Bombay HC : योग्य वेळी अटक न केल्याने नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहूल चोक्सी परदेशात पळाले ! – मुंबई उच्च न्यायालय

डावीकडून नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहूल चोक्सी

मुंबई – नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहूल चोक्सी यांना अन्वेषण यंत्रणांनी योग्य वेळी अटक केली नाही. त्यामुळे ते परदेशात पळून जाण्यास यशस्वी ठरले, असे बोल मुंबई उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला सुनावले. परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची अनुमती घेण्यापासून सवलत मिळावी, यासाठी सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) व्योमेश शाह यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश एम्.जी. देशपांडे यांन ही टिपणी केली.

१. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका अधिकोषाची १०० कोटी रुपयांची हानी केल्याच्या प्रकरणात व्योमेश शहा यांना वर्ष २०२३ मध्ये अटक झाली होती.

२. व्योमेश शहा यांची जामिनावर सुटका झाली असून जामीन देतांना न्यायालयाच्या अनुमतीविना देश सोडून जाऊ नये, अशी अट घालण्यात आली आहे.

३. व्यवसायानिमित्त सातत्याने परदेशात जावे लागत असल्याने प्रत्येक वेळी न्यायालयाची अनुमती घेण्यास अडचण येत असल्याचे कारण देत व्योमेश शहा यांनी  ‘न्यायालयाची अनुमती घेण्याची अट रहित करावी’, अशी मागणी न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती.

४. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. याचिका फेटाळतांना न्यायालयाने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे वरील उदाहरण दिले. भारतामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून या तिघांनी परदेशात पलायन केले आहे. त्यांना भारतात आणण्यास अद्याप यश प्राप्त झालेले नाही.