रामनाथी आश्रमातील चंडीयागांतर्गत झालेल्या ‘देवी होमा’च्या दिवशी आलेल्या अनुभूती

१. याग चालू होण्यापूर्वीची मनाची स्थिती

कु. प्रतीक्षा हडकर

‘यागाच्या  ४.१०.२०२२ या दिवशी आम्ही मोरपंखी रंगाचे पोषाख परिधान केले होते. मला दिवसभर चांगले वाटत होते. माझ्याकडून देवीचे स्मरण होत होते. याग चालू होण्यापूर्वी ‘याग कधी चालू होणार आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन कधी होणार ?’, अशी माझ्या मनाची व्याकुळ स्थिती झाली होती.

२. याग चालू झाल्यानंतर अनुभवलेली स्थिती

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यज्ञस्थळी आल्यानंतर त्यांना पाहून पुष्कळ शक्ती जाणवत होती.

आ. याग चालू होण्यापूर्वी माझा ‘महाशून्य’ हा जप चालू होता; परंतु तो आपोआप बंद होऊन माझा कुलदेवी कालिकामातेचा जप चालू झाला. ‘माझा कुलदेवीचा जप चालू आहे’, हे माझ्या विलंबाने लक्षात आले. हा मंत्रजप चालू असतांना मधेच दोन वेळा मला कुंकवाचा सुगंध आला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘देवीचे तत्त्व कार्यरत झाले आहे. देवी माझ्या आजूबाजूस वावरत आहे.’

इ. मला तोंडामध्ये गोडवा जाणवत होता.

३. यागात मरवा अत्तराची आहुती दिल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. या यागात मरवा अत्तराची आहुती देण्यात आली. तेव्हा मला वाटले, ‘माझे मन सुगंधानेच भरले आहे.’ मला माझ्या अनाहतचक्राजवळ आतून थंड पाण्याप्रमाणे काहीतरी खाली जात असल्याचे जाणवले.

आ. याग संपल्यावर माझ्या निवासाच्या खोलीच्या बाहेर आणि खोलीत गेल्यावरही तेथेही मला मरवा अत्तराचा सुगंध येत होता. रात्री २.३० वाजता मी जागी झाले. तेव्हाही १० मिनिटांनी मला पुन्हा मरवा अत्तराचा सुगंध आला.

४. श्री. रामानंद परब गजर म्हणतांना आलेली अनुभूती

यागाच्या शेवटी श्री. रामानंद परब (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी देवीचा गजर म्हटला. (गजर म्हणजे देवीचे स्तुतीगान करून तिला शरण येऊन संकटकाळी धावून येण्यासाठी आर्ततेने केलेले आवाहनगीत) त्यांच्या शब्दांत व्याकुळता होती. गजर ऐकतांना माझ्या अंगावर रोमांच उभे रहात होते.श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ तो गजर प्रसन्न मुद्रेने ऐकत होत्या. तेव्हा मला वाटले, ‘बाळ आईला कळवळून हाक मारत आहे आणि आई त्याला आश्वस्त करत आहे.’

महर्षि, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेने मला यागामध्ये देवीचे दर्शन होऊन देवीचा गजर ऐकण्याची संधी मिळाली, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. ’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक