तुरंबव (चिपळूण) येथे श्री शारदादेवी मंदिरात मंगलमय वातावरणात पार पडला नवचंडी याग

श्री देवी शारदा, देवी वरदान, देवी मानाई आणि देवी चंडिका यांचे विधिवत पूजन

चिपळूण २६ मे (वार्ता.) – तुरंबव येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट च्या वतीने आयोजित नवचंडी याग मंगलमय वातावरणात पार पडला. या यागाचे पौरोहित्य परशुराम येथील श्री. मकरंद विध्वंस यांनी केले. एकूण ११ दांपत्यांनी या यज्ञयागाचे यजमान पद केले. या वेळी श्री देवी शारदा, देवी वरदान, देवी मानाई आणि देवी चंडिका यांची रूपी स्थापून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले.

भावपूर्ण मंत्रोच्चारात हे हवन करण्यात आले. या वेळी परंपरेनुसार ढोल वादन करण्यात येत होते. यागाच्या पूर्णाहुतीनंतर आरती आणि देवीच्या चरणी धार्मिक विधीत झालेल्या ज्ञात-अज्ञात चुकांविषयी पुरोहित, यजमान आणि ग्रामस्थ यांनी क्षमा मागितली. सर्वांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी याचना करण्यात आली, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या विविध आघातांपासून रक्षण करण्यासाठी देवीच्या चरणी प्रार्थनाही करण्यात आली. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्टच्या वतीने ३ दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष श्री कृष्णा पंडित, उपाध्यक्ष श्री. दशरथ पंडित आणि विश्वस्त, मानकरी, गावकर, गुरव आणि ग्रामस्थ आणि देवीचे भाविक यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे,  डॉ. हेमंत चाळके, श्री. सुनील गांधी आणि श्री. सकपाळ उपस्थित होते.

विशेष

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री शारदादेवीचे माहात्म्य सांगणारा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. हा अंक ट्रस्ट व्यवस्थापनाकडून देवीच्या चरणी अर्पण करून ‘या कार्याला यश मिळावे’, असे देवीच्या चरणी गार्‍हाणे घालण्यात आले.

२. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर वस्त्रसंहिता अभियानाच्या अंतर्गत वस्त्रसंहितेचे फलक, तसेच मंदिर दर्शनापूर्वी काय करावे ? हे धर्मशिक्षणाचे फलकही लावण्यात आले.

३. या वेळी ग्रंथ प्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादन विक्री कक्षाद्वारे धर्म आणि अध्यात्मप्रसारची सेवा करण्यात आली.