पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील इंग्रजी विभागाचे दायित्व मराठी विभागातील डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे दिले आहे. विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. डॉ. देसाई यांनी या पदाचे दायित्व स्वीकारल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. विद्यापिठातील इंग्रजी विभागात एकूण ८ संमत पदे आहेत. सद्यःस्थितीत २ प्राध्यापक येथे कार्यरत आहेत. अन्य कार्यरत प्राध्यापक साहाय्यक प्राध्यापक पदावर असल्याने आणि त्यांची पीएच्.डी. अद्याप पूर्ण झाली नसल्याने त्यांच्याकडे विभाग प्रमुख पदाचे दायित्व देण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध नाहीत. अनेक वर्षांमध्ये विद्यापिठात प्राध्यापकभरती झालेली नाही. त्यामुळे विद्यापिठाला विद्यापीठ निधीतून कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्त करावे लागत आहेत. मागील वर्षी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीला संमती दिली आहे; मात्र सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आरक्षण या पदभरती मध्ये लागू करण्यासाठी ही भरती प्रक्रिया लांबली आहे. प्राध्यापकभरती पूर्ण झाल्यावर विद्यापिठात प्राध्यापक उपलब्ध होतील. त्यानंतर या पदाचे दायित्व पात्र प्राध्यापकाकडे देण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे प्रभाग कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले.
संपादकीय भूमिका :विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापिठात असा प्रकार होणे लाजिरवाणे ! |