सातारा महाबळेश्वर राज्य महामार्गावर अनेक होर्डिंग्ज अनधिकृत !

अनधिकृत होर्डिंग्ज

सातारा, २४ मे (वार्ता.) – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमुळे राज्यातील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या जागतिक पर्यटनस्थळी नेहमीच देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी पहायला मिळते; मात्र सातार-मेढा-महाबळेश्वर या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे पहायला मिळत आहे. या होर्डिंग्जची शासन दरबारी नोंदच नसल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिकांना या महामार्गावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, हे वास्तव आहे. (प्रशासन या विषयी काय करत आहे ? प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पहात आहे का ? – संपादक)

सातारा-मेढा-महाबळेश्वर या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. याचाच लाभ घेत काही व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला गगनचुंबी होर्डिंग्ज उभी केली आहेत. ही होर्डिंग्ज प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. यातून जाहिरातदारांची जाहिरात होत असली, तरी राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. ही होर्डिंग्ज तेवढी भक्कम वाटत नसल्यामुळे कोणत्याही क्षणी वादळी वारे आणि पाऊस यांमुळे पडून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे या महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने काढून घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.