गोवा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे जाळे उघडकीस

  • युगांडातील २ महिलांची सुटका   

  • एका पीडित महिलेने केली दूतावासाकडे साहाय्याची मागणी

म्हापसा, १ जून (वार्ता.) – मांद्रे पोलिसांनी ‘अन्याय रहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने कारवाई करून एक आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मानवी तस्करी करणार्‍या युगांडा येथील जोजो नाकिंतू (वय ३१ वर्षे) या दलालाला कह्यात घेतले असून त्याच्या तावडीतून २ पीडित महिलांची सुटका केली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार जोजो नाकिंतू याने युगांडामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या २ महिलांना आकर्षक लाभाचे आमीष दाखवून गोव्यातील एका उपाहारगृहात आणले. या २ महिला भारतात आल्यानंतर त्याने या महिलांचे पारपत्र आणि व्हिसा त्यांच्याकडून हिसकावून घेतला अन् त्यांना धमक्या द्यायला प्रारंभ केला. त्यांना लाखो रुपयांच्या कर्जात बुडवून मारहाण करण्याच्या धमक्या देऊन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. हा मानवी तस्करी व्यापार ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना संपर्क करून चालू होता. काही वेळा या महिलांना वेश्याव्यवसायासाठी हरमल समुद्रकिनार्‍यावर रहाण्यास भाग पाडले जात होते. या पीडित महिलांपैकी एकीने दूतावासाला संपर्क करून तिच्या सुटकेसंबंधी साहाय्य करण्याची विनंती केली. त्यानंतर मांद्रे पोलिसांनी ‘अन्याय रहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेच्या साहाय्याने शोध घेऊन या २ महिलांची सुटका केली. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद करण्यात आला असून अनैतिक मानवी तस्करी या कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. सुटका केलेल्या या २ महिलांना मेरशी येथील सुरक्षागृहामध्ये ठेवण्यात आले आहे.