Madras HC On Corruption : पतीच्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा उपभोग घेणार्‍या पत्नीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाचा निर्णय !

मद्रास उच्च न्यायालयाचे मदुराई खंडपिठ

मदुराई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने पतीच्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा उपभोग घेतल्यावरून पत्नीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या महिलाचा पती सरकारी कर्मचारी होता. त्याचे निधन झाल्याने न्यायालयाने पत्नीला भ्रष्टाचारासाठी दोषी ठरवत तिला शिक्षा सुनावली. देवनायकी असे या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, सरकारी नोकराच्या पत्नीचे कर्तव्य आहे की, स्वतःच्या पतीला लाच घेण्यापासून रोखणे. लाचखोरीपासून दूर रहाणे हेच जीवनाचे मूळ तत्त्वज्ञान आहे. जर कुणी लाच घेतली, तर तो आणि त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होईल. जर त्यांनी बेकायदेशीरपणे कमावलेल्या पैशांचा उपभोग घेतला असेल, तर त्यांना ते भोगावे लागेल. या देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचाराचा आरंभ घरापासून होतो आणि घरची मालकीण जर भ्रष्टाचारात भागीदार असेल, तर भ्रष्टाचाराला अंत नाही. मालकीणीला गैरमार्गाने मिळालेल्या पैशांचा लाभ झाला आणि आता तिला शिक्षा भोगावी लागेल.

संपादकीय भूमिका

या निर्णयातून आता प्रत्येक भ्रष्टाचार्‍याच्या पत्नीला शिक्षा करणे आवश्यक ठरते. कारण पती भ्रष्टाचारी आहे, हे बहुतेक पत्नींना ठाऊक असते आणि त्या पतीने भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांमध्ये वाटेकरी असतात !