उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री. अमोल कुळवमोडे यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये कामानिमित्त ब्राझिल देशातील ॲमेझॉन जंगलात जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. ब्राझिलमधील जिज्ञासूंसाठी घेतलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित हिंदु धर्माविषयीच्या ग्रंथांना ब्राझिलमध्ये पोचल्यावर सुगंध येत असल्याचे लक्षात येणे
‘ब्राझिल येथे गेल्यावर तेथे माझ्यासमवेत काम करणार्या सहकारी व्यक्तीने हिंदु धर्म जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी मी भारतातून जातांनाच त्यांना ‘हिंदु धर्म म्हणजे काय ?’ हे प्रथम ठाऊक व्हावे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदु धर्माविषयी लिहिलेले इंग्रजी भाषेतील २ ग्रंथ सोबत घेतले. मी प्रवासाला आरंभ करण्यापूर्वी १ दिवस आधी मला हे ग्रंथ अन्य साधकाकडून मिळाले. वेळेच्या अभावी मला ग्रंथ पाकिटातून उघडून बघणे शक्य झाले नाही आणि मी ते पाकिट तसेच समवेत घेतले. ब्राझिल देशात गेल्यावर तेथे तो सहकारी भेटल्यानंतर मी त्याला ते पाकिट तसेच काढून दिले. तेव्हा त्याने ग्रंथाना सुगंध येत असल्याचे मला सांगितले. प्रत्यक्षात मला त्यावर विश्वास बसला नाही; म्हणून मी ग्रंथांचा गंध घेतला, तर खरेच ग्रंथांना सुगंध येत होता. ‘ज्या साधकाने मला ग्रंथ आणून दिले होते, त्या साधकाने हे ग्रंथ अन्य कुठल्या सुगंधी वस्तूच्या समवेत ठेवले होते का ?’, याविषयी मी विचारपूस केली. तेव्हा ‘तसे काही घडले नव्हते’, याची निश्चिती झाली. तेव्हा ग्रंथाना दैवी सुगंध येत असल्याचे माझ्या लक्षात आले.
२. ॲमेझॉन येथे जंगलात रहाणार्या स्थानिक व्यक्तींच्या सांगण्यावरून भक्तीगीते ऐकवल्यावर त्यांना ती आवडणे आणि ती ऐकून ‘चांगली झोप लागेल’, असे सांगणे
ॲमेझॉन येथे जंगलात रहाणार्या स्थानिक व्यक्तींशी बोलतांना त्यांनी मला ‘तुमच्या भाषेतील गाणे गावे किंवा भ्रमणभाषमधून ऐकवावे’, अशी इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्षात माझ्याकडे काही मराठी भक्तीगीतेच होती. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना भक्तीसत्संगात लावली गेलेली श्रीकृष्णाची भक्तीगीते ऐकवली. भक्तीगीते ऐकल्यानंतर उपस्थित सर्वांनी ‘‘गीते ऐकून छान वाटले’’, असे सांगितले, तसेच ‘‘भक्तीगीते रात्री झोपतांना लावल्यावर शांत झोप येईल’’, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्यातील एका व्यक्तीने माझ्याजवळ असणारी सर्व श्रीकृष्णाची भक्तीगीते मागून घेतली आणि म्हणाली, ‘‘आमच्याकडे भारतामधून व्यक्ती येऊन गेल्याची आठवण राहील.’’
३. स्थानिक आंबा खाण्याची इच्छा झाल्यावर कार्यालयाच्या बाहेर असलेल्या झाडावरील पिकलेला आंबा खाली पडणे
कामानिमित्त मला जंगलाशी निगडित असणार्या तेथील काही शासकीय कार्यालयांना भेटायची संधी मिळाली. या वेळी मी एका कार्यालयाच्या बाहेर थांबलो असतांना तेथे स्थानिक आंब्याचे झाड होते. तिकडे साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर या मासांत आंबे पिकतात. त्या कार्यालयाच्या आवारात असणार्या झाडावरसुद्धा आंबे पिकले होते. माझ्या मनात ‘तो आंबा खायला मिळावा’, अशी इच्छा निर्माण झाली. त्याच वेळी पूर्ण पिकून पिवळा झालेला एक आंबा झाडावरून एका दगडावर पडला. ‘विशेष म्हणजे आंब्याची साल पातळ असूनही आणि दगडावर पडूनही तो फुटला नाही’, याचे मला आश्चर्य वाटले.
४. हिंदु धर्मातील गायीचे महत्त्व ऐकून सोबत असणार्या व्यक्तीला रडू येणे आणि त्यांनाही गोमांस खाऊ नये असे वाटणे
माझे काम झाल्यावर मला ब्राझिलमधील ‘रिओ द जनेरो’ या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जायची संधी मिळाली. या शहरात माझ्या समवेत असणार्या सहकार्यांच्या घरी रहाता आले. त्यांच्या घरातील सर्व व्यक्तींनी हिंदु धर्माची माहिती ऐकून घेतली. एक दिवस सकाळी न्याहारी करतांना माझ्या सहकार्यांच्या वडिलांनी ‘‘हिंदु धर्मीय गायीचे मांस का खात नाहीत ?’’, असे मला विचारले. तेव्हा मी त्यांना हिंदु धर्मातील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आणि तिचे पावित्र्य समजून सांगितले. त्याचप्रमाणे ‘‘गाय हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याने आम्ही हिंदु गायीचे मांस खात नाही’’, हेसुद्धा सांगितले. हे सर्व ऐकल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले, तसेच त्यांना यापुढे गायीचे मांस खाऊ नये असे वाटते, असेही ते म्हणाले.’
– श्री. अमोल कुळवमोडे, उंचगाव, कोल्हापूर. (डिसेंबर २०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |