Mizoram Stone Quarry Collapsed : रेमल चक्रीवादळामुळे थैमान : मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळून १० जण ठार !

आयझॉल (मिझोराम) – रेमल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व भारतात पुष्कळ हानी झाली आहे. मिझोराम राज्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे २८ मेच्या सकाळी ६ वाजता राजधानी आयझॉलमध्ये दगडाची एक खाण कोसळली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण त्यात गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील मेल्थम आणि हॅलिमेन या भागांमध्ये ही घटना घडली.

मिझोरामचे पोलीस महासंचालक अनिल शुक्ला यांनी सांगितले की, आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांपैकी ७ स्थानिक, तर ३ अन्य राज्यांतील आहेत. बचावकार्य चालू असले, तरी मुसळधार पावसामुळे यात अडचणी येत आहेत.

राज्यातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये बंद !

सततच्या पावसामुळे मिझोराममधील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. खासगी आस्थापनांनीही सर्व कर्मचार्‍यांना घरून काम करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात इतरही अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. भूस्खलनानंतर एक इमारत पाण्याने वाहून गेल्याने ३ लोक बेपत्ता आहेत.