‘हिंदू कोड बिल’ सिद्ध करतांना डॉ. आंबेडकर यांनी घेतला होता मनुस्मृतीचा आधार !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले; पण ‘हिंदू कोड बिल’ सिद्ध करतांना त्यांनी मनुस्मृतीचा आधार घेतला होता, हे किती जणांना ठाऊक आहे ?

१. ‘हिंदू कोड बिला’ला स्मृतींचा आधार असल्याने संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांनी लेख सिद्ध करणे

भागवताचार्य वा.ना. उत्पात

‘डॉ. आंबेडकर यांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी लिहिलेली त्यांची आठवण पुढे देत आहे, ‘बाबासाहेबांनी एके दिवशी मला बोलावले आणि सांगितले, ‘‘माझ्या हिंदु कोड बिलाला शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्य समाजातील पंडित शोधून काढ. त्या कामासाठी आपण त्यांना मानधन देऊ.’’ मग मी गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना ते काम सांगितले. त्यांनी ते स्वीकारले आणि हिंदु कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ‘वीर अर्जुन’ या वृत्तपत्रात लिहिली. बाबासाहेबांनी स्वतः ते लेख वाचले आणि पंडित विद्यालंकार यांना ५ सहस्र रुपये (आताचे ५ लाख रुपये) मानधन म्हणून पाठवले.

२. याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृतींमध्ये मुलींना संपत्तीचा वाटा देण्याविषयी सांगितल्याचे डॉ. आंबेडकर यांनी ‘संविधान निर्मिती सभे’त सांगणे 

२४ फेब्रुवारी १९४७ या दिवशी ‘संविधान निर्मिती सभे’त डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पैतृक (पित्याच्या) संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे. मनुस्मृति अध्याय ९, श्लोक ११७ मध्ये म्हटले आहे, ‘सर्व बंधूंचे कर्तव्य आहे की, आपल्या हिश्श्यातील चौथा भाग बहिणींना द्यावा. असे न करणार्‍या भावांना पतित म्हटले जाते.’’

३. ‘हिंदू कोड बिल’साठी विविध स्मृतींचा आधार घेणे

११ जानेवारी १९५० या दिवशी सिद्धार्थ महाविद्यालयात ते म्हणाले, ‘‘मी घटस्फोटासाठी पराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या अधिकारासाठी बृहस्पती स्मृतीचा आणि वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.’’

२५ डिसेंबर १९५२ या दिवशी राजाराम चित्रपटगृहात झालेल्या सभेत आंबेडकर म्हणाले, ‘‘टीकाकार म्हणतात की, माझे ‘हिंदू कोड बिल’ हे हिंदु धर्मशास्त्रास सोडून आहे.’ त्यांना माझे आव्हान आहे की, त्यातील कोणते कलम मनुस्मृतीला सोडून आहे, हे दाखवून द्यावे.’’

– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर
(साभार : ‘धर्मभास्कर’, दीपावली विशेषांक, नोव्हेंबर-डिसेंबर २०१४)