पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांतून मनुष्याची निर्मिती झाली आहे. ही पंचमहाभूतेच मनुष्याचे पोषण करतात. या पंचमहाभूतांनी निर्मिलेल्या निसर्गाप्रती कृतज्ञ रहाणे, त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे, हे मनुष्याचे कर्तव्य आहेच; परंतु मानवाच्या स्वार्थी कृतींनी निसर्ग ओरबाडला जात आहे, हेही तितकेच खरे ! मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय असलेल्या आनंदाच्या प्राप्तीसाठी मनुष्याने विज्ञानाची नव्हे, तर निसर्गालाच देव मानणार्या सनातन हिंदु धर्माची कास धरली पाहिजे, हे आतापर्यंत अनेक उदाहरणांतून समोर आले आहे. ५ जून या दिवशी असलेल्या जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने ‘निसर्गदेवो भव ।’ या विशेषांकाद्वारे माहिती जाणून घेऊन निसर्गाप्रतीची कृतज्ञता कृतीतून व्यक्त करूया.
५१ वर्षांपासून जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जातो आणि त्यासाठी प्रतिवर्षी एखादी संकल्पना घेतली जाते. ‘इकोसिस्टिम’ ही संकल्पना वर्ष १९५३ मध्ये ए.जी. टॅनस्ले या शास्त्रज्ञाने प्रथम सांगितली. जंगल, वाळवंट, गवताळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश, तसेच समुद्र आणि जल येथे प्राणी, पक्षी, जिवाणू, वनस्पती आदींपासून बनलेली सजीव, तसेच दगड, भूमी आदींपासून बनलेली निर्जीव पर्यावरणव्यवस्था असते. वनस्पती या सूर्यप्रकाश म्हणजे ऊर्जा, पाणी आणि भूमीतील घटक यांपासून अन्न सिद्ध करतात. प्राणी त्यावर जगतात आणि तीच ऊर्जा निसर्गाला परत करतात. निसर्गातून मिळणारे अन्न, हवा आणि पाणी यांवर मानवाचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे मानवी जीवनाचे रक्षण करायचे असेल, तर या निसर्गस्रोतांना त्यांच्या उत्कृष्ट दर्जासह टिकवणे आवश्यक आहे. आज नेमके निसर्गातून मिळणारे हे घटक अत्यंत दूषित झाल्याने ते मानवी जीवनावर मोठा दुष्परिणाम करत आहेत. हे सारे जगाला आता चांगले लक्षात आले आहे.
पर्यावरणाच्या असंतुलनाचे भयावह दुष्परिणाम
१. ‘आज जगभरामध्ये प्रति ३ सेकंदांनी एखाद्या फूटबॉलच्या मैदानाएवढे जंगल नष्ट होत आहे’, असे तज्ञ सांगतात. जंगल नष्ट होणे म्हणजे संबंधित वनस्पती, प्राणी, जल, तेथील भूमी, जिवाणू आदी सर्व नष्ट होणे, तसेच पाऊस नष्ट होणे. मानवी जीवन पावसावर म्हणजे अप्रत्यक्षरित्या जंगलावर अवलंबून आहे.
२. जगभरातील एकूण प्रवाळापैकी ५० टक्के प्रवाळ नष्ट झाली असून वर्ष २०५० पर्यंत ९० टक्के प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे.
३. स्वित्झर्लंडमधील ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’नुसार हवा गुणवत्तेच्या निकषात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील ‘तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश’ ठरला आहे. इतकेच नाही, तर जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे. वर्ष २०२२ मध्ये भारत प्रदूषणाच्या संदर्भात ८ व्या क्रमांकावर होता. भारतातील ९६ टक्के लोकांना हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो. वर्ष २०१८ पासून ४ वेळा ‘सर्वांत प्रदूषित राजधानी शहर’ म्हणून देहलीचे नाव घोषित झालेले आहे.
४. प्रशांत महासागरात २६ सहस्र २४६ फूट खोलपर्यंत प्रदूषण पसरले आहे. २० व्या शतकात मानवनिर्मित प्रदूषणापैकी ६० टक्के प्रदूषण समुद्राच्या खोल तळाशी साचले आहे. ‘पृथ्वीवरील कोणतीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही’, असा िनष्कर्ष स्टॉकहोल्म विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनाद्वारे काढला असून ‘द नेचर’ या नियतकालिकातून मांडण्यात आले आहे.
५. घर, कारखाना, वाहतूक यांसाठी मोठ्या प्रमाणात तेल, गॅस, कोळसा यांचा वापर, प्रदूषण करणारे उद्योग, उष्णतेचे उत्सर्जन करणारे व्यवसाय यांमुळे तापमानात वाढ होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वातावरणातील ओलावा अल्प होतो. परिणामी वणव्यांचे प्रमाण वाढते.
६. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात भूस्खलनामुळे भारताला प्रतिवर्षी १५० ते २०० कोटी रुपयांची हानी सहन करावी लागते आहे. हिमालय आणि पश्चिम घाट या भागांमध्ये भूस्खलनामुळे अधिक हानी होत आहे.
पर्यावरण असंतुलनाचे एक कारण : वाढते औद्योगीकरण
सातत्याने वाढते औद्योगीकरण, रस्त्यांचे चौपदरीकरण आणि आता आठपदरीकरण यांमुळे देशभरात सर्वत्र होणारी बेसुमार वृक्षतोड, कोरोना महामारीनंतर लोकांचे दुचाकी-चारचाकी गाड्या घेण्याचे वाढलेले प्रमाण यांसह अनेक गोष्टी वायूप्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. वाढती लोकसंख्या हाही प्रदूषण वाढीमागील एक सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या जसजशी वाढली, तसतसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्वी ही समस्या केवळ शहरांपुरती मर्यादित होती. आता ही समस्या प्रत्येक खेडोपाडी पोचली आहे.
लोकांना रोजगार देण्यासाठी औद्योगीकरणात वाढ झाली. या औद्योगीकरणामुळे हवेतील विषारी वायूचे प्रमाण वाढत आहे.