‘श्रीहरि शरणम् ।
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहाणे’, हा माझ्यासाठी एक आनंददायी आणि उच्च पातळीचा आध्यात्मिक अनुभव होता. शास्त्र सांगते,
तदेव रम्यं रुचिरं नवं नवं तदेव शश्वन्मनसो महोत्सवम् ।
तदेव शोकार्णवशोषणं नृणां यदुत्तमःश्लोकयशोऽनुगीयते ।।
– श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय १२, श्लोक ५०
अर्थ : ज्या वचनाने भगवंताच्या परम पवित्र यशाचे गायन होते, तेच रमणीय, आवडणारे आणि नवनवीन मानावे. तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत रहाते आणि तेच मनुष्याचा सर्व शोकसागर आटवते.
दैवी अवतारांच्या लीलांचे वर्णन करणारे काव्य आणि प्रसंग हे अत्यंत मधुर, तेजस्वी, मनाला आनंद देणारे आणि उत्साहवर्धक असतात. हे नित्य नवे भासणारे काव्य मनाला चिरंतन आनंद तर देतेच, तसेच दुःखरूपी महासागराचे बाष्पीकरणही करते.
२. ब्रह्मोत्सवाच्या दिवसापासून मी स्वतःमधील वाईट सवयींचा त्याग करण्याचा संकल्प केला आहे.
३. ‘या सोहळ्यात गुरुदेवांचे त्यांच्या सहस्रो साधक भक्तांच्या समवेत दर्शन घेणे’, हा माझ्यासाठी आनंददायी आणि उत्साहवर्धक अनुभव होता. ‘या साधक भक्तांच्या पायांची धूळही अत्यंत पवित्र आहे’, असे मला वाटते. नामस्मरण आणि स्तोत्रगायन करत चालणार्या दैवी दिंडीच्या दृश्याने माझ्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे.
४. या वेळी गुरुदेवांनी आरंभ केलेल्या अगणित उपक्रमांचा धावता आढावा घेण्यात आला. आमच्या ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे संस्थापक आदरणीय सत्यपुरुष श्रीमत् उपेंद्रमोहन सेनगुप्ता यांनी स्वतःच्या जीवनकाळात समाजसुधारणेचे अविरत प्रयत्न केले. ‘प.पू. डॉ. आठवले करत असलेले हे दैवी प्रयत्न पाहून श्रीमत् उपेंद्रमोहन यांचा आत्मा पुष्कळ आनंदी झाला असेल’, असे मला वाटते.
५. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उपस्थितीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेला चंडीयाग पहायला मिळणे’, हीसुद्धा एक दुर्मिळ संधी होती.
६. चंडीयाग चालू होण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी बालकांशी पूर्वी झालेल्या भेटीची (सत्संगाची) ध्वनी-चित्रचकती दाखवण्यात आली. ती पाहून ‘या बालकांचे आचरण अत्यंत नम्र आणि विचार पवित्र आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
७. काही वर्षांपूर्वी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करण्यासाठी उच्च लोकांतून दैवी जीव जन्माला येतील’, असे सांगितले होते. त्यानुसार आमच्या संप्रदायाचे संस्थापक श्रीमत् श्री उपेंद्रमोहन यांचा दैवी निवास असलेल्या कोलकाता शहरात अशी दैवी बालके जन्माला येत आहेत.
८. ‘संतांचे शब्द कधीही असत्य ठरत नाहीत’, हे सिद्ध करणारा एक प्रसंग सांगतो. वर्षभरापूर्वी मी प.पू. डॉ. आठवले यांना भेटलो होतो. त्या वेळी माझ्या मनातील शंकाचे निरसन करतांना ते म्हणाले, ‘‘भविष्यात होणार्या युद्धात एखादा देश चुकून स्वतःच्याच देशावर बाँब टाकेल.’’ ‘दैवी शब्द कधीच असत्य नसतात’, याचा प्रत्यय मला आला. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात रशियाच्या सैन्याने चुकून स्वतःच्याच भूमीवर बाँबचा वर्षाव केला आणि त्या स्फोटामुळे त्यांच्या देशाची पुष्कळ हानी झाली. यावरून लक्षात येते, ‘एका ब्रह्मविदचे (म्हणजे जो ब्रह्माला जाणतो, त्याचे) सहजपणे बोललेले शब्दही कधी अयोग्य आणि असत्य असत नाहीत.’
अत्यंत अद्वितीय असा ब्रह्मोत्सव पाहून आम्ही सर्व जण ‘श्रीहरीच्या दैवी इच्छेनुसार अखिल मानवजातीचे कल्याण करणार्या धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना होण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन करणार्या लीलाविग्रह प.पू. डॉ. जयंत बा. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळो’, अशी प्रार्थना करतो.
जयन्ति शास्त्राणि द्रवन्ति दाम्भिकाः ।
हृष्यन्ति सन्तो निपतन्ति नास्तिकाः ।।
अर्थ : जेव्हा शास्त्रांचा विजय होतो आणि ढोंगी पळ काढतात, तेव्हा सज्जनांना आनंद होतो अन् नास्तिकांचा पराभव होतो.
समाजातील लोकांची नास्तिकता, कृतघ्नपणा आणि स्वैराचारी वृत्ती महापुरुषाला दिसत असते. त्यामुळे श्रीहरीच्या हृदयात उत्पन्न झालेले दुःख श्रीहरि स्वतःच्या अंतर्मनात लपवून ठेवतो. ‘परात्पर गुरुदेवांच्या दैवी प्रीतीने आमचे विचार आणि भावना शुद्ध होऊ देत अन् त्यांच्याच कृपेने मिळालेली सेवा आम्हाला दास्यभावात राहून आनंदाने अन् अनंत काळापर्यंत करता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
परात्पर गुरुदेवांच्या चरणकमली माझा साष्टांग प्रणाम !’
– पू. डॉ. शिवनारायण सेन, संपादक, साप्ताहिक ‘ट्रुथ’. (मे २०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |