परात्पर गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्याचा सराव करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती !

‘हे साधकांचे उद्धारक, कृपासागर, प्रीतीस्वरूप, हृदयाधीश सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपल्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो ‘न भूतो न भविष्यति ।’, असा परम दिव्य रथोत्सव झाला, त्यात नृत्य करण्याची सेवा केवळ तुमच्या अपार कृपेने मला लाभली. हे देवा, ‘आपल्या समोर नृत्य करण्याची माझी क्षमता नसतांना तुम्ही मला ही अनमोल संधी दिलीत’, त्याबद्दल या जिवाने व्यक्त केलेली कृतज्ञता स्वीकारावी. या जन्मोत्सवासाठी आम्ही नृत्याचा सराव करत असतांना केवळ तुमचाच संकल्प कार्यरत होता. गुरुमाऊली, आम्ही केवळ देहाने नृत्य केले. त्या देहातही आपणच होता. नृत्य करतांना आपणच आम्हाला विविध अनुभूती दिल्या. त्या पुढे दिल्या आहेत. (भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नारायणाने सूक्ष्मातून ‘जयंत’ अवताराला ‘नारायण’ म्हणून हाक मारण्यास सांगणे आणि रथोत्सवाच्या आधीपासूनच वातावरणात नारायणतत्त्व जाणवून ‘नारायण, नारायण’, हा जप चालू होणे

नृत्यसाधना

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवात नृत्य करायचे आहे’, असा निरोप मिळाल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि माझ्याकडून नारायणाचे भावपूर्ण स्मरण झाले. १५.५.२०२२ या दिवशी नारायणाने मला सूक्ष्मातून विचारले, ‘अपाला, तू मला ‘गुरुदेव’ म्हणून हाक मारतेस ना ?’ तेव्हा मी नारायणाला ‘हो’ म्हटले. त्या वेळी साक्षात् नारायणाने मला सांगितले, ‘तू आता माझ्या पृथ्वीवर अवतरलेल्या ‘जयंत’ अवताराला ‘नारायण’ म्हणूनच हाक मार.’ याचा भावार्थ नंतर साक्षात् श्रीमन्नारायणानेच उलगडला.

रथोत्सवाच्या ८ दिवस आधीपासूनच वातावरणात पुष्कळ नारायणतत्त्व जाणवत होते आणि २२.५.२०२२ या दिवसापर्यंत ते अधिकाधिक वाढत गेले. ‘त्यामुळे त्या तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी आणि त्यातून अधिकाधिक चैतन्य मिळण्यासाठी नारायणाने मला तसे सांगितले’, असे माझ्या लक्षात आले. त्या क्षणापासून माझा ‘नारायण, नारायण’, हा जप अखंड चालू झाला. त्यामुळे माझ्या तोंडातही गोडवा जाणवत होता.

२.‘जय जनार्दना कृष्णा, राधिकापते’, या गीतावर नृत्य बसवून सराव करतांना आलेल्या अनुभूती

कु. अपाला औंधकर

२ अ. सूक्ष्मातून नारायणाचे दर्शन होऊन भावस्थिती अनुभवणे आणि बाह्य जगताचे भान न रहाणे : १५.५.२०२२ या दिवशी नृत्याचा सराव चालू करण्यापूर्वी प्रार्थना करतांना माझ्या डोळ्यांतून आपोआप भावाश्रू वाहू लागले. ते भावाश्रू ‘साक्षात् श्रीमन्नारायणाच्या चरणी अर्पण होत आहेत’, असे मला जाणवले. मला सूक्ष्मातून नारायणाचे दर्शन झाले. नारायणस्वरूप गुरुदेवांनी केलेली अमर्याद कृपा आणि प्रीती यांचे स्मरण केल्याने माझे मन भावाच्या शीतल लहरींनी चिंब भिजून गेले होते. ती भावस्थिती अनुभवतांना मला ‘जगात काय चालू आहे ? मी कुठे आहे ?’, हे काहीच कळत नव्हते. केवळ ‘मी, प.पू. गुरुदेव आणि आमच्यामधील भावमय संवाद’, इतकेच मला दिसत होते. त्यानंतर मी नृत्याच्या सरावाला प्रारंभ केला.

२ आ. द्वापरयुगात नृत्य करत असल्याचे जाणवणे आणि सूक्ष्मातून एका दैवी गायीचे अस्तित्व जाणवून आनंद होणे : नृत्याचा सराव करतांना ‘मी आणि कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), आम्ही दोघी द्वापरयुगात जाऊन नृत्य करत आहोत’, असे मला जाणवले. त्या वेळी सूक्ष्मातून मला एका दैवी गायीचे अस्तित्व जाणवत होते. ती गाय आम्ही नृत्य करत असलेल्या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभी होती. ‘ती श्रीकृष्णाची भक्त आहे’, असे मला जाणवले. त्या गायीच्या कपाळावर तेजस्वी स्वस्तिक होते. तिला पाहून मला पुष्कळ आनंद झाला.

२ इ. सराव चालू असतांना मला अनेक वेळा अष्टगंध आणि हीना या अत्तरांचा सुगंध येत होता.

२ ई. नंतर मला आनंदाची अनुभूती आली. तो आनंद मला अंतर्मनापासून जाणवत होता. त्यानंतर त्याचे रूपांतर ‘परमानंदा’त झाले.

२ उ. नृत्याच्या मुद्रा करत असतांना ‘ती मुद्रा, म्हणजेच साक्षात् श्रीकृष्ण आहे’, असे मला जाणवत होते.

२ ऊ. सराव चालू असतांना ‘शर्वरीभोवती पिवळे आणि माझ्याभोवती गुलाबी वलय निर्माण झाले आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

२ ए. वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होऊन चैतन्य पसरत होते.

२ ऐ. नृत्य केल्यावर मला हलकेपणा जाणवत होता.

२ ओ. गुरुदेवांचे स्मरण भावपूर्ण करत नृत्य केल्यावर थकवा नाहीसा होणे : दिवसभर नृत्य केले, तरी थकवा न वाटता ‘देवच ऊर्जा देत आहे आणि तोच आपल्याकडून नृत्य करून घेत आहे’, असे मला जाणवत होते. मध्येच ज्या वेळी मला शारीरिक थकवा येत असे, त्या वेळी नारायणस्वरूप गुरुदेवांचे स्मरण भावपूर्ण करत नृत्य केल्यावर तो थकवा नाहीसा होत असे.

२ औ. सराव चालू असतांना मला चंदनाचा तीव्र सुगंध आला आणि कृष्णतत्त्व जाणवू लागले.

२ अं. श्रीकृष्णाच्या चरणकमली अबोली किंवा मोगरा यांची फुले अर्पण करत असल्याचे जाणवणे आणि त्या वेळी स्वतःचे हात गुलाबी अन् सहसाधिकेचे हात अबोली रंगाचे झाल्याचे दिसणे : या गीताच्या पार्श्वसंगीतावर आम्ही ‘फुले तोडून त्याचा हार बनवून नारायणाला, म्हणजे श्रीकृष्णाला घालतो’, असे नृत्याद्वारे दाखवतो. त्या वेळी ‘आम्ही प्रत्यक्षात श्रीकृष्णाच्या चरणकमली फुले अर्पण करत आहोत’, असे मला जाणवायचे. मला स्वतःच्या हातात कधी अबोलीची, तर कधी मोगर्‍याची फुले सूक्ष्मातून दिसायची. त्या वेळी माझे हात गुलाबी झाले होते आणि शर्वरीचे हात अबोली रंगाचे झाले होते. तेव्हा मला वाटत होते, ‘तो रंग जणू श्रीकृष्णाच्या प्रीतीचाच आहे.’

२ क. सूक्ष्मातून सदाशिवाचे दर्शन होणे : ‘पाहि सुरेशा कृष्णा, पाहि महेशा…’, या ओळीवर नृत्याचा सराव करतांना मला सदाशिवाचे दर्शन झाले. सदाशिव ध्यानस्थ असून एका पांढर्‍या शिळेवर विराजमान झाला होता. त्याच्या जटेतून गंगेचा प्रवाह वहात होता. ते सूक्ष्म दृश्य अतिशय सुंदर होते. (क्रमशः)

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798678.html