नवी देहली – यशस्वी मुत्सद्दी म्हणून संयुक्त राष्ट्रांत भारताच्या पहिल्या महिला राजदूत म्हणून नियुक्त झालेल्या रूचिरा कंबोज (वय ६० वर्षे) सेवानिवृत्त झाल्या. ३७ वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केले. संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. रूचिरा कंबोज यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले की, असामान्य वर्षे आणि अविस्मरणीय अनुभवांसाठी भारताचे आभार.
संवेदनशील सूत्रांवर विदेशांत भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली !
हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा बोलणार्या कंबोज यांनी वर्ष १९८९ ते १९९१ या कालावधीत फ्रान्समधील भारतीय दूतावासात सचिव म्हणून काम केले. पॅरिसमधून राजनैतिक प्रवासास प्रारंभ करणार्या कंबोज यांनी अनेक देशांमध्ये उल्लेखनीय काम केले. कंबोज यांनी वर्ष २००२ ते २००५ या कालावधीत न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून काम केले. कंबोज यांनी लंडनमधीला राष्ट्रकुल सचिवालयातही काम केले आहे. ‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.