जळगाव : साधकांना साहाय्य करणे, प्रेमभाव, कधीही कुणाविषयी मनात प्रतिक्रिया न येणे आदी गुण असलेले जळगाव येथील सनातनचे साधक श्री. मदन ठाकरे (वय ७३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत, अशी घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २७ मे २०२४ या दिवशी केली. सनातनच्या जळगाव येथील सेवाकेंद्रात साधकांसाठी सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी ही आनंदवार्ता दिली. या क्षणी सर्व साधक भावविभोर झाले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्री. ठाकरे यांना श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली.
जळगाव येथील श्री. मदन कृष्णराव ठाकरे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. सौ. सुप्रिया पाटील (श्री. मदन ठाकरे यांची मुलगी), फोंडा, गोवा.
१ अ. प्रेमभाव : ‘बाबांची सर्वांशी लगेच जवळीक होते. ते घडलेला प्रसंग विसरून लगेच समोरच्याला क्षमा करतात. त्यांच्या मनात कुणाबद्दलही पूर्वग्रह नसतो. त्यांच्या दुकानात काम करणार्या मुलांशीही ते प्रेमाने वागतात. त्यामुळे ती मुले अजूनही बाबांचा आदर करतात.
१ आ. बाबांचे ५ भाऊ आणि १ बहीण, असे मोठे कुटुंब होते. बाबांनी कुटुंब एकत्रित रहाण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न केले.
१ इ. मुलांवर अधिकार न गाजवणे : बाबांनी आमच्यावर कधीच अधिकार गाजवला नाही. ‘मुलांनी अमुकच बनावे’, असे त्यांनी आम्हाला कधी सांगितले नाही. त्यांनी त्यांची मते आमच्यावर लादली नाहीत, तसेच कधी कुणाच्या मुलांशी आमची तुलना केली नाही. माझ्या भावालाही त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लावून स्वावलंबी बनवले. बाबांना मनातील कोणतीही गोष्ट सांगण्यास मला कधीही ताण येत नाही.
१ ई. बाबांच्या कुणाकडून अपेक्षा नसतात.
१ उ. जाणवलेले पालट
१ उ १. राग येण्याचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी बाबा पुष्कळ रागीट आणि हट्टी होते. आता बाबांना राग आला किंवा त्यांचे एखादे काम होत नसेल, तर काही मिनिटांतच ते परिस्थिती स्वीकारतात आणि शांतपणे बोलतात. ते नेहमी वर्तमानकाळात रहातात.
१ उ २. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : पूर्वी ते मला आणि आईला साधना करण्यासाठी विरोध करायचे; परंतु आता ते मला आणि आईला साधनेत साहाय्य करतात, उदा. आईला किंवा इतर साधकांना सेवेच्या ठिकाणी सोडणे किंवा घेऊन येणे, अर्पणाचे किंवा विज्ञापनांचे पैसे आणणे, साधकांकडे सात्त्विक उत्पादने पोचवणे, साधकांसाठी चहा नेऊन देणे इत्यादी. ते आईला घरकामातही साहाय्य करतात. आईच्या आजारपणात त्यांनी तिची सेवा केली.
वर्ष २००७ मध्ये मी आणि माझे यजमान पूर्णवेळ साधना करू लागलो. त्या वेळी माझ्या सासरकडून आमच्या साधनेला विरोध होता. माझे सासर आणि माहेर जळगाव येथेच आहे. त्यामुळे माझ्या सासरचे लोक बाबांना बोलायचे; परंतु बाबांनी त्याविषयी माझ्याकडे कधी गार्हाणे केले नाही.
१ उ ३. बाबांच्या हाताची त्वचा गुळगुळीत झाली आहे.
१ उ ४. ते घरात असतांना वातावरण उत्साही असते.
१ उ ५. साधकांनाही बाबांमध्ये पालट जाणवतात. साधकांना त्यांच्याकडे पाहून चांगले वाटते.’
२. श्री. प्रफुल्ल ठाकरे आणि सौ. अवंती ठाकरे (श्री. मदन ठाकरे यांचा मुलगा आणि सून), युनायटेड किंग्डम
अ. ‘बाबांचे रहाणीमान साधे आहे. त्यांच्या वागण्यात दिखाऊपणा नसतो.
आ. ते इतरांना साहाय्य करण्यास नेहमी तत्पर असतात.
‘बाबांमधील गुण आम्हाला अंगीकारता येऊ देत’, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना !’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.४.२०२४)
|