुळेच सर्वत्र भ्रष्टाचार, दुराचार, स्वैराचार आणि अनाचार माजले आहेत. त्यामुळे स्वधर्म आणि राष्ट्र यांची होत असलेली अपरिमित हानी आज आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.

२. धर्म, संस्कृती आणि देशाभिमान यांचे शिक्षण न मिळाल्यामुळे भारतीय लोकांना भारतीय संस्कृती किंवा देश यांविषयी आस्था नसणे

सौ. श्रेया साने

आज भारतातील लोकांना भारतीय संस्कृतीविषयी काहीच आस्था उरली नाही. लोक देश आणि धर्म यांविषयी अगदी उदासीन झाले आहेत. यात त्यांचा काहीच दोष नाही; कारण आजच्या आपल्या शिक्षणप्रणालीत आपला हिंदु धर्म आणि संस्कृती किंवा देशाभिमान यांविषयी शिकवलेच जात नाही. त्यामुळे लोकांना स्वधर्म आणि देशाभिमान ठाऊक नाही. त्यामुळे आज ‘इम्पोर्टेड’ वस्तू (विदेशात वस्तू खरेदी करून स्वदेशात आणणे) आणि विदेशी संस्कृती यांना अधिक मान आहे. मुले-मुली पाश्चात्य संस्कृतीचेच पोशाख घालून फिरतात. ‘ते पाहून डोळे बंद करावे’, असे वाटते. भारतीय पोशाख वापरत नाही. भारतियांनाच भारतीय वेषभूषा मागासलेली वाटते.

२ अ. हिंदूंमध्ये स्वाभिमान नसणे

२ अ १. स्वभाषाभिमान नसणे

पद

हर हर हर खंत मना वाटते महा ।
राष्ट्र-धर्म बुडवती जन कुणीच बोलीना ।।

पश्चिमेची रीतभात श्रेष्ठ वाटते ।
भारताची संस्कृती हीन वाटते ।। 

२ अ २. स्वभाषाभिमानशून्यता : आता भाषेचा विचार केला, तर आपली मराठी भाषा मृतप्राय झाली आहे. मराठी भाषेत उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि फारसी शब्द पुष्कळ प्रमाणात मिसळले आहेत. इतर देशांमध्ये पाहिले, तर जर्मनीत जर्मन, फ्रान्समध्ये फ्रेंच आणि स्पेनमध्ये स्पॅनिश भाषाच बोलली जाते; पण भारतात १८ राज्यभाषा असूनही विदेशी इंग्रजी भाषेचेच प्रभुत्व आहे. ‘इंग्रजी भाषा बोलता आली नाही, तर ती व्यक्ती अशिक्षित आहे’, असे लोक समजतात.

मातृभाषेत कुणी वाक्य बोली ना ।
आंग्ल भाषा सर्वाेपरी वाटते जना ।।

२ आ. सरकारच्या अनेक कृतींविषयी हिंदू अनभिज्ञ असल्यामुळे मंदिर सरकारीकरणाविषयी हिंदूंची असलेली उदासीनता !

२ आ १. ‘हिंदूंसाठी कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदेच फायदे’, अशी आजची परिस्थिती असणे : आज हळदी-कुंकू, ओटी भरणे, भोंडला यांच्या जागा ‘भिशी’ किंवा ‘किटी पार्टीज’ (टीप) इत्यादींनी घेतली आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाले, तरी लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. काही लोकांना वाटेल, ‘सरकारीकरण झाले, तर त्यात काय वाईट आहे ? आता मंदिर सरकार बघेल, एवढेच.’ इथे आपण लक्षात घ्यायला हवे, ‘भारत धर्मनिरपेक्ष किंवा निधर्मी देश आहे; पण इथे ‘हिंदूंसाठी कायदे आणि अल्पसंख्यांकांना फायदेच फायदे’, अशी परिस्थिती आहे; म्हणजे ‘सगळे कायदे, बंधने हिंदूंवर, अन्य धर्मियांना केवळ सवलतींची खिरापत’, असे चालू आहे. त्याची १- २ उदाहरणे सांगते.

टीप -‘भिशी’ किंवा ‘किटी पार्टीज’ : नातेवाईक किंवा समवयस्क मैत्रिणी यांनी खाणे-पिणे-गप्पा यांसाठी एक दिवस एकत्र जमणे

२ आ २. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर तिथल्या प्रशासकाने मंदिराचे १० लाख रुपये ख्रिस्त्यांच्या शाळेला देणे : अहो, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर तिथल्या प्रशासकाने मंदिराचे १० लक्ष रुपये ख्रिस्ती शाळेला दिले. त्या किंवा कुठल्याही ख्रिस्ती शाळेत विद्याथ्र्याने गळ्यात गणपतीचे पदक (लॉकेट) घातले, तर ५० रुपये दंड !’, ‘मुलींनी हाताला मेंदी लावली, तरी ५० रुपये दंड !’ ते ख्रिस्ती धर्माचे संस्कार आपल्या हिंदु मुलांवर करतात. अशा ख्रिस्ती शाळेला हिंदु मंदिराचे, म्हणजे हिंदूंचेच पैसे दिले, म्हणजेच इतर धर्माच्या उत्थानासाठी हिंदु भक्तांचे पैसे दिले जात आहेत.

२ आ ३. पंढरपूरला दान मिळालेल्या गाई कसायाला विकल्या जाणे : अहो, पंढरपूरला दानात मिळालेल्या गाई कसायाला विकल्या गेल्या. ‘हे योग्य आहे का ?’, असे करण्याचा त्यांना काय अधिकार आहे ?

२ आ ४. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात असलेले गरम पाण्याचे कुंड बुजवून तेथे शौचालय बांधणे : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात गरम पाण्याचे कुंड होते. ते तीर्थ आरोग्यालाही उत्तम होते; पण ते कुंड बुजवून तेथे चक्क शौचालय बांधले गेले होते.

आता काही हिंदु भक्तांच्या संघटित प्रयत्नांमुळे ते शौचालय काढून पुन्हा कुंडाला मूळ स्वरूप देण्याचे काम चालू आहे.

ब्राम्ह क्षात्रतेजाचा लोप जाहला ।
पैशाच्या मागे जन धावती पहा ।।

दुसरीकडे दुर्दैवाने हिंदूंना मानससरोवर किंवा अमरनाथ येथे यात्रेला जाण्यासाठी कर भरावा लागतो; मात्र हजयात्रेसाठी मुसलमानांना हिंदूंच्या मंदिरांचे पैसे दिले जातात. आपल्याला हे ठाऊक नसल्यामुळे आपल्याला त्याचे काहीही वाटत नाही.

  (क्रमशः)

– ह.भ.प. श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८१ वर्षे) आणि सौ. श्रेया साने, पुणे. (जून २०२३)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/800823.html