। श्री गणेशाय नमः । श्री गुरुदेवाय नमः ।
‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना करते, ‘कीर्तनाची ही सेवा तुम्हीच आमच्याकडून भावपूर्ण, परिपूर्ण आणि अचूक करून घ्या. आम्हाला हे कीर्तन गुरुदेवांच्या चरणी पूर्णपणे समर्पितभावाने सादर करता येऊ दे.
४ जून २०२४ या दिवशीच्या लेखात आपण कीर्तनातील ‘मूळपद, सूत्रश्लोक, त्याचे विश्लेषण आणि हिंदूंमध्ये स्वाभिमान नसणे’, हा भाग पाहिला. आता या भागात धर्माचरणाचे महत्त्व पहाणार आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/800425.html
३. भारतातील शिक्षणप्रणाली आणि धर्मांतर
३ अ. भारतातील शिक्षण धर्माधिष्ठित आणि राष्ट्राधिष्ठित नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर राष्ट्राभिमानाचे संस्कार न होणे, त्यामुळे असे विद्यार्थी मोठे झाल्यावर भ्रष्टाचारी होणे किंवा ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकणे : भारतातील शिक्षण धर्माधिष्ठित आणि राष्ट्राधिष्ठित नसल्यामुळे पुढे मोठ्या पदावर गेलेले हे विद्यार्थी भ्रष्टाचारी होतात. ते मायेत अडकतात आणि अयोग्य कृती करतात. पुण्यातील ‘डी.आर्.डी.ओ.’ मध्ये कार्यरत असलेले शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याकडील भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि ३ भ्रमणभाष (मोबाईल) जप्त झाले. त्यांनी राष्ट्राची गुपिते थेट शत्रू राष्ट्र पाकिस्तानला पुरवली; कारण धर्माधिष्ठित आणि राष्ट्राधिष्ठित शिक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर राष्ट्र अन् धर्म यांचे संस्कारच होत नाहीत. त्यांना ना धर्माचा, ना राष्ट्राचा अभिमान ! त्यामुळे असे लोक भ्रष्टाचारी होतात आणि ‘हनी ट्रॅप’(टीप) मध्ये अडकून देशद्रोही होतात. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
(टीप- ‘हनी ट्रॅप’ म्हणजे मोहात पाडणे किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे आणि विविध कार्यांसाठी त्याचा वापर करून घेणे होय.)
राष्ट्र्राचे सूत्रधार मूक जाहले ।
सत्तेच्या लोभाने देश विकती ते ।।
३ आ. धर्माधिष्ठित शिक्षण नसल्यामुळे हिंदूच हिंदूंच्या सणांना विरोध करत असणे : हिंदूंचा कुठलाही सण आला की, ‘त्यामुळे प्रदूषण कसे होते ?’, अशी धर्माचा कुठलाही अभ्यास नसलेली सूत्रे मांडून हिंदूच हिंदूंचाच बुद्धीभेद करतात. ‘होळी, दिवाळी आणि श्री गणेशचतुर्थी हे सगळे सण प्रदूषण करणारे आहेत’, असे आम्हाला सांगितले जाते. आपल्या परंपराच बंद पाडण्याचा हा डाव ओळखून हिंदूंनी सावध झाले पाहिजे. धर्माधिष्ठित शिक्षण नसल्यामुळे हिंदूच हिंदूंचे वैरी झाले असून हिंदुस्थानात हिंदूंचीच अशी विदारक स्थिती झाली आहे.
३ इ. भारतामध्ये कोरोनाच्या काळात १ लक्ष लोकांचे धर्मांतर होणे आणि अडीच सहस्र गावांत येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना चालू होणे : आज हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणावर चालू आहे. एका वर्षात १० लाखांपेक्षा अधिक हिंदू धर्मांतरित होत आहेत. ‘अनफोल्ड वर्ल्ड’ नावाच्या संस्थेने दावा केला आहे, ‘भारतामध्ये कोरोनाच्या काळात १ लक्ष लोकांचे धर्मांतर झाले.’ विचार करा ! त्या वेळेची परिस्थिती कशी होती ? कुणी कुणाकडे जाऊही शकत नव्हते. सगळीकडे दळणवळण बंदी होती. अशा काळातही १ लक्ष हिंदूंचे धर्मांतर केले गेले. अडीच सहस्र गावांत येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना चालू केल्या गेल्या. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘धर्मांतराने एक केवळ हिंदू न्यून झाला’, असे नसून हिंदूंचा एक शत्रू वाढला’, असा त्याचा अर्थ आहे.’ याचा अर्थ प्रतिवर्षी १० लक्ष शत्रू वाढत चालले आहेत. त्यामुळेच जागोजागी धर्मांधांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांचे अत्याचार शिगेला पोचले आहेत.’
४. जिहाद
४ अ. पद
शत्रू अपार भारतात माजले फार ।
होती धर्मविरांच्या हत्या ।
हिंदू धर्मा नेणती तथ्या ।
धर्म बदलती कोणी अगत्या ।
दुःख अपार ।।
आपण प्रतिदिनच जिहादच्या वार्ता वाचत आणि ऐकत आहोत.
जिहादी कृत्ये बहुत मातती
ख्रिस्ती गोड बोलूनी धर्म बाटती
बुद्धीवादी हे बुद्धीभेद करिती
कुणा कैवार ॥
४ आ. भारतात चालू असलेले जिहाद आणि त्यामुळे हिंदु संस्कृती नामशेष होण्याचा धोका ! : भारतात विविध प्रकारचे जिहाद चालू आहेत. ‘भूमी जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘थुंकी जिहाद’, ‘दगड जिहाद’, ‘मजार जिहाद’, अशी किती नावे घ्यायची ? ‘आपण कल्पनाही करू शकत नाही’, असे या जिहादांचे भयंकर परिणाम आहेत. श्रद्धा वालकर प्रकरण आपण ऐकले असेल. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपटही पाहिला असेल. या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ किती भयानक आहे आणि तो कुठल्या थरापर्यंत गेला आहे ?’, याची कल्पना आज सगळ्यांना आली असेल. दुसरीकडे ‘हिंदु धर्म कसा खोटा आहे ?’ आणि ‘ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे ?’, हे सांगून पैसा अन् नोकरी यांचे आमीष दाखवून ख्रिस्ती लोक हिंदूंना बाटवत आहेत. याशिवाय निधर्मी लोक हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेतच. अशीच परिस्थिती चालू राहिली, तर जगाच्या पाठीवर हिंदू, हिंदु मंदिरे आणि हिंदु संस्कृती नामशेष होईल.
५. मानव यांच्यात धर्मामुळेच भिन्नता असणे अन् सध्या समाजात पशुत्व वाढत असणे
हिंदूंनो उठा ! जागृत व्हा ! ‘धर्मरक्षण करणे’ हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे; कारण ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’, म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे रक्षण धर्म, म्हणजे ईश्वर करतो.’ मानवांत धर्मामुळेच भिन्नता आहे. मानवाने धर्माचे आचरण केले, तरच तो मानव, अन्यथा पशूच ! कसे ते पहा, ‘आहारनिद्राभयमैथुनं च ।’, म्हणजे आहार, निद्रा, भीती आणि मैथुन हे सर्व प्राणिमात्रांमध्ये समान असते; पण माणूस हा धर्माचरणी असल्यामुळे तो माणूस आहे. जर त्याने धर्माचरण सोडले, तर तोही पशूच होणार. आज आपण समाजात असे पशू दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघतच आहोत. ‘दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतो, म्हणजेच माणसात पशुत्व वाढले आहे’, याचेच हे उदाहरण नाही का ? समाजातील पशुत्व दूर करायचे असेल, तर प्रत्येकाने आपला निजधर्म ओळखून कृतीप्रवण व्हावे.
६. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्म ओळखून त्याप्रमाणे आचरण केल्याने आज आपण हिंदू म्हणून जगत असणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वधर्म ओळखून त्याप्रमाणे स्वधर्माचरण केले. त्यांनी तसे केले नसते, तर,
‘काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती । अगर शिवाजी न होते, तो सुन्नत सबकी होती ।।’
अर्थ : शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्वांची सुंता झाली असती, म्हणजे कुणीच हिंदु राहिले नसते. काशीची कला लोप पावली असती, मथुरेला मशीद झाली असती.
‘आज आपण हिंदु म्हणून जगत आहोत’, ही शिवाजी महाराजांचीच कृपा आहे; म्हणून ज्यांनी माणसे घडवली, देश चालवला, धर्म वाचवला’, त्यांची थोरवी जागोजागी गायला हवी. बंधू-भगिनींनो उठा ! जागृत व्हा ! कर्तव्यकर्म ओळखा आणि संघटित व्हा; कारण ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’, म्हणजे ‘कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य आहे.’
७. धर्मासाठी जगणे
७ अ. पद
उठो अब हिन्दू जागो । नहीं है वक्त सोने का ।
दिखा दो वीरता अपनी । यही मौका है लडने का ।। १ ।।
जहां पर देव भी सतियों के आगे सर झुकाते थे ।
वहीं अब खेल सा होता पराया मां और बहनों का ।। २ ।।
जहां पर कृष्णजी जैसे परम गोभक्त कहलाए ।
वहीं अब खून बहता है करोडों गौओं का रोज ।। ३ ।।
अगर मित्र कहा मेरा जो मानोगे, भला होगा ।
नहीं तो सिर्फ हाथों में रहेगा हाथ मलने का ।। ४ ।।
– स्वर्गीय रामचंद्र बुवा भागवत
७ आ. देश, काळ आणि परिस्थिती यांनुसार प्रत्येकाने आपला स्वधर्म जाणून कर्तव्यकर्म अन् ध्येय विचारपूर्वक निश्चित करून वागावे : देश, काळ आणि परिस्थिती यांनुसार प्रत्येकाने आपला स्वधर्म जाणून घ्यावा, म्हणजेच कर्तव्यकर्म अन् ध्येय विचारपूर्वक निश्चित करावे आणि तसेच वागावे; कारण त्यासाठीच जगायचे असते. धर्मासाठी जगणारी माणसे तेजस्वी असतात. त्यांच्या जगण्याला एक धार असते; म्हणून ते इतिहास घडवतात. ते व्यष्टी समवेत समष्टी धर्म जागवतात. त्यांची जीवनज्योत दीपस्तंभाप्रमाणे अनेकांना मार्गदर्शक ठरते. जगतांना अडचणी आहेतच, संकटेही येणारच; पण त्यावर विचारपूर्वक तोडगा काढायचा असतो. लाचारीने तडजोड करायची नसते. मोठ्या पदावर असणारी माणसे स्वार्थी, भित्री आणि अवसानघातकी असली, तर समाज अन् राष्ट्र यांची फार मोठी हानी होते. धर्मवीर, शूरवीर आणि धर्मभक्त वेळ पडल्यास बलीदान देतात; पण त्या ठिकाणी स्वार्थ अन् लाचारी येऊ देत नाहीत.
७ इ. धर्मरक्षण करत येणारे मरणही कल्याणप्रद असणे : समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘धर्मासाठी मरावें । मरोनि अवघ्यांसी मारावें । मारिता मारिता घ्यावें । राज्य आपुले ।।’ इतकेच काय, तर स्वातंत्र्यवीर सावरकरही म्हणतात, ‘तुजसाठिं मरण तें जनन । तुजवीण जनन तें मरण ।।’ तेव्हा धर्माचे रक्षण करता करता देह गेला, तरी चालेल. ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्माे भयावहः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३५), म्हणजे ‘आपल्या धर्मात मरणेही कल्याणकारक आहे; पण दुसर्याचा धर्म भय देणारा आहे.’ तेव्हा धर्मरक्षण करतांना येणारे मरणही कल्याणप्रद असते. भगवान त्यालाच आपली महापूजा मानून त्याचा उद्धार करतो; म्हणून ‘बाबा गर्दे’ मूळ पदात म्हणतात, ‘निजधर्मी रत झाला.’
(क्रमशः)
– ह.भ.प. श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८१ वर्षे) आणि सौ. श्रेया साने, पुणे. (जून २०२३)
या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/801105.html