परात्पर गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्याचा सराव करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती !

‘हे साधकांचे उद्धारक, कृपासागर, प्रीतीस्वरूप, हृदयाधीश सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपल्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो ‘न भूतो न भविष्यति ।’, असा परम दिव्य रथोत्सव झाला, त्यात नृत्य करण्याची सेवा केवळ तुमच्या अपार कृपेने मला लाभली. हे देवा, ‘आपल्या समोर नृत्य करण्याची माझी क्षमता नसतांना तुम्ही मला ही अनमोल संधी दिलीत’, त्याबद्दल या जिवाने व्यक्त केलेली कृतज्ञता स्वीकारावी. या जन्मोत्सवासाठी आम्ही नृत्याचा सराव करत असतांना केवळ तुमचाच संकल्प कार्यरत होता. गुरुमाऊली, आम्ही केवळ देहाने नृत्य केले. त्या देहातही आपणच होता. नृत्य करतांना आपणच आम्हाला विविध अनुभूती दिल्या. त्या पुढे दिल्या आहेत.

२३.५.२०२४ या दिवशी या अनुभूतींपैकी काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया. (भाग २)

या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/796321.html

नृत्यसाधना

२.‘जय जनार्दना कृष्णा, राधिकापते’, या गीतावर नृत्य बसवून सराव करतांना आलेल्या अनुभूती

२ ख. ‘श्रीमन्नारायण आणि शिव हे दोन नसून एकच आहेत अन् हा सोहळा पहाण्यासाठी शिव आतुर झाला आहे’, असे जाणवणे : त्या वेळी मला जाणवले, ‘श्रीमन्नारायण आणि शिव हे दोन नसून एकच आहेत. महाविष्णूच्या या आगळ्यावेगळ्या रथोत्सवात होणार्‍या नृत्यात श्रीकृष्णाच्या समवेत शिवाचेही गुणगान केले आहे. नारायणाच्या सोहळ्यात शिवाचेही तत्त्व कार्यरत आहे आणि हा सोहळा पहाण्यासाठी शिवही आतुर झाला आहे.’

२ ग. श्रीकृष्णाची भूमिका साकारतांना ‘स्वतःच्या ठिकाणी श्रीकृष्ण आहे’, असे जाणवणे : गीताच्या शेवटी ‘श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतो’, या प्रसंगाचे वर्णन करतांना मी श्रीकृष्णाची आणि शर्वरी अर्जुनाची भूमिका साकारत होती. त्या वेळी ‘तिथे मी नसून माझ्या ठिकाणी साक्षात् श्रीकृष्ण आहे’, असे मला जाणवले.

२ घ. नृत्य संपल्यावर मला दैवी गंध येत होता.’

३. १६.५.२०२२ या दिवशी ‘अच्युतं केशवं राम नारायणम् ।’ या गीतावर नृत्य बसवून सराव करतांना आलेल्या अनुभूती

३ अ. ‘नृत्याचा सराव करतांना मला प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व अखंड जाणवत होते.

३ आ. नारायणाला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर नृत्याच्या मुद्रा आणि कधीही न केलेल्या दैवी नृत्यरचना सुचणे अन् त्या रचना केल्यावर आगळावेगळा आनंद मिळणे : आम्हाला नृत्याच्या मुद्रा सुचत नव्हत्या. त्यामुळे आम्ही नारायणाला शरण जाऊन भावपूर्ण प्रार्थना केली. प्रार्थनेतील सामर्थ्यामुळे प्रार्थना झाल्यानंतर क्षणार्धातच आम्हाला नृत्याची मुद्रा सुचली आणि काही नृत्यरचनाही सुचल्या. या नृत्यरचना आम्ही पूर्वी केल्या नव्हत्या. त्या सर्व रचना दैवी होत्या. त्या रचना केल्यावर माझ्या मनाला जो आनंद मिळायचा, तो आगळावेगळाच होता. ज्या वेळी मला मिळालेल्या आनंदाबद्दल मी नारायणाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायचे, त्या वेळी मला पिवळा प्रकाश दिसायचा.

कु. अपाला औंधकर

३ इ. नृत्यात सर्वप्रथम आम्ही गोल फिरलो. त्या वेळी ‘माझ्या हातात गुलाबाची फुले आहेत आणि मी त्यांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहे’, असे मला जाणवले. ही मुद्रासुद्धा नारायणानेच आम्हाला सुचवली.

३ ई. या नृत्यात आम्ही श्रीकृष्ण, श्रीराम आणि श्रीविष्णु यांच्या मुद्रा केल्या. तेव्हा त्या प्रत्येक देवतेचे तत्त्व माझ्या देहात येऊन मला चैतन्य मिळत होते. त्यातून मला आध्यात्मिक स्तरावरील लाभही होत होते.

३ उ. या गाण्यात मध्येच एक सतारीची धून आहे. ती धून ऐकून मला वैकुंठलोकात गेल्याची अनुभूती आली, तसेच ‘हे नृत्यही वैकुंठातच सादर होत आहे’, असे मला जाणवले.

३ ऊ. बासरी घेतलेल्या कृष्णाची मुद्रा करतांना गुलाबी प्रकाश आणि मोरपंखी रंगाची छटा दिसणे : या नृत्यात मी बासरी घेतलेल्या कृष्णाची मुद्रा केली होती आणि शर्वरी राधा बनून माझ्याभोवती (कृष्णाभोवती) गोल फिरत होती. हे नृत्य करतांना मला गुलाबी प्रकाश दिसत होता. अन्य वेळीही मी श्रीकृष्णाची मुद्रा केल्यावर मला माझ्या डोळ्यांसमोर मोरपंखी रंगाची छटा दिसत होती.

३ ए. गुरुदेवांचे स्मरण करत असतांना ‘गुरुदेव सूक्ष्मातून नृत्याचा सराव पहात आहेत’, असे वाटून काव्य सुचणे : या नृत्याचा सराव चालू असतांना मला परात्पर गुरुदेवांची पुष्कळ आठवण येत होती. मी डोळे मिटले आणि त्यांचे स्मरण करू लागले. तेव्हा मला वाटले, ‘आता मी स्थुलातून गुरुदेवांच्या समवेत नाही; परंतु सूक्ष्मातून त्यांची कृपाळू दृष्टी माझ्यावर आणि प्रत्येक साधकावर अखंड आहे. ते सूक्ष्मातून माझ्या आणि शर्वरीच्या नृत्याचा सराव पहात आहेत.’ त्या वेळी गुरुदेवांनीच मला पुढील कविता सुचवली.

स्थुलातूनी सदैव मजसह नसती ।
सूक्ष्मातूनी सदैव मलाच न्याहाळती ।। १ ।।

कृपादृष्टी मजवर क्षणोक्षणी ठेवती ।
धावूनी मजसाठी सत्वरी येती ।। २ ।।

नृत्यपुष्प अर्पिण्यास असमर्थ मी ।
धाव घ्या अन् सेवा करून घ्या तुम्ही ।। ३ ।।

ऐसी एकची आर्त प्रार्थना गुरुवरा ।
कृतज्ञता तव सुकोमल चरणी ।। ४ ।।

४. १९.५.२०२२ या दिवशी ‘नारायणं भजे नारायणम् ।’ या गीतावर नृत्य बसवून सराव करतांना आलेल्या अनुभूती

अ. हे नृत्य बसवतांना माझ्याकडून नारायणाचे स्मरण होऊन मला पुष्कळ आनंद होत होता.

आ. मी ‘फुले तोडून नारायणाच्या चरणी वहाण्या’ची मुद्रा करत होते. त्या वेळी ‘मी साक्षात् वैकुंठातील फुले तोडून ती नारायणाच्या चरणी वहात आहे’, असे मला जाणवले आणि त्या फुलांचा स्पर्शही जाणवला.

इ. ‘वैकुंठाचे द्वार उघडणे, वैकुंठाच्या द्वारावर जय-विजय उभे असणे आणि शेषशय्येवर पहुडलेल्या श्रीमन्नारायणाच्या समवेत महालक्ष्मी असणे’, ही सर्व दृश्ये आम्ही नृत्याद्वारे साकार केली. त्या वेळी ‘सूक्ष्मातून आनंदाचा पाऊस पडत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला वातावरणात पिवळा प्रकाश आणि पिवळे कण दिसले.

ई. हे नृत्य करतांना सूक्ष्मातून ‘श्रीमहाविष्णु कमलासनावर उभा आहे’, असे दृश्य मला सारखे दिसायचे. त्यामुळे या गीतातील एका पार्श्वसंगीतावर ‘नारायण कमळावर उभा आहे’, असे दृश्य आम्ही नृत्याद्वारे साकार केले.

उ. या गाण्यात ‘नारायणं भजे…’, असा आलाप आहे. त्यावर नृत्य करतांना मला श्रीमन्नारायणाच्या कमलनेत्रांचे दर्शन झाले. ‘नारायणाच्या नेत्रांतील बुबुळांत ब्रह्मांड सामावले आहे’, असे मला दिसले.

ऊ. ‘प्रत्येक जिवाकडे नारायणाचे समान लक्ष आहे’, असे मला वाटले.

ए. नृत्य करतांनाच माझ्याकडून विठ्ठलाची मुद्रा झाली आणि मी त्या स्थितीतच उभी राहिले.

५. २०.५.२०२२ या दिवशी ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि ।’ या गीतावर नृत्य बसवून सराव करतांना आलेल्या अनुभूती

५ अ. टिपर्‍या घेऊन नृत्य करायचे असल्याचे कळल्यावर ते स्वीकारता न येणे, मनाचा हा अडथळा नारायणानेच दूर केल्याचे जाणवणे आणि त्यानंतर नृत्यातून आनंद मिळू लागणे : हे नृत्य आम्ही टिपर्‍या घेऊन केले. ज्या वेळी ‘हे नृत्य टिपर्‍या घेऊन करायचे आहे’, असे मला कळले, त्या वेळी प्रथम मला ते स्वीकारता आले नाही. तेव्हा मला माझ्या मनाचा अडथळा लक्षात आला आणि नारायणानेच तो दूर केला. त्यानंतर मला या नृत्यातून पुष्कळ आनंद मिळू लागला आणि नृत्य करतांना माझे भान हरपू लागले.

५ आ. हे नृत्य करतांना माझा श्वासोच्छ्वास आणि नृत्याच्या हालचाली यांवर माझे नियंत्रण नव्हते. ‘हे नृत्य साक्षात् नारायणच करून घेत आहे’, अशी अनुभूती मला घेता आली.

५ इ. टिपर्‍या खेळतांना सहसाधिकेच्या जागी श्रीकृष्णाचे दर्शन होणे आणि त्या वेळी काही क्षणांसाठी ध्यान लागणे : शर्वरी आणि मी टिपर्‍या खेळत होतो. त्या वेळी तिच्या जागी मला सतत श्रीकृष्णाचे दर्शन होत होते. ‘मी कृष्णाच्या समवेतच नृत्य करत आहे’, असे वाटून नृत्य करता करता मला काही क्षण ध्यानासारखी स्थिती अनुभवता आली. नृत्य करत असतांना मला उघड्या डोळ्यांनी सर्वत्र पिवळा प्रकाश दिसायचा. हे दृश्य पाहून काही क्षणांसाठी माझे ध्यान लागायचे.

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरुमाऊली, आपल्याच अनंत कृपांमुळे मला या अनुभूती आल्या. हे गुरुराया, ‘हा सराव करतांना आमच्याकडून चुका झाल्या’, त्याबद्दल आम्ही तुमची क्षमायाचना करतो. हे नारायणा, तूच ही नृत्ये बसवलीस आणि आम्हाला एवढा आनंद दिलास. हे आनंदस्वरूप गुरुदेवा, ‘नृत्यातील प्रत्येक मुद्रा आणि रचना मोगर्‍याच्या सुगंधी पुष्पाच्या रूपात तुमच्या चरणी अर्पण होऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे. ही नृत्यसेवा दिल्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ (समाप्त)

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक