‘ईश्वर प्रत्येक युगपरिवर्तनाच्या काळात विविध अवतारांच्या माध्यमातून युगपरिवर्तनाची प्रक्रिया सूक्ष्मातून आणि स्थुलातून घडवून आणतो. आताही एक सूक्ष्म युगपरिवर्तनाचा काळ चालू आहे. या काळातील ईश्वराचे कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून होत आहे; म्हणून महर्षींनी विविध नाडीपट्ट्यांमध्ये त्यांचा ‘ईश्वराचा अवतार’, ‘श्रीविष्णूचा अवतार’, ‘श्रीजयंतावतार’ अशा विविध नामांनी उल्लेख केला आहे. अशा या ‘अवतारा’च्या कार्याची नाडीपट्टीमध्ये वर्णन करून ठेवलेली गुणवैशिष्ट्ये सारांश स्वरूपात पुढे दिली आहेत.
१. युगांनुसार श्रीविष्णूने धारण केलेले अवतार आणि त्यांचे कार्य !
१ अ. सत्ययुग : सत्ययुगात भगवंताने मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह, असे ४ प्रमुख अवतार धारण केले. भगवंताचे हे अवतारकार्य पृथ्वीवरील निर्मिती, सृजन, पालन आणि धर्माचरण या विषयांशी संबंधित होते. भगवंताने मत्स्यरूपात सप्तर्षींचे रक्षण करून पृथ्वीचे बीज वाचवले. माशाचे रूप धारण करून श्रीविष्णूने प्रलयकाळात आपद्बांधव रूपात (संकटकाळी बांधवाप्रमाणे) सप्तर्षींना संरक्षण दिले.
१ आ. त्रेतायुग : त्रेतायुगात भगवंताने वामन अवतार धारण केला. त्यानंतर त्याने परशुराम अवतार धारण केला आणि शेवटी श्रीरामावतार धारण करून रामराज्याची स्थापना केली. श्रीरामावतारानंतर त्रेतायुग संपुष्टात आले.
१ इ. द्वापरयुग : द्वापरयुगात श्रीकृष्णावतार धारण केल्याने देवाचे माहात्म्य अनेक पटींनी वाढले; कारण तो पूर्णावतार होता. आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णावतार संपताच कलियुगाला आरंभ झाला. कलीच्या प्रवाहाला देवाने आडकाठी आणली नाही; कारण ती त्याचीच इच्छा होती !
१ ई. श्रीविष्णूचे अंशावतार : भगवंताने ३ युगांमध्ये घेतलेल्या ८ प्रमुख अवतारांचा उल्लेख शास्त्र, तसेच ऋषिमुनींचे वाङ्मय यांमध्ये आढळतो. या ८ प्रमुख अवतारांसह भगवंताने अनेक अवतार धारण केले आहेत; पण त्यांचे कार्य आणि प्रगट शक्ती सीमित असल्याने त्यांना ‘अंशावतार’ किंवा ‘अंशअंशावतार’ म्हटले गेले.
२. कलियुगातील ‘श्रीजयंतावतार’ !
आता कलियुग आरंभ होऊन ५ सहस्रांपेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या २ सहस्र वर्षांमध्ये भगवान श्रीविष्णूने अनेक अंशअंशावतार धारण केले. कलियुगातील या चरणात सप्तर्षींची मधुर वाणी आणि लिखाण यांतून सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार ‘श्रीजयंतावतारा’च्या रूपाने आपल्या समोर आले आहेत. बहुतांश वेळा भगवंताने पृथ्वीवर अवतार धारण केल्यावर ‘तो अवतार आहे’, याची जाणीव समाजाला होत नाही. याचे कारण म्हणजे भगवंताची माया ! भगवंताची माया एवढी प्रबळ असते की, शिष्यांना ‘गुरुरूपातील अवतार हा अवतार नसून ते गुरुच आहेत’, असे वाटत असते. गुरूंना ते स्वतः अवतार असल्याचे ठाऊक असते; मात्र त्या अवतारी भगवंताचीच सत्ता संपूर्ण सृष्टीवर चालत असतांना शिष्य तरी काय करील ? भगवंताची ही लीला अगाध आहे.
२ अ. श्रीजयंतावताराच्या कार्याची वैशिष्ट्ये : कलियुगात श्रीविष्णूने धारण केलेला ‘श्रीजयंतावतार (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले)’ हा आगळा-वेगळा अवतार आहे; कारण या अवतारात त्याचे सर्वाधिक कार्य सूक्ष्मातील आहे. श्रीजयंतावताराच्या सूक्ष्मातील कार्याचे काही ठळक पैलू पुढे दिले आहेत.
१. निद्रिस्त हिंदु समाजाला मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर जागृत करणे (केवळ शब्दांनी नव्हे, तर चैतन्याने जागृत करणे, म्हणजे समाज पुन्हा निद्रिस्त होणार नाही.)
२. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी ईश्वरप्राप्तीसाठी धडपडत असलेल्या साधक-जिवांना आंतरिक प्रेरणा होऊन त्यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून एकत्रित येणे
३. कालप्रवाहात सनातन धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या अयोग्य रूढी-परंपरांचे निर्मूलन करणे, हिंदूंच्या मनावर योग्य संस्कार बिंबवणे आणि ते टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राचा संकल्प करणे
४. धर्मज्ञान लोकांपर्यंत सोप्या शब्दांमध्ये पोचवणे, त्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतींचा शोध लावणे आणि सोप्या शब्दांमध्ये मांडलेले धर्मज्ञान स्वीकारून हिंदु समाजाने त्याचे आचरण करणे
५. सनातन धर्म जगणारे, धर्मज्ञानाचे आचरण करण्यासाठी दीपस्तंभ ठरणारे साधक, संत आणि सद्गुरु यांना घडवून त्यांना प्रकाशात आणणे, तसेच ‘सनातन धर्माचे पालन केल्याने ईश्वरप्राप्ती होते अन् जीवन आनंदी बनवता येते’, याविषयी समाजाला आश्वस्त करणे
३. श्रीविष्णूच्या ‘श्रीजयंतावतारा’चरणी केलेली प्रार्थना !
‘हे श्रीविष्णु, श्रीजयंतावताराचे सूक्ष्मातील कार्य पृथ्वीवरील काही संतांनी ओळखले आहे आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्त करणार्या काही साधकांनी त्यांच्या लिखाणातून त्याविषयी सांगितले आहे. ऋषींनी वेळोवेळी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून गुरुदेवांच्या सूक्ष्मातील कार्याची ओळख करून दिलेली आहे. ‘ज्ञात-अज्ञात अशा स्रोतांकडून आतापर्यंत झालेली गुरुदेवांची ओळख अपूर्णच आहे’, असे म्हणता येईल. वर्ष २०२४ मधील या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे, ‘यापुढे अनेक स्रोतांमधून आपल्या धर्मसंस्थापनेच्या सूक्ष्मातील कार्याची विस्तारपूर्वक ओळख आम्हा सर्व साधकांना होऊ दे आणि आम्हा साधकांना त्याचा आनंद घेत आणखी जोमाने साधना करता येऊ दे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे), कांचीपूरम्, तमिळनाडू. (१३.५.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |