पर्यावरणतज्ञांच्या दृष्टीकोनातून… !

भूस्‍खलनाला मानवी हस्‍तक्षेप कारणीभूत !’

डॉ. माधव गाडगीळ

गेल्या काही वर्षांत छोटी-मोठी भूस्‍खलनेही वाढली आहेत, असे त्‍यांनी नमूद केले आहे. गेल्‍या १० वर्षांत होणारे भूस्‍खलन हे १०० पट वाढले आहे. अशा घटनांना केवळ निसर्ग कारणीभूत नसून आपण जे अयोग्‍य रितीने डोंगर पोखरत आहोत, डोंगरावर जे आघात करत आहोत, या गोष्‍टीही कारणीभूत आहेत. पश्चिम घाटात दगडी खाणी, रस्‍ते यांमुळे जे मोठे हस्‍तक्षेप होत आहेत, त्‍यामुळे अशा घटनांमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्‍यामुळे इरशाळवाडीसारख्‍या घटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत आहे.

– ज्‍येष्‍ठ पर्यावरण शास्‍त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ

श्री. ललित गर्ग

वृक्ष हे मानव, प्राणी किंवा अन्य सजीव यांची सर्वांत मूलभूत आवश्यकता आहे. ते आपल्याला अन्न, प्राणवायू, निवारा, इंधन, औषधे, सुरक्षा आणि फर्निचर देतो. पर्यावरण, जलवायू, हवामान आणि वातावरण यांच्यात नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी वृक्ष अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे जंगलतोड थांबवून आणि वनीकरणाला प्रोत्साहन देऊन वन्यजिवांची काळजी घेतली पाहिजे. आज जगात सर्वत्र निसर्गाचे शोषण चालू असल्यामुळे उत्तर ध्रुवावरील अनेक किलोमीटरपर्यंत बर्फ वितळणे, सूर्याची अतीनील किरणे (अल्ट्राव्हायोलेट रे) पृथ्वीवर येण्यापासून थांबवणार्‍या ‘ओझोन’च्या थराला छिद्रे पडणे, भीषण वादळे, सुनामी आणि अनेक नैसर्गिक आपत्ती इत्यादींसाठी केवळ मानवच उत्तरदायी आहे. जे आज ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या रूपाने आपल्यासमोर आहे.

– श्री. ललित गर्ग

भविष्‍यात सह्याद्री पायथा निर्मनुष्‍य होण्याची भीती !

श्री. धीरज वाटेकर

२० जुलै २०२३ या दिवशी कोकणातील इरशाळवाडी गावावर (तालुका खालापूर, जिल्‍हा रायगड) डोंगराचा काही भाग कोसळून गावच्‍या गाव दरडीखाली गुडूप झाल्‍याची, तर काहींना प्राण गमवावे लागल्‍याची अत्‍यंत दुःखद घटना घडली. सह्याद्रीतील निसर्गरम्‍य गावांची ओळख ‘दरडग्रस्‍त’ होणे, हे दुर्दैवी आहे. मनुष्‍याने विकासाच्‍या अतीहव्‍यासापोटी निसर्ग ओरबाडून काढल्‍याने इरशाळवाडीसारख्‍या घटना सातत्‍याने घडत राहून भविष्‍यात सह्याद्री पायथा निर्मनुष्‍य होण्याची भीती आहे.

– श्री. धीरज वाटेकर, मुक्त पत्रकार आणि पर्यावरण अभ्‍यासक, चिपळूण, जिल्‍हा रत्नागिरी. (२०.७.२०२३)

भौतिक विकास करतांना मानवी जीवनाचा विचार हवा ! 

अधिवक्ता गिरीश राऊत

‘औद्योगिकीकरण चालू राहील’, असे धरले, तर विनाश अटळ आहे. सौर, पवन किंवा हायड्रोजन यांचा ऊर्जेसाठी वापर केला, तरी तो टळणार नाही. ऊर्जांवर नाही, तर आवश्यकतांवर विचार झाला पाहिजे. जीवन ही आवश्यकता आहे, जीवनशैली ही आवश्यकता नाही. ज्यांच्या निर्मितीसाठी ऊर्जा लागते, त्या कृत्रिम वस्तू वापरायच्याच नाहीत. माणसाने वस्तू निर्माण केल्या; पण जीवन निर्माण केले नाही. ते पृथ्वीने निर्माण केले. १५ किलो वजनाची गार (बर्फ) पडू लागली, तरी शहाणपण येत नाही. २ वर्षांनी पृथ्वीच्या सरासरी तापमानात बर्‍यापैकी वाढ होईल, भौतिक विकासामुळे पर्यावरणीय स्थैर्य पूर्ण नष्ट होईल आणि मुंबईसह भारताच्या किनारपट्टीत अशा काही किलो वजनाच्या गारा पडू लागतील. मग औद्योगिकीकरण जगवत होते कि पृथ्वी ? ते समजेल. प्रत्येक दुर्घटना मृत्यूघंटा वाजवत आहे. विकासाचे ढोल थांबवले, तर या मृत्यूघंटेचा आवाज ऐकू येईल.

मानवी वृत्ती आणि मानवाचा कल

प्रकल्प करणे, म्हणजे आपल्याला अस्तित्व देणार्‍या पृथ्वीच्या विरोधात जाणे. प्रकल्प त्यामध्ये लाखो झाडे नष्ट होत आहेत, तरी तो करायचा; कारण माणसे जगली पाहिजेत, म्हणजे झाडे माणसांना जगवत नाहीत, तर प्रकल्प जगवतो; कारण तो नोकरी देतो. नोकरी पैसे देते. मग त्या पैशातून जगता येते. म्हणजे काय होते ? जगण्यासाठी अन्न लागते. पैशातून अन्न घेता येते. जर अन्न घेण्यासाठीच नोकरी करायची, म्हणजे प्रकल्प करायचा, तर पृथ्वीकडून अन्नच सरळ का मिळवायचे नाही ? त्यासाठी मध्ये प्रकल्प आणि नोकरी कशाला हवी ? ‘कोविड’ महामारीच्या काळात उद्योग बंद होते; म्हणून कुणी मरण पावले नाही. पृथ्वी त्या वेळी मानवजातीला छान जगवत होती.

– अधिवक्ता गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळ