सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले श्रीविष्णूचा अवतार असल्याचा सनातनच्या साधकांचा भाव आहे. ब्रह्मर्षींनीही जीवनाडीपट्टीत ते श्रीमद्नारायणाचा अवतार असल्याचे म्हटले आहे. त्रेतायुगात श्रीविष्णूचा श्रीरामावतार, तर द्वापरयुगात कृष्णावतार झाला. कृष्णावतार हा पूर्णावतार मानला जातो; कारण या अवताराने जन्मापासूनच दैवी चमत्कार किंवा अवतारत्वाची शक्ती दाखवायला प्रारंभ केला. जन्मल्यानंतर माता-पिता वसुदेव आणि देवकी यांना ठेवलेल्या कारागृहाचे दरवाजे उघडणे, पूर आलेल्या यमुनेच्या पाण्याला बाळकृष्णाचा अंगठा लागताच यमुनेने वसुदेवाला पैलतिरी जाण्यापुरती वाट करून देणे, पुतनेचा वध आदी अनेक गोष्टी श्रीकृष्ण जन्मतःच अवतार असल्याचे दर्शवतात. दशावतारांपैकी श्रीकृष्णानंतर आता कल्कि अवतार होणार; पण ब्रह्मर्षींनी नाडीपट्टीवाचनात पुढीलप्रमाणे म्हटले आहे.
प्रत्येक १ सहस्र वर्षांनी भगवान श्रीविष्णु पृथ्वीवर अवतार धारण करतो. तेव्हा पृथ्वीवर असलेल्या लोकांना त्याच्याविषयी कळेलच, असे नाही. गेल्या १ सहस्र वर्षांनंतर भगवंताने ‘गुरुदेव डॉ. आठवले’ (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या रूपात जन्म घेतला आहे. (सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १४६ (१.६.२०२०))
याप्रमाणे धर्मसंस्थापनेसाठी मध्ये मध्ये काही प्रमाणात श्रीमद्नारायणाचे तत्त्व पृथ्वीवर अवतरणार आणि तेच या कलियुगांतर्गत पाचव्या कलियुगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात अवतरले आहे. श्रीविष्णु म्हणजे ‘श्री’सहित असतो. त्याचे अवतारही ‘श्री’सहित म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण असेच आहेत. त्यामुळे जेथे श्रीविष्णु तेथे सेवेला श्रीलक्ष्मी असणारच. सध्या श्रीलक्ष्मी कोणत्या रूपात सेवा करत आहे ? ते माझ्या अल्प मतीला जसे जाणवले, तसे येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व आपल्याला जाणून घ्यायचे आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
(संदर्भ: सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय कार्य: खंड १’)
१. श्रीलक्ष्मी असे गुरुदेवांच्या व्यापक स्वरूपातील कार्यासाठी लागणार्या धनाच्या रूपात !
श्रीमद्नारायणाचे तत्त्व पृथ्वीवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात म्हणजे मानवी रूपात अवतरले असले, तरी श्रीलक्ष्मी मानवी रूपात नसून ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्माच्या पुनरुत्थानाच्या कार्याला आर्थिक साहाय्य करत त्यांच्या चरणी रूजू झाली आहे.
प.पू. डॉ. आठवले यांनी साधनेला प्रारंभ केला आणि त्यांचे सर्वकाही गुरुचरणी (प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी) अर्पण केले. यात धनाचाही समावेश होता. त्यांनी गुरूंच्या आशीर्वादाखाली वर्ष १९९० मध्ये ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ स्थापन केली आणि मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी कार्य चालू केले. व्यावहारिकदृष्ट्या एखादे कार्य चालू करायचे, तर त्यासाठी मोठी आर्थिक पुंजी लागते. उद्योजकही एखाद्या उद्योगासाठी बँकेतून कर्ज काढतात. प.पू. डॉ. आठवले यांच्याकडे अशी कोणतीही आर्थिक पुंजी नव्हती. अशा आर्थिक परिस्थितीत प.पू. डॉ. आठवले यांनी विश्वभर अध्यात्मप्रसार करण्याच्या शिवधनुष्याला हात घातला होता. यातून त्यांची ईश्वरावरील पराकोटीची श्रद्धा दिसून येते. ‘हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यासाठी ईश्वर कधीच पैसा अल्प पडू देणार नाही’, अशी त्यांची पराकोटीची (हा शब्दही अल्पच आहे) श्रद्धा होती. ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’द्वारे त्यांनी प्रवचने, सत्संग, अभ्यासवर्ग, यांसमवेत अध्यात्मावर ग्रंथ प्रकाशित करायचे ठरवले. यासाठी लागणारे मनुष्यबळ स्वयंस्फूर्तीने आणि निधी अर्पणाद्वारे आपोआपच मिळत गेला. जे काही कार्य आरंभले होते, तेही तसेच उदात्त आणि उत्तुंग होते. त्यामुळे अनेक अर्पणदाते विनासंकोच त्यासाठी अर्पण देत असत. श्रीमद्नारायणाचे तत्त्व ज्या विभूतीच्या ठिकाणी कार्यरत आहे, त्या विभूतीने आरंभलेल्या कार्यासाठी श्रीलक्ष्मी प्रसन्न झाली नाही, तर नवल !
२. वाढता वाढता वाढे !
वर्ष १९९८ मध्ये प.पू. डॉ. आठवले यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केले. याद्वारे अध्यात्मप्रसारही होऊ लागला आणि समाजात भ्रष्टाचार, गैरव्यवहार, भेसळ, यांविरुद्ध जागृतीलाही प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांनी एप्रिल १९९९ मध्ये ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केले.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काही ध्येयनिष्ठ पत्रकारांनी स्वतःची पदरमोड करून वर्तमानपत्रे चालवली. स्वातंत्र्यानंतरही अशी काही वर्तमानपत्रे होती; पण नंतर आलेल्या धनदांडग्यांच्या वर्तमानपत्रांपुढे ध्येयनिष्ठ वर्तमानपत्रे खपाच्या दृष्टीकोनातून टिकली नाहीत. एखादे वर्तमानपत्र चालवायचे, तर त्यासाठी येणारा खर्च वर्तमानपत्राच्या मूल्यातून वसूल होत नाही. त्यासाठी सरकारी विज्ञापने किंवा आस्थापनांची विज्ञापने यांचे साहाय्य घ्यावे लागते. ‘सनातन प्रभात’ हे निर्भीडपणे लिखाण करणारे दैनिक ! त्यासाठी काही मोजके धर्मनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ अर्पणदाते वगळता विज्ञापने कोण देणार ?
दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, तेव्हाही समाजातील काही जणांना ‘निधीअभावी ते लवकरच बंद पडणार’, असे वाटले होते; परंतु ईश्वरी नियोजन वेगळेच होते. आज दैनिक ‘सनातन प्रभात’ला २५ वर्षे झाली. या काळात दैनिकाच्या पृष्ठसंख्येत आणि गुणवत्तेत वाढच होत गेली. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता समाजप्रबोधनासाठी आणि केवळ अध्यात्म, धर्म अन् राष्ट्र हे विषय घेऊन दैनिक चालू करणे आणि ते २५ वर्षे अव्याहत गुणोत्तर वाढ करत चालू ठेवणे, ही ईश्वरी लीलाच नाही का ?
एखाद्या उद्योजकाने राष्ट्र आणि धर्म यांसाठी नव्हे, तर व्यावसायिक हेतूने जरी दैनिक चालू करायचे ठरवले, तरी त्याने हाती असलेली आर्थिक पुंजी, प्रतिदिन होणारा खर्च, त्याला मिळू शकणारी विज्ञापने या सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतला असता.
प.पू. डॉ. आठवले यांचे अवतारत्व, त्यांच्यावर असलेली श्रीलक्ष्मीची अपार कृपा या गोष्टी समजण्यासाठी येथे केवळ उदाहरणादाखल दैनिक ‘सनातन प्रभात’चे उदाहरण दिले आहे. अजूनही सनातन संस्था, सनातन प्रभात नियतकालिके, सनातनचे आश्रम, सनातन पंचांग, समाजात होणारे उपक्रम यांसाठी अर्पण स्वरूपात निधी मिळतो आणि कार्य पार पडते. अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी विनामूल्य सभागृह देणे, साधक/कार्यकर्ते यांना भोजन, अल्पाहार आदी विनामूल्य पुरवणे; स्वतःचे मालवाहू वाहन किंवा चारचाकी वाहन वापरायला देणे आदींद्वारे समाजाकडून साहाय्य मिळत आहे.
गेल्या २५ वर्षांत प.पू. डॉ. आठवले यांनी चालू केलेले कार्य अफाट वाढले असून ते विश्वभर पसरत आहे. आर्थिक अडचणींमुळे कार्य थांबले आहे, एखादा उपक्रम बंद करावा लागला आहे, असे कधीही झाले नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या कार्याचे विश्वव्यापी स्वरूप पहायला आणि अनुभवायला मिळत आहे, त्यामागे प.पू. डॉक्टरांचा असीम त्याग, दुर्दम्य इच्छाशक्ती आदी मानवी गुणांसमवेतच त्यांच्या अवतारत्वाचा भाग अधिक कार्यरत आहे. याचे स्मरण पावलोपावली ठेवून आपण पै न पै वाचवण्याचा आणि योग्य विनियोग करण्याचा निश्चय करूया ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या कार्याला साहाय्य करणारी श्री महालक्ष्मीदेवी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था (१७.४.२०२४)
स्वतः नामानिराळे आणि विरक्त रहाणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य, त्यासाठी होणारी उलाढाल यांत स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर कुठेही अडकलेले नाहीत. ते स्वतः १० × १० चौरसफुटांच्या खोलीत रहातात. खोलीत वातानुकुलित यंत्र बसवूया म्हटले, तरी ते ‘आश्रमातील साधकांना वातानुकूलित खोल्या नाहीत, तर मला वातानुकूलित खोली कशाला ?’, असे म्हणतात. लिखाणासाठी पाठकोरे कागद, औषधांच्या वेष्टनाचा कोरा भाग वापरतात. प्रत्येक वस्तू जपून आणि ती अगदी जीर्ण होईपर्यंत वापरतात. साधकांनाही त्यांनी तशीच शिकवण दिली आहे. असे विरक्त जीवन जगणार्याच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी श्रीमहालक्ष्मी प्रसन्न झाली नाही, तरच नवल ! – श्री. वीरेंद्र मराठे (१७.४.२०२४) |
शिव आणि श्रीविष्णु करत असलेल्या कार्यासारखेच परात्पर गुरु डॉ. आठवले करत असलेले कार्य परिपूर्ण आहे !
‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीत लिहिलेल्या महर्षींच्या संभाषणामध्ये वसिष्ठ ऋषि म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले महान आहेत. त्यांची स्थिती शिव आणि श्रीविष्णु यांच्याप्रमाणे आहे. त्यांचे कार्य जसे परिपूर्ण आहे, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्यही परिपूर्ण आहे. त्यांच्या कार्याला शिव, श्रीविष्णु आणि सदाशिव (पार्वतीदेवीशी शिवाचा विवाह होण्यापूर्वीचे नाव) यांचा आशीर्वाद आहे. या कार्याची सर्व जगात कीर्ती होईल, असेच आम्ही करणार आहोत.’ (९.१२.२०१५ या दिवशी तिरुवण्णामलई,
तमिळनाडू येथे झालेल्या ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक ५०’ मधील उद्गार)
संतांचे आशीर्वाद (वर्ष १९९६ पासून)
वर्ष १९९६ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद संस्थेच्या कार्याला सातत्याने मिळाले आणि मिळत आहेत. वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठे जाता आले नाही, तरीही अनेक संत कार्याशी जोडले जात असून आशीर्वाद देत आहेत.
महर्षींचे आशीर्वाद (एप्रिल २०१४ पासून)
वर्ष २०१४ पासून सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् ऋषीस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याच्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात आशीर्वादस्वरूप मार्गदर्शन करत आहेत.